रविवार, जून ०९, २०१३

उत्कटता


उत्कटता

आपली उत्कटता संपत चालली आहे का? असा प्रश्न मला सध्या वारंवार पडतो. 

पूर्वी एखादा चित्रपट पहिल्याच दिवशी पहायला मिळावा ह्यासाठी आम्ही पहाटे उठून थिएटरबाहेर रांगा लावायचो. तो चित्रपट मग आमच्या अंगात शिरायचा. दोन दोन दिवस त्याचा परिणाम जायचा नाही. मग दिसेल त्याला आम्ही त्या गोष्टी सांगायचो. तो चित्रपटही पुन्हा पुन्हा पहायचो. जसं चित्रपटाचं तसंच पुस्तकांचं. तसंच आवडत्या गायक-गायिकांचं. मला आठवतंय एकेका गोष्टीनी आम्ही झपाटलेले होऊन जायचो. 

सध्या तशी उत्कटता दिसत नाही. दिसत नाही की मला माहीत नाही?

सध्या एखादा चित्रपट २० थिएटर्स मध्ये ५-५ खेळ करतो. त्यामुळे त्याचं तिकीट मिळवणं ही काही फार मोठी गोष्ट नसते. हे जसं चित्रपटांचं तसंच गाण्यांचं, पुस्तकांचं. तंत्रज्ञानामुळे म्हणा किंवा बाजारातल्या स्पर्धेमुळे म्हणा आज गोष्टी सहज मिळताहेत. गोष्टी सहज मिळाल्या, कष्ट कमी झाले आणि उत्कटता कमी झाली. 

हे जसं चित्रपटाविषयी किंवा गाण्याविषयी, तसंच ते इतर बाबतीतही दिसतं आहे. माणसाला त्याच्या भवतालाविषयी, त्याच्या कामाविषयी, त्याच्या छंदांविषयी, कुटुंबाविषयी, त्याच्या माणसांविषयी पूर्वी जेव्हढी ओढ वाटायची तेव्हढी हल्ली वाटत नाही की काय असं सध्या वाटू लागलं आहे. सर्वच वरवरचं, सर्वच फुटकळ. सर्वच तेव्हढ्यापुरतं, सर्वच उथळ होत चाललेलं आहे. 

हे चांगलं नाही. माणसाच्या जगण्यातली उत्कटता जराजरी कमी झाली तरी त्याच्या जगण्यातला तोल बिघडू शकतो. तो बिघडणार कसा नाही ह्याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. निदान आपल्यापुरती तरी. 


अनिल शिदोरे