बुधवार, डिसेंबर ०४, २०१३

प्रत्येकाला कट्टा हवा ...

प्रत्येकाला कट्टा हवा  ...

साधारण १९७७ सालच्या मे-जूनच्या आसपास टॅटो मला कॅफे डिलाईटला घेऊन गेला आणि मला एका महान कट्टा संस्कृतीचं दर्शन झालं. महान आणि आद्य अश्या कट्टा संस्कृतीचं. ते दर्शन झालं आणि माझ्या आयुष्यातील एका सर्वात रोमांचक आणि रोमहर्षक काळाची सुरुवात झाली.

आयुष्य, महान, काळ, रोमांचक, रोमहर्षक अश्या शब्दांमुळे तुम्ही दचकाल कारण हे किंवा ह्याच्या समानार्थी इंग्रजी शब्द वापरून वापरून इतके गुळगुळीत झाले आहेत की त्याची रयाच गेलीय, पण खरोखरच वयाच्या अठराव्या वर्षी कट्टा संस्कृतीनं माझ्यासाठी जो एक दरवाजा उघडला तो केवळ कमाल होता.

हा टॅटो मला त्या दिवशी भेटला नसता आणि त्यानं मला कॅफे डिलाइटला नेलं नसतं तर माझं काय झालं असतं ह्याची कल्पनाही मला आज करवत नाही. मी माझा राहिलो नसतो काहीतरी वेगळा झालो असतो हे उघड आहे, परंतु तसं ते खूपश्या प्रसंगांच्या बाबतीत म्हणता येतं. म्हणजे असं की मी पुण्यात जन्माला आलो नसतो आणि नागपूरला आलो असतो तर माझं जीवन नक्की बदललं असतं किंवा माझी आई शिक्षिका नसती आणि वकील असती तर माझी जडणघडण फारच वेगळी झाली असती किंवा पुण्याऐवजी विशाखापट्टणम अथवा वाराणशीला माझा जन्म झाला असता तरीही माझं जीवन फारच वेगळं झालं असतं. त्यामुळे प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग तुमच्या जगण्याला काही ना काही तरी आकार देत असतेच.

म्हणतात ना, आयुष्यातला प्रत्येक क्षण कमी अधिक प्रमाणात तुमचं आयुष्य घडवत असतो. एखादा शिल्पकार त्याच्या छिन्नी-हातोड्यानं ठक ठक करत शिल्प घडवत असतो तसं. प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक प्रसंगाचं काहीतरी देणं-घेणं असतंच. फक्त त्या अर्थानं नव्हे पण ह्या कट्टा संस्कृतीनं माझं सगळंच जगणं, त्यातला अनुभव घेणं अगदी मुळापासून अमुलाग्र बदलून टाकलं ह्यात वादच नाही.

त्या दिवशी मी आणि टॅटो फिरायला गेलो होतो. संध्याकाळी. त्याचा चेहरा मला नेहमीसारखा वाटत नव्हता, काहीतरी झपाटल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता.

“तुला आदिवासी कसे जगतात ते माहितीय का?” असं मला टॅटो नी तेंव्हाच्या तळ्यातल्या गणपतीपाशी आणि आत्ताच्या सारसबागेत फिरताना विचारलं आणि “ऐकलंय त्याविषयी पण नेमकं सांगता नाही येणार” असं काहीसं त्याला म्हणालो. त्यानं मग मला काय काय सांगितलं. आदिवासी म्हटलं की ती पिसं लावलेली, शेकोटीपुढे नाच करणारी माणसं असं आपल्याला वाटतं पण प्रत्यक्षात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तीही माणसंच आहेत, त्यांचेही प्रश्न आहेत असं काय काय तो बोलत राहिला आणि मग मला तो कॅफे डिलाईटला घेऊन आला.

डिलाइट. डेक्कन जिमखान्यावर गुडलक च्या तिरक्या बाजूला समोर फर्गसन रस्त्यावर आतल्या बाजूला असलेलं एक बैठं कॅन्टीनवजा रेस्टाॅरंट. उजव्या बाजूला एक भाजीचा स्टाॅल आणि डावीकडे पानाचं दुकान ह्यामधल्या एका लांबुळक्या जागेत उजव्या बाजूला सायकलींची चवड ठेवलेली असे. डावीकडे भिंत. तिथं यायचं आणि उजव्या बाजूच्या जागेत सायकल लावायची आणि आत जायचं. आतमध्ये अंगणात टेबलं टाकून भोवती खुर्च्या टाकलेल्या असतात तसा एकूण सीन. तिथं आठ-दहा टेबलं. वर निळसर रंगाची ताडपत्री. बाजूला फुलझाडं, वेगवेगळ्या रंगांची. काही कुंड्या. मूळ हिरवट रंग असलेल्या पण रंग उडालेल्या लोखंडी खुर्च्या. सर्वत्र सिगरेट्सचा धूर.

आतल्या बाजूला अधिक अंधार पण तिथेही सिगरेट्स चा धूर. वरून टांगलेले दिवे. तिथंही सात अाठ टेबलं, पुन्हा आत अजून दोन खोल्या, थोड्या छोट्या. तिथंही चार चार टेबलं. ही आतली जागा आपल्या बरोबर एखादी मुलगी असेल तर तिच्याशी बोलत बसण्याची. पलीकडल्या बाजूला पुन्हा एक मोकळी जागा, तिथेही आठ-दहा टेबलं. तिथंही सिगरेट्सचा धूर आणि वेगवेगळ्या सिगरेट्सच्या वेगवेगळ्या वासानी निर्माण झालेला एक वेगळाच काॅकटेल वास. जो अजूनही मला कधीकधी येत असतो.

माझी ह्याची पहिली आठवण अगदी पक्की लक्षात आहे. तिथं दुपारच्या वेळेत गेलो होतो. दोन किंवा तीनचा सुमार असेल. माझ्यापेक्षा वयानं बरीच मोठी अशी दोन-चार जणं तिथं अगोदरच बसली होती. बाहेर मोकळ्यावर न बसता टॅटो मला घेऊन सरळ आत गेला आणि तिथं आम्ही बसलो. तिथं पहिल्या दिवशी काय बोललो ते माझ्या लक्षात नाही, पण त्या वातावरणानं मला इतकं घेरलं की मी रोजच तिथं जात राहिलो ते पुढची सुमारे दहा वर्षं. रोज म्हणजे अगदी रोज.

काॅलेजची परिक्षा असो की एखादा सण. गावात एखादा उत्सव असो की घरचा काही कार्यक्रम. डिलाईट ला गेल्याशिवाय आमचा दिवस सुरु व्हायचा नाही आणि संपायचा नाही. काॅलेज ११ ला असेल तर अगोदर १० मिनिटं का होईना पण डिलाइट ला जाउन मगच पुढे जाण्याचा शिरस्ता. अर्थात आम्हाला कुणालाच शिक्षणाची वगैरे कुठली पर्वाच नव्हती. मला आठवतंय अहमदाबादला रहाणारा माझा भाऊ सुधीर हा जेंव्हा अचानक पुण्याला आला तेंव्हा घरी जाण्याअगोदर तो डिलाईटला आला. तिथे मी नव्हतो कुठेतरी बाहेर होतो तर त्याला माझा ठावठिकाणा मोबाईल नसताना बरोब्बर कळला आणि रात्री का होईना पण आम्ही भेटलो. मला माझ्या काही मित्रांची पत्रंही “केअर आॅफ डिलाईट” म्हणून तिथल्या पत्त्यावर आली आहेत. इतका पुढची दहा-अकरा वर्ष मी डिलाईटला येत राहिलो. अगदी न चुकता. नंतर हळू हळू माझं येणं कमी झालं आणि जेंव्हा डिलाइटचे मालक भट अचानक वारले, त्या लोकांनी मग डिलाइट पाडण्याचाच निर्णय घेतला तेंव्हाच आमचा हा कट्टा संपला. हा कट्टा अक्षरश: नेस्तनाबूत झाला आणि मग तिथल्या आद्य सदस्यांनी रूपाली, वैशाली चा आसरा घेतला, पण डिलाईटची मजा काही तिथं आली नाही.

आज पंचवीस-तीस वर्ष झाल्यावर मला प्रश्न पडतो की असं नेमकं काय घडलं की एका लोहचुंबकासारखा मी डिलाइटकडे खेचला गेलो? आणि, त्याची ओढ पुढची दहा वर्ष तरी राहिली? माझ्या मते आपल्या, म्हणजे माणसाच्या जडणघडणी मध्ये कट्टा नावाच्या सामाजिक संस्थेचं म्हणून एक स्थान आहे आणि ते त्याच्या जीवनसूत्रांमध्ये बसलेलं आहे. त्याचं आकर्षण म्हणूनच मी तिथं जात राहिलो.

म्हणजे बघा, माणूस जेंव्हा जंगलात रहात होता तेंव्हा तो काय करत होता? तो सकाळी लवकर उठून जंगलात जायचा. तिथं दिवसभर ़फिरून शिकार करायचा, कंदमुळं जमवायचा, फळं खायचा आणि ती घरी घेऊन यायचा. आल्यावर लवकर सूर्यास्ताच्या सुमारास तो किंवा ती इतरांबरोबर जेवायचे आणि मग एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून दिवसभरातले आपले अनुभव सांगत, गप्पा गोष्टी करत, चेष्टा-मस्करी करत मिळणारा अनुभव एकमेकांना सांगत झोप आली की झोपून जायचे. किमान लाख-दोन लाख वर्ष तरी हे चालू असावं. हा आपला पहिला कट्टा. बरीच म्हणजे अक्षरश: लाखो वर्ष चालू असलेला. अनुभव घेणं, तो वाटणं, जमलेल्या माहितीचं पृथ्थकरण करणं आणि त्यातून ज्ञान मिळवत रहाणं ही गोष्ट आपल्या अंगात, रक्ता-मांसात भिनली आहे. रात्रीचा हा कट्टा, तो लाकडाचा ओंडका, किंवा थंडी असेल तर ती शेकोटी आणि त्याच्या भोवतालच्या गप्पा ह्याच ज्ञान मिळवण्याच्या, त्यातून नवे शोध लावण्याच्या आणि त्यातून माणूस म्हणून प्रगती करण्याच्या माध्यम ठरल्या. हा कट्टा, तो ओंडका किंवा ती शेकोटी माणसाच्या जडणघडणीतील महत्वाच्या सामाजिक संस्था आहेत, फक्त एकच की लग्न, कुटुंबं, शाळा ह्या सारखी आैपचारिकता त्यानं स्विकारली नाही. किंबहुना अनाैपचारिकता हाच त्याचा स्थायीभाव असल्यानं त्या तशाच राहिल्या.. ह्या अशा गोष्टी माणसानं जर भान ठेवून काळजीपूर्वक सांभाळल्या नाहीत तर त्या संपतात, तश्या त्या संपल्या देखील.

त्यादिवशी टॅटोनं मला एका आद्य अश्या सामाजिक संस्थेचीच भेट घडवली.

ह्या कट्ट्यावर मग मी खुपच रमलो. त्यानंतरही मराठवाड्यात पाण्याचं काम करताना मराठवाड्यात, गडचिरोलीत मेंढा गावात सहभागी लोकशाहीचा प्रयोग शिकताना विदर्भात, महाराष्ट्र वाद-संवाद सभेचं काम उभं करण्यासाठी जमताना ग्रंथालीच्या निमित्तानं मुंबईत आणि मेळघाट मध्ये काम करताना मेळघाट मित्रचा कट्टा मी अनुभवला आणि अजूनही अनुभवतो आहे. ह्या सर्व कट्ट्यांनी मला बळ दिलं, जगण्याचा अर्थ दिला, उर्मी दिली आणि अगदी सोन्यासारखे मित्र दिले.

नुकतं शहाणं होता होता स्वत:च्या डोळ्यानं आम्ही जगाकडे पहायला लागलो आणि आम्हाला डिलाईट भेटलं. ह्या डिलाईटच्या प्रत्येक टेबलवर वेगवेगळ्या विषयांवर एक कप चहावर, किंवा कधी कधी तो ही नसायचा, वेगवेगळे विषय चालू असायचे. साधारणपणे पाहिल्या भागातल्या टेबलवर एका तरी ठिकाणी चित्रपट हा विषय असायचाच. तिथं श्याम किंवा सत्या नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाची गोष्ट तरी सांगत असायचे किंवा कुठल्यातरी चित्रपटाचा संपूर्णपणे किस काढला जायचा. पलीकडे साहित्याची चर्चा असायची. तेंव्हाचे नेमाडे-चित्रे किंवा खानोलकर ह्यांच्या साहित्याची पारायणं तर चालायचीच पण त्यांची कडवट चिकित्सादेखील असायची.

पलीकडे एखाद्या टेबलवर सामाजिक आंदोलनं, विद्यार्थी संघटना किंवा काही राजकीय चर्चा चालू असायची. आणिबाणी नुकतीच संपलेली होती आणि देशभर एका परिवर्तनाचं वेगळं वारं वाहू लागलं होतं. त्याचं प्रतिबिंब हमखास दोन-चार टेबलांवर असायचं. एखाद्या टेबलावर रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचा कोर्स करणारी मंडळी असायची आणि सायन्स फिक्शन किंवा विज्ञानातील शोधांवर जोरजोरात चर्चा करणारीही बरीचजणं होती. तुम्हाला जे हवं ते. ज्या विषयात रस असेल तो विषय. डिलाईट म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर कट्ट्यांचा मेगामाॅलच होता. ज्यात विषयाला मर्यादा नव्हती. एक सतत चालणारा ज्ञानयज्ञच होता तो. सर्वांनीच त्याच्याकडे ज्ञानयज्ञ म्हणून पाहिलं नसेल कदाचित, पण घडलं मात्र तसंच.

कुणी चर्चा करण्याची किंवा गप्पा मारण्याची तहान म्हणून येत होते तर कुणी मित्र हवेत म्हणून. कुणी मैत्रीण हवी म्हणून तर कुणी माझा चांगला मित्र इथे येतो म्हणून येत होते. साधारण रोज तिथं येणारी २०० ते २५० मुलं-मुली तिथं होती. साधारण १० ते १५ वर्ष हा कट्टा - डिलाइट - अत्यंत दिमाखात चालू होता. अामच्या अनेकांच्या जडणघडणीत त्याचा खूप खूप मोठा वाटा आहे.

नंतर काळ बदलायला लागला.

भट गेले म्हणा किंवा नंतर जागेच्या किंमती पहाता इतकी मोठी जागा अश्या एखाद्या कट्ट्याला देणं हे अशक्यच होऊ लागलं आणि आर्थिक रेट्यानं हळूहळू पुण्यातलं डिलाइट संपलं. पुण्यात त्यावेळी डिलाइट बरोबरच आणखीही कट्टे होते. उदय विहारचा एस.पी. चा कट्टा, वैशाली-रुपाली, भरत चा, पॅरेडाइज ह्या इराणी हाॅटेलचा नाटकवाल्यांचा किंवा सनराईजचा पत्रकारांचा कट्टा. मंडईपासचा मार्केट टी स्टाॅलचा राजकीय कट्टा किंवा रात्री उशीरा गरवारे काॅलेजसमोर अनिल कडे पानाबरोबर गप्पा रंगवण्याचा कट्टा. कट्टा हा त्यावेळच्या सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य असा भाग होता.

कट्टा बनायला आणि फुलायला आणि नावारुपाला यायला काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे जागा ऐसपैस आणि मोक्याची हवी. लोकांना निवांत वेळ हवा. गप्पा रंगवणारी, गप्पा मारण्याच्या कलेत निष्णात असणारी काही म्होरकी मंडळी हवी. एका कमालीची अनाैपचारिकता हवी. एक निकोप, स्वच्छ वातावरण हवं आणि एखादा तरी सर्वसाधारण विषय हवा, सर्वांना भावलेला, सर्वांनाच ओढ असणारा. नुसतंच काहीही नेमका विषय नाही आणि कट्टा वर्षानुवर्ष चालू आहे असं फारच कमी दिसतं. कुठे क्रिकेट, कुठे ट्रेकिंग-गिर्यारोहण, कुठे सिनेमा, कुठे राजकारण अश्या कुठल्या ना कुठल्या विषयाभोवती हा कट्टा बांधलेला असतो आणि मग वर्षानुवर्ष तो चालूही रहातो. एकदा का अश्या ठिकाणी एखाद्याच कुणाचं तरी स्तोम किंवा रुसवे-फुगवे, राग-लोभ सुरु झाले की मग कट्ट्याला तडे जाऊ लागतात.

अश्या कित्येक कट्ट्यांनी जगात इतिहास करून ठेवल्याचीही उदाहरणं आहेत. साठ आणि सत्तर च्या दशकाच्या आसपास फ्रांसमध्ये असलेल्या कॅफेजनी विद्यार्थी आंदोलनाला प्रचंड उर्जा दिली. स्पेनमधल्या पब्जनी माॅन्ड्रॅगन प्रांतात एक सामाजिक परिवर्तन घडवून आणलं. मुंबईचा शिवाजी पार्कचा कट्टा, रूईयाचा कट्टा ह्यांनी साहित्यिक-सांस्कृतिक- राजकीय विश्वात कित्येक गोष्टी घडवल्या. छबिलदास च्या कट्ट्यानं नाट्यक्षेत्रात नवनवे पायंडे पाडायला सुरुवात झाली. ग्रंथालीच्या गच्चीवर - कट्टाच तो - कित्येक साहित्यिकांना उर्जा मिळाली, नवनवे विषय मिळाले, मराठी माणसाला नवे साहित्यिक मिळाले.

नव्या गोष्टी जन्माला घालण्याची ताकद कट्ट्यामध्ये असते. वातावरण मोकळं असतं. कुणाला कुणाची पडलेली नसते. कुणीही वरचा, कुणीही खालचा अशी उतरंड नसते. एक प्रकारचा बिनधास्तपणा असतो. नियमांची बंधनं नसतात. राग लोभ नसतो. सगळे समान असतात. बरेचदा खरे असतात. जे असेल त्याला प्रामाणिक प्रतिक्रिया देतात. संबंध जास्त घट्ट असतात.

डिलाइट हा एक मोठा कट्टा. मला भेटलेला पहिलाच. ह्या कट्ट्यावर मला कित्येक नवनव्या गोष्टी समजल्या. सिनेमाची आवड मला तिथेच लागली. नेमाडे मला तिथेच समजले, इराणमधलं राजकारण कळलं, मर्ढेकरांच्या कविता मी तिथेच वाचल्या, राय-घटक ह्यांची ओळख झाली. जेंव्हा जग समजून घेण्यासाठी डोळे उघडले तेंव्हा ही मंडळी समजली, ही मंडळी सांगणारे मित्र भेटले. डिलाईटनं जीवनाचं क्षितीज रुंदावलं. अश्या सात-आठ कट्ट्यांमुळं ते आणखी आणखी रूंदावत गेलं.

गडचिरोलीच्या जंगलात आमचा असाच एक कट्टा होता.

मेंढा जंगल अभ्यास गट असं त्याचं आैपचारिक नाव. ह्या मेंढा गावात मोहन आणि देवाजी तोफा सहभागी लोकशाहीचा एक शुद्ध प्रयोग करत होते. अजूनही करत आहेत. १९८९ ते १९९४ अशी पाच वर्ष हा अभ्यास गट दर तीन महिन्याला तीन दिवस जमत असे. मेंढा आणि त्याच्या आसपासचं जंगल ह्यांचा अभ्यास करणं हा उद्देश होता. त्यात पक्षीतज्ञ, पाणीतज्ञ, काही कायदा तज्ञ, सामाजिक काम करणारे, लढे उभारणारे अशी मंडळी होती. साधारणत: १२-१४ जणांचा हा गट अत्यंत नियमीतपणे चार-पाच वर्ष भेटत राहिला. त्यात कट्ट्याची सर्व तत्व होती. पूर्ण अनाैपचारिकता पण गटाचं काम चालु रहाण्याइतपत नियमांची एक हलकीशी चाैकट, गटाचे सर्वजण समान - कुणी जेष्ठ कुणी कनिष्ठ असं नाही, भेटण्यातली एक नियमीतता, सर्वांनी सर्वांचं ऐकून घेण्याची एक सर्वसाधारण पद्धत आणि जंगला अभ्यासाचं एक समान, शुद्ध सूत्र ज्यानं आम्ही सर्व एकमेकांना बांधले गेले होतो.

मेंढा गावात मी समाजशास्त्राविषयी जे शिकलो किंवा सहभागी लोकशाहीचे जे धडे घेतले ते मी कदाचित जगातल्या कुठल्याच मोठ्या विद्यापीठात कधीच घेऊ शकलो नसतो. कट्ट्याची ताकद आहे ती ही अशी.

आजकाल कट्टे दिसत नाहीत.

कदाचित माझा संपर्क कमी झाला असावा पण कट्टे ऐकू तर येत नाहीतच. माझ्या मुली म्हणतात कट्टे आहेत, पण बाबा ते तुला माहित नाहीत. तसं असेलही कदाचित पण कट्टे असल्याचं दिसत तरी नाही. एकतर सध्या लोकांना इतका वेळ नाही. काहीही मिळणार नाही, फक्त विशुद्ध गप्पा जिथं होणार आहेत अश्या ठिकाणी जाण्याची सध्याची पद्धत नाही. एक बिनधास्त अनाैपचारिकताही कमी कमी होत चालली आहे. कट्टा ह्या सामाजिक संस्थेची स्पेस फेसबुक-ट्विटरनं घेतली आहे पण कट्ट्याच्या थेट भिडण्याच्या आणि प्रत्यक्ष भेटीच्या पद्धतीला त्यानी पर्याय दिलेला नाही. रोजच्या धकाधकीत आणि पळापळीत आपल्याला कुणालाच कट्टा ही पद्धत जोपासण्याची फार उर्मी राहिलेली नाही. एका सांस्कृतिक आणि आर्थिक रेट्यानं हे कट्टे उद्धवस्त होत चालले आहेत.

मला आठवण होते ती ज्या पद्धतीनं ब्रिटीशांनी आदिवासी भागातली गोठूल ही सामाजिक संस्था उखडून काढली त्याची. पूर्वीच्या काळी प्रत्येक आदिवासी गावात गोठूल असे. जिथं गावातली १५-१६ ते २०-२२ वयाची मुलं आणि मुली एकत्र रहात, एकत्र खेळत, एकत्र स्वयंपाक करत. खेळता-खेळता त्यांना त्यांच्या स्वभावाविषयी, आवडी-निवडींविषयी माहिती होत असे. मग असंच एखाद्या पाैर्णिमेच्या दिवशी विधिवत ही मुलं-मुली आपला जोडीदार निवडत असत. स्त्री-पुरुष असे इतक्या छोट्या वयात एकत्र खेळले-बागडले असल्यानं समाजात एक निकोपता राहिली आणि ती निकोपता आदिवासी समाजाचं अंगभूत वैशिष्ट्यं बनली. ब्रिटीशांना ही गोठूल ही संस्था आदिवासींची एक अनैतिक संस्था वाटली आणि मग ब्रिटीशांनी ती तोडून मोडून काढली. नंतर मग ब्रिटीशच समाजशास्रजांनी ती चूक असल्याचं मान्य केलं.

एका अदृश्य शक्तीमुळं आजचे हे कट्टे नामशेष होत चालले आहेत. आपण भिशी, गप्पा ग्रुप, ट्रेकिंग ग्रुप, गणपती मंडळं, पार्टी ग्रुप अश्या मार्गे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण त्यात खूपच वरवरलेपणा येत चालला आहे. काही ट्रेकिंग ग्रुप किंवा सांस्कृतिक मंडळं अजूनही कट्ट्याचा तो विशेषपणा धरून ठेवून आहेत, पण त्यांची संख्या कमीच आहे.

कट्टा ही एक फार महत्वाची सामाजिक संस्था आहे. सामाजचं निकोपपण आणि समाजातील सृजनशिलता जपणारी. आपण ती गमावली तर आपण स्वत:चं फार मोठं नुकसान करून घेऊ. समाजाचा तोल त्यामुळं घालवून घेऊ.

कट्टा ह्या सामाजिक संस्थेनं माझं जगणं रोमांचित केलं. मला कुणी आज विचारलं की “काय रे, तू पुन्हा जगू शकतोस असं असलं तर तू कुठलं वर्ष निवडशील?” मी तात्काळ म्हणेन “ डिलाईट चं कुठलही वर्ष.” माझ्या अगदी शेवटया दिवशीही मला डिलाईटची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही. त्यातली ती अनाैपचारिकता, निकोपता आणि गप्पांची कला मी कधीच विसरू शकणार नाही.

म्हणूनच अजूनही मी अश्या कट्ट्याचा शोध घेत असतो.

मला वाटतं, सगळा समाजच खरं म्हणजे अश्या एका कट्ट्याचाच शोध कायमच घेत असतो. नाही का?





अनिल शिदोरे