शुक्रवार, मार्च ०८, २०१३

माझं माझ्या पुण्यावर प्रेम आहे, म्हणून




माझं माझ्या पुण्यावर प्रेम आहे, म्हणून:

कुणी विचारलं: “तुम्ही तुमचं आयुष्य जसं घालवलत तसंच पुन्हा जगायला तयार व्हाल का?” तर त्या प्रश्नाला नेमकं काय उत्तर देईन माहीत नाही, पण हे मात्र नक्की म्हणेन की: “जन्म व्हावा पुण्यातच आणि बालपणही जावं ते ही पुण्यातच”.
बदल मात्र एक छोटासा करीन. 
म्हणीन “बालपण पुण्यातच जावं पण काळ मात्र वेगळा असावा. तो सध्याचा नव्हे तर साठच्या किंवा फार तर सत्तर- ऐंशीच्या दशकातील पुण्यातला असावा. आजचा नको.”


देशात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले आणि पुण्याचा नूर पालटू लागला. माझ्या नोकरीनिमित्त मी १९८८ ला पुणं सोडलं आणि पुन्हा १९९५ च्या जूनमध्ये परत आलो. ह्या ७ ते ८ वर्षातला पुण्यातला बदल फारच लक्षणीय होता. ९५ नंतर तर त्या बदलानं आणखी वेग घेतला आणि पुढच्या १५-१७ वर्षात परिस्थिती खूपच पालटली. गर्दी वाढली. वहातूक कोंडी वाढली. शांतता कमी झाली. पुण्याचं पुणंपण बदललं. बदललं, पुण्याचं पुणंपण हरवलं असं मी म्हणणार नाही. 

गेल्या चारशे-पाचशे किंबहुना त्याहुनही अगोदरचा माणसाचा इतिहास पाहिला की दिसतं की माणसाची संस्कृती ग्रामीणकडून शहराकडे निघाली आहे. माणसाला शहराची ओढ आहे. त्याचा इतिहास हा शहरीकरणाचा इतिहास आहे. त्यामुळे शहराकडे माणसं येणारच. त्यात मग दुष्काळ, संकटात आलेली शेती ह्यामुळे रोजी-रोटीसाठी आणि भविष्य घडवण्यासाठी माणसांची पावलं शहराकडे वळणारच. तशी ती वळली आणि मग शांत, सांस्कृतिक वारसा असलेल्या, शैक्षणिक संस्थांचं जाळं असलेल्या आणि नव्या आैद्योगिकतेशी नाळ असलेल्या, पुरेसं पाणी असलेल्या शहरात माणसं आली, उद्योग आले, घरं बांधली गेली, नव्या-नव्या माणसांनी आपल्याबरोबर आपली संस्कृती आणली आणि पुणं आपली ओळख नव्यानं सांगू लागलं. 

पुण्याची वाढ झाली ह्यात काही फार गैर घडलं असं नाही. परिस्थिती अशी होती की पुणं वाढणारच होतं. जशी जगातली अनेक शहरं वाढली तसं. गडबड ही झाली की ती वाढ आपल्याला झेपली नाही, सोसली नाही. त्या वाढीचा अंदाज आपल्याला आला नाही. तो अंदाज घेण्याचा आपण शहर म्हणून, ह्या शहरावर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आपला प्रयत्न झाला नाही. 

जे झालं ते झालं, पण तो प्रयत्न आता करायला हवा. तो प्रयत्न आता करता येईल. 

‘पुणं संपलं‘ असा एक सूर काही लोकांचा असतो. मला ते पटत नाही. तो सूर फार निराशेतून आलेला आणि पुढचं काही दिसत नाही ह्या उद्विग्नतेतून आलेला असतो. ते काही बरोबर नाही. आपण एक पहायला हवं की पुण्यापेक्षा वाईट परिस्थिती असलेल्या कित्येक शहरांनी अत्यंत अवघड परिस्थितीतून आपला मार्ग काढला आहे. परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पुण्यालाही ते जमेल, पुण्यालाही मार्ग काढता येईल.

तो मार्ग काढायचा तर काय घडायला पाहिजे? ते का घडत नाही? 

असं म्हणतात की गावांचं, शहरांचं हे माणसासारखं असतं. त्याला बालपण असतं, तारूण्य असतं, वार्धक्य असतं. माणसासारखा त्याला आणि त्याचा म्हणून एक स्वभावही असतो. तो स्वभाव त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. परिस्थिती म्हणजे तिथला भूगोल, इतिहास, तिथला उद्योग, तिथे येणारी माणसं. ह्या सर्वामुळे परिस्थिती घडते. जेम्स लव्हलॉक ह्या शास्त्रज्ञानं तर पृथ्वी देखील एका जिवंत माणसाप्रमाणे आहे असं म्हटलं आहे. त्याचा “गाया” नावाचा सिद्धांत सुप्रसिद्ध आहे. शहराचंही तसंच जिवंत माणसासारखं आहे. शहरातील बागा शहराची फुफ्फुसं आहेत, तर रस्ते रक्तवाहिन्या. शहराचं उद्योगक्षेत्रं हात-पाय आहेत, तर शाळा आणि सांस्कृतिक संस्था आहेत त्या शहराची ज्ञानेंद्रियं. ह्या प्रत्येक गोष्टीला एक भूमिका आहे, कार्य आहे, त्याची त्याची एक जागा आहे. शहरातले नगरसेवक, महानगरपालिका ही सर्व मंडळी निर्णय घेतले जातात अश्या मेंदूचं काम करतात तर सामाजिक संस्था आणि नागरिकांचे अनाैपचारिक गट काम करतात काळजाचं. त्यामुळे शहराची तुलना आपण एका जिवंत माणसाशी करूच शकतो. त्यामुळे जसं माणसाचं होतं तसंच शहराचं. त्याच्यात असमतोल झाला किंवा ह्या सर्वात गडबड गोंधळ सुरु झाला की मग शहर आजारी पडायला लागतं. वेदनांनी कण्हायला लागतं. जे आता पुण्याचं व्हायला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. 

शहर आजारी का पडतं? वेदनांनी का कण्हायला लागतं? आणि, तसं असेल तर त्याला उपाय काय?

माणसाचं जसं वजन वाढतं तसंच शहर वाढतं. माणूस - समंजस माणूस - मग ठरवतो इतक्या इतक्या वजनापेक्षा आपण वजन वाढवायचं नाही. मग शहर - समंजस शहर - असं का ठरवत नाही? इतकी इतकीच लोकसंख्या शहर म्हणून आपण पेलू शकतो, त्यापेक्षा नाही, अशी मर्यादा पुणं का घालू शकत नाही? पुणं कितीही, केव्हढंही वाढावं, त्याला काहीही मर्यादा नाही हे कुणी ठरवलं? का ठरवलं? 

जगात अशी पुष्कळ शहरं आहेत की ज्यांनी किती वाढायचं हे ठरवलं. अगदी शहरातलं शहर न्यूयॉर्कनं सुद्धा आपली अनियंत्रित वाढ थांबवली, आपलं वजन आटोक्यात आणलं. पुणं हे का करू शकत नाही? जरा इकडे तिकडे पाहिलं की समजतं की पुणे शहराला जे नदीखोरं पाणी पुरवतं त्याच्या पाणी पुरवायला आता मर्यादा आहेत. अजून वाढत्या पुण्याला पुरेल इतकं पाणीच त्यात नाही. मग असं का होत नाही की किती वाढायचं हे पुणं का ठरवत नाही? की आपण किती वाढायचं हे ठरवण्याचा पुण्याला अधिकारच नाही? 

हे झालं वजनाचं. आपण परत एकदा माणसाचं पाहू. माणसाचं चित्त शाबूत असेल तर सगळं शाबूत आहे. चित्त हरवलं की सगळं संपलं. चैतन्य हरवलं. 

शहराचंही तसंच आहे. शहराचं चित्त शाबूत पाहिजे. चित्त म्हणजे संवेदना जागृत असणं. 

जागृत नागरिकांचे गट, त्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग ह्यानं शहराचं चित्त शाबूत रहातं. पुण्यात आज ते दिसत नाही. पुण्यात असे काही भाग आहेत की जिथे जगाला ज्ञान शिकवणारे, जागतिक किर्तीचे तज्ञ, विचारवंत रहातात. खरं म्हणजे असे लोक पुण्यात ठिकठिकाणी आहेत. उदाहरणंच द्यायचं तर एखाद्या गल्लीत जागतिक किर्तीचा नगररचनाकार रहात असतो, पण तो रहातो तिथल्या नगररचनेचं काय करायचं ह्यात त्याचा सहभाग नसतो. त्यालाही माहित नसतं काय चाललंय, किंवा माहीत करून घेण्याची गरज वाटत नाही किंवा आसपासच्या लोकांनाही माहीत नसतं त्या माणसाबद्दल. पुण्यात एका जागतिक किर्तीच्या पाणी तज्ञांकडे मी नेहमी जातो, जगातल्या समस्यांवर आम्ही तासंतास बोलत बसतो आणि  निघताना त्या भागात पाण्याची कशी ओरड आहे असं ते मला नेहमी सांगत असतात. ते रहातात तिथल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या अफाट माहितीचा उपयोग व्हावा असं होत नाही. का बरं असं होतं? स्थानिक माणसं तिथल्या तिथल्या साध्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पुढे का येत नाहीत? त्यांनी तसं यावं असं वातावरण आज पुण्यात का नाही? असं का होतं? शहराचं चित्त ठिकाणावर रहाण्यासाठी लोकांचा निकोप सहभाग का होत नाही? त्यात काय अडचण आहे? 

अजून एका गोष्टीत शहर माणसासारखं आहे. 

माणसाला दिसतं, शहरालाही दिसतं. शहराला दिसतं, ऐकू येतं, समजतं, बोलताही येतं, पण पुणे शहराला दिसतंच असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ  बघा: माझ्या कार्यालयाला जाताना पुणे शहरातील एक नामांकित चाैक ओलांडावा लागतो. अगदी प्रसिद्ध. गेली सात ते आठ वर्ष मी तिथे सिग्नलला थांबतो आहे, पण इतक्या काळात असं एकही दिवस घडलं नाही की कुणीही कायदा मोडला नाही. रोज कुणीतरी, म्हणजे एखादा माणूस तरी, लाल दिवा असतानाही जातो म्हणजे जातोच. एक जण तरी चुकीच्या बाजूने येतो म्हणजे येतोच. अगदी रोज बरं का. रोज. मी हे गेले सात-आठ वर्ष पहातो आहे. एक मात्र नक्की की ह्यात बदल होताना मला मात्र नक्की दिसतो आहे. आठ वर्षांपूर्वी एखादाच तोंड चुकवत पळ काढत दुचाकी दामटायचा. आता तो तोंड चुकवत जात नाही. मोठ्या अभिमानाने, छाती फुगवत जातो. तो काही चूक करतो आहे हे त्याच्या ध्यानीमनीही नसतं हे त्याचा चेहरा सांगतो. पूर्वी एखादा खट्याळ नाठाळ पोरगा सिग्नल तोडायचा, आता त्या चाैकापलीकडे असलेल्या शाळेतील मुलांचे पालक, शिक्षकही ते बिनदिक्कतपणे करतात आणि तरीही पुण्याला ते दिसत नाही. पूर्वी क्वचित होणारी गोष्ट आपल्या आता अंगवळणी पडली आहे, तो आता आपला स्वभाव बनला आहे. हे पाहून वाटतं साधे साधे वहातुकीचे नियम आपण का पाळत नाही? सरळ सरळ कायदा मोडणारी माणसं ह्या शहराला दिसत कशी नाहीत? 

शहर हे एका जिवंत प्राण्यासारखं आहे, असतं असं मानलं तर मग ते शहर म्हणजे पुणं, कसंही अवाढव्य का वाढतंय हे समजत नाही, त्याचं चित्त का ठिकाणावर नाही आणि दिसणं, ऐकणं, जाणवणं ह्यासारखी त्याची ज्ञानेंद्रियं का बधीर झाली आहेत?

पूर्वीच्या पुण्यात नव्या नव्या कल्पनांना धुमारे फुटायचे. साहित्य, कला, सांस्कृतिक उपक्रम ह्यांची रेलचेल असायची. सध्या मात्र इकडून तिकडे पळण्यातच पुणेकरांचा वेळ जातो आहे, त्यांची दमछाक होते आहे. चांगलं शहर म्हणजे कसं असायला पाहिजे? ते सुरक्षित हवं, सुसंस्कृत हवं, स्वच्छ हवं. चांगलं शहर चांगला शेजार देणारं असावं. सर्जनशीलतेला वाव देणारं असावं. शांत असावं.                

तसं चांगलं शहर आज पुणं नाही, पण ते होऊ शकेल. कारण, ते मेलेलं शहर नाही. अजून त्यात काहीच होणार नाही आणि ते नुसतं बिघडतंच जाणार अशी परिस्थिती नाही. त्यात नवं चैतन्य टाकावं लागेल आणि ते चैतन्य लोकच टाकू शकतील. ज्यांचं पुण्यावर प्रेम आहे असे पुणेकरच तो बदल करू शकतील. महानगरपालिका, नगरसेवक, प्रशासन, राज्य-सरकार ह्या संस्था असे बदल गतीमान करू शकतील, त्याला गती देऊ शकतील पण करणार स्वत: पुणेकरच. 

माझं ह्या शहरावर प्रेम आहे. देशभर आणि जगातही अन्यत्र फिरलो. मोठमोठी प्रतिष्ठीत, चकचकाट करणारी शहरं पाहिली. तिथं रहावं अशी संधीही मिळाली, पण मन कुठेच रमलं नाही. ह्या शहरानंच आपल्याला घडवलं हे पक्कं होतं. हे शहरच आपलं ह्यावर श्रद्धा होती, ते कोसळत असलं तरी.

आज अजूनही केंव्हातरी टेकडीवर गेल्यावर किंवा पर्वती चढताना, किंवा कॅम्पातील रस्त्यांवरून चालताना मला पुणं हाक मारतंय असा भास होतो. मंडईत भाजी घेताना किंवा पेठातल्या अरूंद रस्त्यांवरून फिरताना पुण्याला ठसका लागला आहे असं वाटतं आणि वाटतं पुणं मला विचारतंय: “इथे चांगला श्वास कुठे घेता येईल?” 

ते विचारल्यावर मग मला पुन्हा जाणीव होते. मागची दोन-तीन दशकं राहू दे, निदान येणारी दशकं तरी आश्वासक असतील का? पुण्यात आणि त्या काळात पुन्हा जन्म घेऊन बालपण काढावं असं मला वाटेल का?