सोमवार, मे २०, २०१३

आक्रमक आणि तरल


आक्रमक आणि तरल

बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारॉव्ह च्या यशात त्याच्या आईनं घेतलेल्या एका छोट्या पण मोठ्या निर्णयाचा खूप मोठा वाटा आहे. एका मुलाखतीत कास्पारॉव्हनी सांगितलं की त्याच्या आईनी त्याला बुद्धिबळ शिकवायला एका वर्गात पाठवलं तेंव्हाच त्याला साहित्य आणि कविता ह्याचेही संस्कार करण्यासाठी एका विशेष वर्गात घातलं. 

कास्पारॉव्ह पुढे मुलाखतीत म्हणतो: “बुद्धिबळासारख्या मनाला ताण येईल अश्या खेळात अवघड चाली आखताना मला एखाद्या कवितेतील ओळ किंवा त्यातली एखादी अद्भुत प्रतिमा प्रेरणा देते. कवितेतील त्या हळव्या शब्दांचा आधार घेऊन मला माझ्या अत्यंत कठोर, अत्यंत आक्रमक अश्या चाली बांधता येतात. कवितेच्या त्या तरल भावना कणखरता देतात. माझ्या आईचे माझ्यावर उपकार आहेत.”

आपल्या यशाचं गमक सांगताना त्याला त्याच्या आईच्या कवितांविषयीच्या प्रेमाची, तरलतेची आणि हळुवार भावनांची आठवण आली ही गोष्ट फार महत्वाची आहे.

कुठेही पहा. हळुवार आणि कणखर अश्या दोन्ही गोष्टी लागतातच. नुसतं एक असून भागत नाही, चालत नाही. आवाज नुसता मोठा असून उपयोग होत नाही, त्यात आशयही लागतो.

म्हणून, कडक आणि लवचिक, आक्रमकता आणि तरलता ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. तितक्याच प्रभावी आहेत. अगदी कुठेही.  

गुरुवार, मे १६, २०१३

आपल्याकडे मुक्त अर्थव्यवस्था आली आणि त्याचा आपल्या समाजमनावर काय परिणाम झाला?


विस्तारलेलं समाजमन


साधारण १९९०-९१ सालच्या आसपासची गोष्ट आहे

केरवाडीला माझा मित्र गरीब मुलांसाठी संस्था चालवत असे. केरवाडी हे गाव परभणी जिल्यातल्या गंगाखेड तालुक्यातलं. त्याच्या कामात मदत करण्यासाठी पुण्याहून माझं नेहमी जाणं होई. जायचं म्हणजे मार्ग एकच होता. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून रात्री ८ वाजता पुणे - परभणी ही रातराणी पकडणे आणि पहाटे पहाटे गंगाखेडला उतरून माझ्या मित्राची वाट पहाणे. आदल्या दिवशी किंवा त्याच्याही आधी कधीतरी गावात जो एकच फोन होता त्यावर त्याला निरोप दिलेला असायचा, त्यामुळे तो आला की मग त्याच्या मोटरसायकलवर बसून १६ किलोमीटरवर असलेल्या केरवाडीला पोचायचं हा आमचा नेहमीचा शिरस्ता होता. ह्यात बदल होण्याची शक्यता नव्हती आणि दुसरा पर्याय नव्हता. कित्येक वर्ष हे असंच चालू होतं आणि कदाचित असंच चालू रहाणार होतं.

१९९१ मध्ये आपण जागतिकीकरणाच्या प्रवाहाला जोडले गेलो, देशात नवं आर्थिक धोरण आलं. मात्र त्याचा परिणाम प्रत्यक्ष दिसायला दोन पाच वर्ष जावी लागली

१९९४ च्या आसपास पुण्याहून नांदेडला जाणारी खाजगी बस सुरू झाली आणि आम्हाला पर्याय मिळाला. त्यानंतर दुसरी, तिसरी अश्या कित्येक खाजगी बसेस धावू लागल्या. पेजर आले, गेले. मोबाईल आले आणि पुण्याहून केरवाडीला जाण्याची संकल्पनाच बदलली. बदल इतका प्रचंड होता की केरवाडीला जाण्याची काय एकूण सगळ्या जगण्याचीच संकल्पना बदलू लागली

हा परिणाम हा फक्त जागतिकीकरणाचा होता का हे मात्र नक्की सांगता येत नाही. एकाच वेळी अनेक क्षेत्रात अनेक बदल होत होते. एखादा भोवरा फिरतो तसं समाजातली बरीच अंगं तेंव्हाच फिरू लागली. देशाचं आर्थिक धोरण बदललं, जगाशी आपण जोडले गेलो त्याचवेळी जगात तंत्रज्ञानामध्येही अफाट बदल होत गेले. मुख्यत: माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. पॅकेजींगच्या क्षेत्रात, संगणक क्षेत्रात, जैव तंत्रज्ञानात (Bio Technology) ह्याच सुमारास मोठे बदल होत गेले. दूरदर्शनचा व्यापक प्रसार झाला. घरोघरी, हातोहाती फोन्ससारखं संपर्काचं माध्यम पोचलं. सामान्य माणूसही इंटरनेटचा वापर करू लागला. ह्या सर्वांचाच परिणाम आपल्याला २००० सालाच्या आसपास प्रत्यक्ष दिसायला सुरुवात झाली. बदलाची गती वाढली, विस्तार वाढला. समाजात एकूणच जे साचलेपण आलं होतं ते फुटलं. वहायला लागलं. देशात सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला बॅंकांचं राष्ट्रीयकरण झालं, संस्थानं खालसा झाली आणि नंतर आणिबाणी आली. त्यानंतर आलेलं १५ ते २० वर्षांचं हे साचलेपण होतं. जागतिकीकरणाच्या, माहिती तंत्रज्ञानातील बदलांचा आणि घरोघरी जागतिक दूरदर्शन वाहिन्यांनी पोचवलेल्या जगाचा आपल्यावर, आपल्या समाज मनावर चांगलाच परिणाम झाला

हा भोवरा कसा फिरला आणि त्यानं नेमके काय बदल केले हे नेमकं समजायला आपल्याला काही वर्ष जावी लागतील हे जरी खरं असलं तरी त्याचे काही परिणाम, काही खुणा आपल्याला आत्ताच दिसू लागल्या आहेत

सर्वत्र एक प्रकारची स्पर्धा आली. जगातल्या सर्वोत्तमाशी तुलना व्हायला सुरुवात झाली. मला आठवतंय पूर्वी एका वृत्तवाहिनीवर “World This Week” नावाचा एकच कार्यक्रम लागत असे, जो खूप प्रसिद्ध होता. तसे आता शेकड्यांनी कार्यक्रम परदेशी वाहिन्यांवर दिसू लागले. त्यातून आपल्या कार्यक्रमांची तिकडच्या कार्यक्रमांशी तुलना सुरू झाली. मापदंड बदलले. चाैकट मोडली गेली, विस्तारू लागली. आपल्याला गुणवत्ता सुधारण्याची निकड वाटू लागली कारण तसं केलं नाहीतर आपला टिकाव लागणार नाही असं सर्वच क्षेत्रात होऊ लागलं. समाजात स्पर्धा येणं आणि गुणवत्ता लकाकू लागणं ही एक आपल्यात झालेली क्रांतीच होती


अजून एक झालं. मला निवड करण्याची संधी मिळू लागली. पूर्वी एकच दुकान, तीच बाकरवडीअशी परिस्थिती होती. आता तसं राहिलं नाही. बाकरवडीबरोबर मेक्सिकन टॅको किंवा इटालियन पिझ्झा होता. मला निवड करता येऊ लागली. जेंव्हा निवड करण्याची संधी येते आणि ती आपण करू शकतो तेंव्हा सारासार विचार करण्याची, मला काय आवडतं आणि काय नाही आणि ते ही का?” असा विचार सुरु होतो. असा विचार सुरु होतो तेंव्हा प्रगल्भता येऊ शकते. अर्थात येतेच असंही नाही. जेंव्हा पर्याय नसतो तेंव्हा आपण विचार करण्याची गरज नसते आणि म्हणून प्रगल्भता येत नाही. जागतिकीकरणामुळे हाही बदल माझ्या मनात आणि माझ्या समाजाच्या मनात व्हायला सुरुवात झालेली आहे.


ज्या घरात घुंघट आहे, जिथल्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत तिथल्या स्त्रियाही Baywatch पाहू लागल्या. त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नसेल? झाला नसेल? महिला संघटनांनी कित्येक वर्ष झगडून समाजाला जो संदेश देण्याचा प्रयत्न केला, आणि तो स्त्युत्यच होता आणि आहे, तो संदेश कदाचित एकाच मालिकेत दूरदर्शनवर दिला जात असेल. माझ्या समाजाच्या मनावर ह्याचा निश्चितच खोल परिणाम झाला. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश किंवा स्त्रियांचं आत्मभान ह्यातही खूप मोठा बदल माझ्या समाजानं ह्याच काळात पाहिला. माझ्या घरी घरकाम करणारी आता स्कूटर वरून येऊ लागली, मोबाईलवरून घरी संपर्क ठेवू लागली. घरोघरच्या लेकी-सुनांच्या विचारविश्वात आणि त्यांच्या भावांमध्ये, वडिलांमध्येही बदलाचे धक्के खाण्याची तयारी ह्या काळानं दिली आहे

अजून एक गोष्ट झाली. ती चांगली की वाईट असं आपण म्हणू नये. त्याला गुणात्मक शेरा आत्ताच देऊ नये, कारण विशुद्ध सामाजिक विश्लेषणामध्ये चांगलं काय, वाईट काय ह्यापेक्षा आत्ताच्या संदर्भात काय योग्य, काय अयोग्य हे महत्वाचं. झालं असं की समाजाची भूक वाढली, हाव वाढली. प्रत्येकाला ये दिल मांगे मोअरवाटू लागलं. एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये, त्याचं कुटुंब छोटं झालं तरी, त्याचं मन रमत नाही सध्या. त्यासाठी धडपडण्याची, कष्ट करण्याची त्याची तयारी आहे. त्याला आणखी, आणखी हवं आहे. एका पातळीवर ही हाव जर अमेरिकेत आहे तशी अनियंत्रित राहिली तर ती धोकादायक आहे पण आपल्या देशात ती तेव्हढी अनियंत्रित राहूच शकणार नाही, कारण इतकी अनियंत्रितता आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे ही भुक असणं हे लक्षण आशादायक आहे. समाजाचं भान शाबूत राहिलं आणि त्याचा सांस्कृतिक पाया चिरेबंदी राहिला तर ह्याच भूकेतून, ह्याच इर्षेतून माझा समाज नवी क्षितीजं धुंडाळू लागेल


अजून एक बदल झाला. मला घाई झाली. घाई माझ्या मनात तयार झाली. दुपारी दोन ची बस चुकली म्हणून पुढच्या पाचच्या बस पर्यंत थांबायला मी तयार नाही. माझी पावलं लगेच स्टॅन्डबाहेरच्या कालीपिली कडे जातात. मला थांबायचं नाही. पूर्वी मी पुढच्या बसपर्यंत थांबायचो. आता मला वाटतं थांबलो तर संपलो. ही मनाची अवस्थाही चांगली आहे. वाईट काय त्यात? मला गती हवी, मला बदल हवा असं माझ्या समाजाचं, माझ्या मराठी समाजाचं मन बनत चाललं आहे आणि ही अत्यंत चांगली खूण आहे


पहा ना, माझ्या मराठी समाजात स्पर्धा सुरु झाली जी निकोप होणं एव्हढीच माझी जबाबदारी आहे. आमचा ओढा गुणवत्तेकडे सुरू झाला जे मी आता जोपासण्याची, वाढवण्याची गरज आहे. मला निवडीची संधी मिळू लागली ज्यातून काय चांगलं, काय मला हवं आणि काय आणि किती मला हवं हे ठरवण्याची शक्यता निर्माण झाली. किती चांगली गोष्ट आहे ही. ह्यातून माझा समाज नवे आदर्श शोधेल, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करेल, त्यातून तो मोठा होईल. जगातल्या चांगल्या गोष्टी, माणसांची जगभर चाललेली धडपड माझ्यापर्यंत येऊ लागली. माझ्या समाजाची भूक वाढली. निदान भूक निर्माण झाली. ही भूक त्याच्या प्रगतीचं इंधन बनू शकेल, बनेलच असं नाही, पण निदान शक्यता तरी निर्माण झाली. माझ्या समाजाला घाई झाली, तो आता बदलाला तयार झाला हे ही ह्याच वीस-बावीस वर्षात घडलं


समाज प्रवाही आहे. तसा तो असायला हवा. मधल्या काळात त्याला साचलेपण आलं होतं. अजून ते साचलेपण संपूर्णपणे गेलं असं नाही. सांस्कृतिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रातले बदल अजून आपण तितके टिपले नाहीत, पण जागतिकीकरणामुळे निश्चितच एक संधी निर्माण झाली. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण पार बिघडलो, अगदी रसातळाला गेलोअसं आपण म्हणत आलो. ते आपलं म्हणणं प्रामाणिकही होतं, पण तरीही समाज पुढे जायचा थांबला नाही, थांबणार नाही. गेल्या हजार दोन हजार वर्षांचा प्रवास आपण पाहिला तर तीन पावलं पुढे, दोन मागे पण नंतर चार पावलं पुढे असंच होत आलं आहे. तसंच होणार. ते स्विकारण्याची आपली तयारी किती एव्हढं फक्त महत्वाचं.



अनिल शिदोरे