दुष्काळ : काय केले पाहिजे?
दुष्काळ जाहीर झाला. सरकारनं केला. त्याला तीन महिने झाले. त्यानंतर काल मदतही जाहीर झाली. मग आता महाराष्ट्र सैनिकांचं काम काय? आपला १४ कलमी कार्यक्रम.
दुष्काळ जाहीर करण्यापासून आपल्याला लक्ष ठेवणं भाग असतं. परंतु आता दुष्काळ जाहीर झाला आहे तर काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे.
एक गोष्ट महत्वाची की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सुमारे ६०% भाग दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे. ह्याचा अर्थ ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण व्यक्ती म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून किंवा एखादी संस्था म्हणून ह्या मोठ्या संकटाला पुरे पडणार नाही. केवळ सरकारच इतक्या मोठ्या प्रमाणात काहीतरी करू शकतं. त्यामुळे सरकार काय करत आहे ह्याकडे लक्ष ठेवणं हे आपलं महत्वाचं काम आहे. सरकार हे जे काही करत आहे ते आपणच दिलेल्या कराच्या पैशातून करत आहे. त्यामुळे त्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. ते आपण करावं.
दुसरी गोष्ट अशी की “दुष्काळ, दुष्काळ” म्हणून नुसती भुई बडवण्यात काही अर्थ नाही. नेमकी परिस्थिती काय, काय केलं पाहिजे, सरकार काय करत आहे, सरकार कुठे कमी पडत आहे, कुठे मला काय करता येण्याजोगं आहे हे पहाणं महत्वाचं आहे.
दुष्काळात सर्वात चार गोष्टींची मोठी कमतरता असते. एक प्यायला पाणी, दुसरं, जनावरांना चारा, तिसरी गोष्ट लोकांना रोजगार आणि चौथी, रेशनवरचं स्वस्त धान्य. ह्या चार गोष्टी अती महत्वाच्या…. ह्यानंतर मग शाळेतल्या मुलांना फी न परवडणं, आरोग्य, वृध्दांची काळजी, पत व्यवस्था, सुलभ कर्जव्यवस्था, कर्जमुक्ती, स्वस्त दरात दर्जेदार बी-बियाणं मिळणं, शेतमालाला योग्य भाव, शेतपंपांना सवलत ह्या गोष्टी आहेतच. ह्या शिवाय ज्यांचं पोट हातावर आहे असे, महिला, वृध्द अशांना दुष्काळाची मोठी झळ बसते. त्यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज असते.
म्हणून खालील गोष्टी केल्या पाहिजेत.
तातडीच्या:
१) नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. आपल्या कार्यक्षेत्रात जिथे जिथे लोकांना प्यायचं पाणी मिळत नसेल तिथे तिथल्या प्रशासकीय यंत्रणेला (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) पत्र लिहून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावी. तिथल्या किमान ५ महिला आणि ५ पुरुष नागरिकांनी लेखी कळवलं पाहिजे. ते त्यांनी लिहावं ह्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा. तिथे २४ तासात पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करा. पाणी ही जगण्यासाठी मूलभूत गरज आहे.
२) गावात किती जनावरांना चारा मिळण्याची गरज आहे त्यांची संख्या प्रशासनाला ताबडतोब कळवा. ह्यासाठी देखील लेखी निवेदन, लोकांच्या सही, अंगठ्यासह, द्या.
३) मनरेगातून आणि महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेतून ज्या लोकांना काम हवं आहे त्यांना कामाची मागणी करा. ह्यात कामाची मागणी करण्याची एक पध्दत आहे. त्या पध्दतीचा अवलंब करा. उदाहरणार्थ: प्रत्येकाला “जाॅब कार्ड” काढून देणे वगैरे. ह्याचा तपशील तुम्हाला ह्या दोन्ही योजनांच्या संकेतस्थळांवर मिळेल.
४) दुष्काळग्रस्त भागात रेशनबाबत काय निर्णय झाले आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारा. त्याची अंमलबजावणी आपल्या भागात होते आहे की नाही हे पहा. ह्यात खूपदा भ्रष्टाचाराच्या घटना होत असतात त्याकडे लक्ष द्या.
वरील ४ गोष्टी फार महत्वाच्या. त्याखेरीज :
५) गावात असलेल्या आणि बंद पडलेल्या पाणी योजनांची दुरूस्ती ताबडतोब करून घ्या. त्याचा विस्तार करण्यासाठी रितसर अर्ज द्या. ह्यासाठी वाटलं तर “विशेष ग्रामसभा” बोलवा.
६) गावातल्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढणे हे काम रोजगार हमी मधून होऊ शकतं. त्याचप्रमाणे त्याचं खोलीकरण, विहिरी दुरूस्त करणं ह्याकडे लक्ष द्या.
७) टॅंकर किंवा बैलगाडीतून पाण्याची मागणी करा. पाणी साठवण्यासाठी ५,००० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या टाक्यांची मागणी करा.
८) जी घरं अनुदानित अन्नधान्यासाठी पात्र असतील आणि ज्यांची रेशनकार्ड नसतील त्यांच्यासाठी ती कार्ड बनवून घेण्याची प्रशासनाला मागणी करा.
९) दुष्काळग्रस्त लोकांनी अनुदानित दरात, स्वस्त दरात दर्जेदार बी-बियाणं मिळावं म्हणून निवेदन द्यावं. आपण त्याचा पाठपुरावा करावा.
१०) वृध्द, शारिरीक दृष्ट्या कमजोर अशा लोकांसाठी “सार्वजनिक स्वयंपाकघर” (Community Kitchens) सुरू करण्याची मागणी करा.
आणि थोडं लांब पल्ल्यासाठी :
११) बी-बियाणं कोष (Seed Bank) सुरू करण्याची मागणी करा.
१२) चारा कोष (Fodder bank) सुरू करण्याची मागणी करा.
१३) धान्य बॅंका सुरू करा. त्यासाठीही सरकारची मदत घ्या.
१४) हवामानाची योग्य माहिती शेतकरी वर्गाला मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाला करा.
महाराष्ट्राचा दुष्काळ खूप गंभीर आहे. त्याचा नीट नायनाट केला नाही तर ग्रामीण भागाच्या आजिविकेचे आणि तिथल्या संस्कृतीचे दोर कापले जातील. आपलं महाराष्ट्रावर प्रेम आहे. आपण दुष्काळ हटवलाच पाहिजे.
अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com
ह्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
उत्तर द्याहटवा