शुक्रवार, डिसेंबर २६, २०१४

संकट आणि शांतता


२६ डिसेंबर २०१४

संकट आणि शांतता

आज थोडं घाईनं का होईना पण माझ्या मनात जे आहे ते कागदावर उतरवू दे..  अगदी आजच, कारण आजच्याला महत्व आहे.

बरोब्बर १० वर्षांपूर्वी आज सुनामीमुळं साधारण सव्वा-दोन लाख माणसं मृत्यूमुखी पडली आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले. पुण्यात “मैत्री” च्या स्वयंसेवकांची लगेच जमवाजमव झाली, पैसे-प्लॅस्टीक कागद-भांडी जमवायला सुरूवात झाली आणि चार-पाच दिवसात पहिली तुकडी कामाला गेली सुध्दा. “Taking people back to see” असं आमच्या मोहीमेचं नाव होतं, मराठीत म्हणता येईल: ‘लोकांना पुन्हा समुद्राकडे घेऊन जाताना …’. ह्या मोहीमेचं वैशिष्ट्य म्हणजे मोहीम सुरू झाल्यापासून १०० दिवसांच्या आत हे काम पूर्ण करून, त्याचे हिशेब लोकांसमोर सादर करून आम्ही परत देखील आलो. माझ्या अनुभवातील आपत्कालीन कामातील हे सर्वात उत्तम व्यवस्थापन असलेलं काम. ह्यानं मला “आपत्कालीन व्यवस्थापन” शिकवलं आणि आम्हीही ह्यातून एक उत्तम वस्तुपाठ शिकलो.

अशा खूपशा मोहीमांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचं एक कारण म्हणजे मी  “आपत्कालीन” कामात अग्रणी अशा जागतिक पातळीवरील Oxfam नावाच्या संस्थेत आठ-नऊ वर्ष होतो, त्यात काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या क्षेत्राच्या बाबत खूप शिकताही आलं.

विद्यार्थी होतो तेंव्हा १९७८ साली आंध्र वादळ झालं तेंव्हा पुण्यात मदत गोळा करण्याचं काम केलं. तेंव्हा आम्ही विद्यार्थी संघटनेत काम करत होतो आणि तेंव्हा विद्यार्थी संघटना शैक्षणिक विषयांवरच्या लढ्यांबरोबरच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दे, कामगारांच्या संपात पथनाट्य कर अशीही कामं करायच्या. तसंच आंध्र किनारपट्टीवर वादळ आलं आणि आम्ही पुण्यात मदत गोळा केली. नंतर ऐकलं ते भोपाळ गॅसगळतीचं प्रकरण. तिथेही आमच्या मित्रांपैकी काहीजण काम करायला गेले होते.

मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव आला तो मराठवाड्याच्या १९९० च्या दुष्काळात, मग लातूर च्या भूकंपात, जबलपूरला झालेल्या भूकंपात, ओरिसातील भीषण दुष्काळात, उत्तराखंड भूकंप, मध्य प्रदेश पूर, भूज भूकंप, सुनामी, कोकण पूर, “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” ही विदर्भ मराठवाड्यातील मोहीम, उत्तराखंड प्रलय आणि इतर एक-दोन आपत्कालीन प्रसंग. अशा सगळ्या प्रसंगातून गेलो. प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. प्रेतं काढणं, अगदी घाईनं मदत पोचवणं, त्यासाठी मैलोनमैल चालणं, योग्य माहिती घेणं, लोकांना तात्पुरता आसरा उभारणं ह्यासारखी कामं..

माणसाच्या वाट्याला असे प्रसंग पहाण्याचं येऊ नये, पण असे प्रसंग माणसाला पार बदलवून टाकतात हे मात्र खरं.

आपण किती तयार आहोत, किती तत्पर आहोत ह्याची कसोटी अशा प्रसंगात लागते.

मला आठवतंय भूज भूकंपाआधी मी फारच फीट होतो. एकदम तंदुरुस्त. अगदी नियमीत व्यायाम होता, रोजचं लांबवर चालणं होतं. त्याचा उपयोग झाला. तुमची शारिरीक तंदुरुस्ती किती आहे, मानसिक-भावनिक किती आहे, तुमचं व्यवस्थापन कसं आहे, पटकन निर्णय घेण्याची तुमची क्षमता कशी आहे ह्या सर्वांची कसोटी तिथे लागते. म्हणून माणसानं तत्पर असावं, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी असावी. तशी मेहनत घेत रहावं, तशी मनोधारणा असावी. म्हणजे कधीही कुठेही काहीही प्रसंग आला तरी अडचण येत नाही.

अशा प्रसंगात काम केलं की एक मनोधारणा बनते.

आज हे सगळं आठवतंय अशासाठी की महाराष्ट्रावर असा कुठलाच प्रसंग कधीही येऊ नये, पण तसा आलाच तर आपली तयारी आहे का? असं एखादं संकट येतंय असं ओळखण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे का? आलं तर तशी तत्परता आहे का? मानसिकता आहे का? तसं प्रशिक्षण आहे का? असे प्रसंग येऊच नयेत म्हणून आपण काळजी घेतोय की नाही? आणि, आलेच तर आपलं कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून आपण तशी व्यवस्था लावली आहे का?

ह्या सर्वाचं उत्तर नाही असं आहे.

मला एक वाक्य आठवतंय: “म्हटलं आहे : युध्द आणि शांतता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. य़ुध्द आपण करतो शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शांतता असते तेंव्हा आपण तयारी करतो युध्दाची. ..” तसंच आहे. आत्ता काही संकट नाही म्हणून ते आलं तर कसं वागायचं? काय करायचं? ह्याची आपली तयारी आहे का?

अत्यंत खेदानं ह्याचं उत्तर “नाही” असं द्यावं लागेल.

ह्यावर आपण विचार करणार आहोत की नाही? आज ह्यादिवशी इतकंच… आणखी काय?


अनिल शिदोरे

शनिवार, फेब्रुवारी २२, २०१४

मी शाळेत प्रवेश घेतला ..

मी शाळेत प्रवेश घेतला .. 


एक प्रश्न आपल्याला सतावतो आहे. 

शिक्षणातले तज्ञ म्हणतात मातृभाषेतून शिक्षण हवं. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की मूल सर्वात चांगलं शिकतं ते त्याच्या आईच्या भाषेत किंवा जी भाषा ते मूल आईच्या पोटात असल्यापासून ऐकतं त्या भाषेत. 

अजून तरी महाराष्ट्रातल्या मुलांची आई इंग्रजीतून किंवा हिंदीमधून बोलत नाही. ती फार तर मराठीच्या ऐवजी अहिराणी मधून किंवा कोरकूमधून बोलेल पण इंग्रजीत नाही बोलणार. 

मग असं असतानाही महाराष्ट्रात इंग्रजीच्या शाळा का वाढताहेत? आपला सर्वांचा ओढा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा का? 

शिकणं म्हणजे जगाचं ज्ञान घेणं. कल्पना-संकल्पना समजून घेणं. अंक समजणं, जी एक संकल्पनाच आहे, ते अंक समजणं. भाषा समजणं, त्या भाषेचा वापर करता येणं. जगाचा शोध घेणं. त्यातून चांगला माणूस होणं. 

शिक्षणात, आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणात, म्हणूनच आपल्या आईच्या भाषेतून शिकणं किंवा परिसराच्या भाषेतून शिकणं महत्वाचं. त्यातून त्या लहान मुलाच्या संकल्पना स्पष्ट होतात, ते मूल जिज्ञासू होतं, शहाणं आणि समंजस होतं. 

मग असं असतानाही इंग्रजीच्या शाळा का वाढताहेत? सर्वत्र इंग्रजीचा अट्टाहास का बळावतोय? 

आपली मुलं मराठी किंवा आपल्या आईच्या भाषेतून शिकलीच नाहीत तर त्यांच्या संकल्पना विकसित होणार नाहीत. ती उत्सुक, जिज्ञासू किंवा शहाणी होणार नाहीत. मग अशी नीट न शिकलेली माणसं घेऊन आपण चांगला समाज कसा घडवू शकतो?

मग आपण इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना का घालतो? इंग्रजीचा अट्टाहास का धरतो?

ह्या प्रश्नाला आपली काही नेहमीची उत्तरं आहेत. ती उत्तरं अशी. 

इंग्रजी शिकलं की आपण पुढे जातो. 
इंग्रजी शिकलं की आपल्याला नोकरी मिळते. आपली प्रगती होते. 
बाकी नाही का इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना घालत, म्हणून आम्हीही घालतो. 
इंग्रजी शाळा चांगल्या असतात. तिथं गेलं की आपली मुलं टिपटाॅप रहातात, स्मार्ट बनतात. आता स्मार्ट नाही तर काही नाही. 
इंग्रजी नाही बोललं तर लोक मागासलेला म्हणतात. 
सध्याचं जग इंग्रजीचं आहे. आपल्याला मागे पडून चालणार नाही, पुढे जाण्यासाठी इंग्रजी हवंच. 

बाकीच्या देशात काय आहे? जपानी मुलगा प्राथमिक शिक्षण जपानीत घेतो की इंग्रजीत? जर्मन मुलगी काय करते? रशियन? फिनीश? बहुतांश देशात मातृभाषेतून शिक्षण आहे. मग ते मागे पडतात का?

अजून एक म्हटलं जातं. 

आपल्या देशात ज्या समाजांनी इंग्रजीची कास धरली ते पुढे गेले. मग बाकीच्या समाज घटकांनी तसंच केलं तर चुकलं कुठं? त्यांच्यात जी विषमता राहिली आहे ती कशी कमी होणार?

आणि, समजा शिकलीच आपली मुलं इंग्रजीत तर काय बिघडणार आहे? इंग्रजीतून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होणार नाहीत का? 

अशी अनेक मतंमतांतरं आहेत. जे असेल ते असो, सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचं प्रमाण वाढतंय, त्यांचं करायचं काय? ते थांबवायचं तर कसं आणि कशासाठी? हे चक्र एकदम कसं फिरवायचं? तसं फिरवण्याची गरज आहे का? हा समाजाचा इतका महत्वाचा प्रश्न तरी आहे का?

एक खरं आहे की माझी भाषा ही माझी ओळख आहे. माझी भाषा हे माझं अस्तित्व आहे. माझी भाषा गेली की माझी ओळख जाईल. मी टिकेन पण एक जागतिक माणूस म्हणून. त्यात मी कोण आहे ह्याला महत्व रहाणार नाही. मी आहे एव्हढंच महत्वाचं रहाणार आहे. मी एक ग्राहक म्हणून, एक पेशंट म्हणून किंवा एक विक्रेता म्हणून शिल्लक राहीन पण एक मराठी म्हणून शिल्लक रहाणार नाही. पण, एक मराठी माणूस म्हणून शिल्लक रहाण्याची काय गरज आहे? समाजाच्या ओघात नाही का कित्येक गोष्टी संपल्या. टांगा गेला, रिक्षा आली. नाणी गेली, नोटा राहिल्या. विटी-दांडू गेला, कंप्युटर गेम्स आले. वाडे कोसळले, अपार्टमेंट्स झाली. काय बिघडलं? काळाच्या ओघात खूप गोष्टी गेल्या. 

ह्याच चालीवर, भाषा गेली तर काय बिघडलं? असं म्हणता येईल. 

नुसतं शाळेचं माध्यम बदललं तर आपण भाषा संपेपर्यंत जाऊन पोचलो. 

भाषा म्हणजे जशी आपली ओळख तशी भाषा म्हणजे संस्कृती. माझी संस्कृती म्हणजे माझं वेगळेपण. माझं वेगळेपण हीच माझी ओळख.   

आणि, टांगा गेला तसं किंवा विटी-दांडू गेला तशी भाषा जाणं योग्य नाही. कारण, भाषा म्हणजे काही वस्तू नाही की कुठला माल नाही.       

पण सर्वत्र शिक्षणात तर इंग्रजी, इंग्रजी चाललंय मग करायचं काय? 

एकदम काहीतरी फारच क्रांतीकारक, न पचणारं, न पटणारं एकदम सुचवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला बदल करायचा तर टप्प्याटप्प्यानं करायला हवा. 

आपण चांगल्या मराठी माध्यमाच्या पण त्यात उत्तम इंग्रजी शिकता येईल अशा शाळा काढू. जिथं भाषा म्हणून इंग्रजी शिकवली जाईल, फक्त ‘पावनखिंड’ शिकायची तर ती इंग्रजीत नको. ती आईच्या भाषेत शिकू. 
जिथं अहिराणी, कोरकू, मालवणी अशा भाषा आहेत तिथंही प्राथमिक शिक्षणात त्या भाषांचाही वापर करून मुलांच्या साध्या संकल्पना तरी पक्क्या करुन घेऊ.
मराठी शाळा, जिथं फार चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि जिथं इंग्रजीही फार उत्तम शिकवलं जातं अशा शाळांना, विशेष महत्व तर देऊच पण एक वेगळी प्रतिष्ठाही देऊ. त्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय वातावरणात स्पर्धेत टिकून अव्वल होऊ शकू असं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. 
महाराष्ट्रावर प्रेम असलेल्या, मराठी भाषा टिकावी, वाढावी असं वाटतं अशा, मराठीवर प्रेम असलेल्या आपण प्रत्येकानं अशी शाळा निघावी, चालावी, त्यात अधिकाधिक मुलांनी यावं, शिकावं, मोठं व्हावं, मोठा विचार करावा म्हणून प्रयत्न करावेत. तिथं आपल्या मुलांना घालावं. 

अशा एका तरी शाळेला जोडून घ्यावं.

मराठीतून दर्जेदार शिक्षण देणारी शाळा टिकली तर मराठी टिकेल.
मराठी टिकली तर मी टिकेन. 
मी टिकलो तर माझी माणसं टिकतील.
माझी माणसं टिकली तर ती मोठी होतील.
ती मोठी झाली तर मी मोठा होईन.   

मी अशी एक शाळा निवडली आहे. तिथं मी आत्ताच प्रवेश घेतला आहे.



अनिल शिदोरे
२२ फेब्रुवारी २०१४