शनिवार, जुलै २७, २०१३

"लिंकन" चित्रपटाच्या निमित्तानं...


‘लिंकन’ चित्रपटाच्या च्या निमित्ताने...

इसवी सन १८६५. 

अमेरिका.

सर्वत्र प्रचंड बेदिली माजली आहे. एकाच देशातली राज्यं आपापसातच सैन्यं उभी करून लढताहेत. एकमेकांच्या रक्तासाठी सगळेच आसुसलेत. अमेरिका आतून बाहेरून उध्वस्त आहे, तुटलेली आहे. त्यातल्या काही राज्यांना वंशभेद मिटवायचा आहे, तर काहींना काळ्या नीग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करणं अयोग्य वाटतंय. ह्या मुद्दयावरच अमेरिकेत यादवी युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजंूनी हजारोंच्या संख्येनं सैनिक नाहक मरताहेत. ह्या अनर्थ युद्धाला आता चार वर्ष होत आलेली आहेत. 

इकडे, अब्राहम लिंकन पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन दोनच महिने झालेत आणि अमेरिकेच्या संसदेत वंशभेदाचे निर्मूलन करण्याविषयीचा एक महत्वाचा ठराव दोन-चार दिवसातच येऊ घातला आहे. सर्वत्र तणाव आहे. लिंकन ह्यांना तो ठराव चर्चेस आणून मंजूर करायचा आहे आणि त्याचवेळी युद्धही संपवायचं आहे. दोन्ही एकाच वेळी. एक आधी, दुसरं नंतर असं नाही. कारण, एकाच वेळी दोन्ही गोष्टी झाल्या तरच हा वंशभेदाचा गहन प्रश्न कायमचा निकालात लागणार आहे. नाहीतर तो लटकणार आहे, रेंगाळणार आहे. सर्वत्र घोर निराशा दिसतीय आणि ह्यातून काही चांगलं घडू शकेल असं कुणालाच म्हणजे कुणालाच वाटत नाहीय.

ह्या परिस्थितीत काहीतरी सकारात्मक वाटतंय ते फक्त अब्राहम लिंकन आणि त्यांच्या निवडक साथीदारांना. अगदी निवडकच.

खरं म्हणजे गुलामगिरी नष्ट व्हावी असंही बहुसंख्यांना वाटतंय पण मार्ग दिसत नाहीय. व्हावी अशी इच्छा आहे पण होईल असं वाटत नाहीय. इच्छा असणं आणि प्रत्यक्ष घडणं ह्यात अंतर दिसतंय. सर्वत्र घोर आणि दाट निराशा. ह्याशिवाय घनघोर युद्धानं सगळे खचलेत ते वेगळंच.  

परिस्थिती ही अशी आहे. 

ह्याच परिस्थितीत अब्राहम लिंकन ह्यांची मात्र अव्याहत धडपड चालू आहे. त्यांना लागणारी दोन त्रितीयांश मतं त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठी त्यांना विरोधी पक्षाचेही काही लोक फोडावे लागणार आहेत. युुद्ध संपवणे आणि हा कायदा मंजूर करून घेणे अशी दोन्ही अवघड कामं लिंकन ह्यांच्या पुढ्यात आहेत. 

आता ही चर्चा संसदेत येणार म्हणून आपल्या घरीच, म्हणजे व्हाईट हाऊस मध्ये, त्यांनी थेडियस स्टीव्हन्स ह्यांना बोलावलं आहे. चर्चेसाठी. स्टीव्हन्स ह्यांना हा कायदा यायलाच पाहिजे आणि वंशभेद नष्ट व्हायलाच पाहिजे असं वाटतंय. अगदी मनापासून. 

व्हाईट हाऊसच्या शांत स्वयंपाकघरात उतरत्या संध्याकाळी लिंकन आणि स्टिव्हन्स बोलण्यामध्ये गढून गेले आहेत. वातावरण गंभीर आहे.

“तुमचं म्हणणं तुम्ही फार जोरकसपणे नका मांडू. त्यांनं लोक बिथरतील. त्यांच्या कलाकलानं घेत रहा, सबूरीनं बोलत रहा” लिंकन म्हणताहेत. 

“एकदा हे युद्ध संपू दे, मग ह्यातल्या प्रत्येक अन्याय आणि अत्याचाराचा हिशेब लावू आपण. संपत्तीचं वाटप करून टाकू. समता आणू.” स्टीव्हन्स कट्टर आहेत आणि आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्याची गरज त्यांना वाटते आहे. 

“ तसं नको. ते बोलूच नका आत्ता. जेंव्हा तीव्र मतभेद असतात तेंव्हा हळू जाण्याची गरज असते. लोकांच्या कलाकलानं. अगदी हळूवार. जसा वेळ पुढे सरकत जातो, तशी मग सर्वांच्या मनाची तयारी होत जाते.” लिंकन म्हणताहेत. 

“मला एक गोष्ट कळत नाही” स्टीव्हन्स अस्वस्थ आहेत. “लोकांच्या मनात काय चांगलं आणि काय वाईट ह्याचं काही सोयरसुतक असतं की नाही? गुलामगिरीसारखी प्रथा वाईट आहे, ती घालवली पाहिजे असं त्यांच्या मनातल्या होकायंत्राला कळत नाही का? खरी उत्तर दिशा कुठली आणि कुठं गेलं पाहिजे हे त्यांचं होकायंत्रं त्यांना सांगत नाही का?” स्टीव्हन्सना रहावत नाही. न्यायाच्या आणि चांगुलपणाच्या साध्या साध्या गोष्टी लोकांना का समजत नाहीत आणि नको तेंव्हा नको त्या गोष्टींवर राजकारण का आणलं जातं ह्यावर त्यांना बोलायचं असतं, पण लिंकन त्यांना थांबवतात, म्हणतात
“ तुमची तळमळ मला समजते, स्टिव्हन्स. पण मी तुमचं ऐकलं असतं तर आपण युद्धही हरलो असतो आणि आत्ता आलो आहोत तसे वंशभेदही संपवण्याच्या जवळही आलो नसतो.” 

लिंकन पुढे म्हणतात “ होकायंत्राचं एक असतं. ते फक्त तुम्हाला दिशा दाखवतं. पण त्या दिशेवर असलेले काटेकुटे, खाचखळगे कुठे आहेत आणि त्यावरचा उपाय काय हे ते नाही सांगत. तुमची दिशा योग्य आहे पण त्या दिशेनी चालताना तुम्हीच खड्ड्यात पडलात तर? संकटात सापडून बुडालात तर? नुसती दिशा माहीत असून उपयोगाचं नसतं, त्यावरच्या अडचणींवर मात करण्याची युक्ती पण माहीत असायला हवी असते.” लिंकन बोलता बोलता सत्य सांगून जातात. 

हे करायला हवं. तसं व्हायला हवं. तिकडे जायला हवं, तसं उद्दिष्ट ठेवायला हवं असं आपण सारखं बोलत असतो किंवा ऐकत असतो. हे खरं आहे की त्याविषयी बोलणारे अत्यंत मनापासून बोलत असतात. आपल्याच आसपास त्यांच्या त्यांच्या मनातल्या होकायंत्रानी दाखवलेल्या दिशेनी जाणारे, धडपडणारे काहीजण आपल्याला दिसतात. त्यांच्या कामाविषयी मग आपल्याला नितांत आदर वाटतो. ही मंडळी समाजाला दिशा देतील किंवा देत आहेत असंही आपल्याला वाटतं. त्यांना पाहिलं की आपल्याला “नवी पहाट झाली” असंही वाटायला लागतं. मग त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना पुरस्कार वगैरे देतो. पुरस्कार दिल्यानं समाजात चांगुलपणा टिकेल आणि समाजाला दिशा मिळेल असं आपल्याला वाटत असतं. अर्थात इतकं सगळं झालं तरी प्रश्न मात्र जिथे होता तिथेच असतो. होकायंत्रही दिशा बरोबर दाखवत असतं पण दरम्यान तिकडे जाण्याचा मार्ग अधिक भीषण आणि गुंतागुंतीचा झालेला असतो.  

स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांचा ‘लिंकन‘ चित्रपट पाहिला आणि मनात विचारांनी काहूर माजलं.

आपण महाराष्ट्रात प्रश्न सोडवण्यापेक्षा ते कुरवाळत बसलोय का? अवघड प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी मनोभूमिका आपल्याकडे आहे का? लोकशाही चाैकटीत राहून त्यात दिलेल्या आयुधांचा वापर करत मोठे बदल आपण करू शकतोय का?  तशी आपली तयारी आहे का?   

‘लिंकन’ ह्या चित्रपटात प्रश्नांना कुरवाळत बसणं नाही तर ते सोडवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आहेत. आग्रह आहेत तर प्रसंगी लवचिकता आहे. पटवापटवी आहे, लोकांना विकत घेणं आहे, लालूच दाखवणं आहे. सभागृहातील वाद आहेत. चर्चा आहे. शिव्या घालणं आहे. लोकशाही चाैकटीतल्या राजकारणात लागणारे सगळे भाव, स्वभाव आणि डावपेच त्यात आहेत. 

हा चित्रपट एक चित्रपट म्हणून किती लोकांना आवडेल किंवा ह्या चित्रपटाला किती पुरस्कार मिळतील हे सांगता येत नाही. स्टीव्हन स्पीलबर्ग सारखा माणूस ह्या चित्रपटाचा सूत्रधार, दिग्दर्शक आणि निर्माता असल्यानं ह्या चित्रपटाची नोंद तर घेतली जाईलच. शिवाय तो अमेरिकेच्या एका महत्वाच्या राष्ट्राध्यक्षांवर आहे, वंशभेदाच्या निर्मूलनाच्या विषयावर आहे, त्यामुळे त्या चित्रपटाची यथायोग्य आणि सांगोपांग चर्चा सर्वत्र होणारच हे नक्की आहे.

एक मात्र खरं की चित्रपटाचे नाव जरी ‘लिंकन’ असं असलं तरी सर्व कथानक हे लिंकन आणि त्यांचे सहकारी अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या घटनेत १३ वी दुरुस्ती कशी करवून घेतात ह्या एका घटनेभोवतीच गुंफलेलं आहे. 

ही घटना दुरुस्ती मात्र साधीसुधी नाही. संपूर्ण देशातून वंशभेद संपवण्याबाबतची ही घटना दुरुस्ती आहे आणि लिंकन ह्यांच्याकडे ती घटना दुरुस्ती करण्यासाठी लागणारं संख्याबळ नाही. आहे तो हा प्रश्न सोडवण्याची दुर्दम्य इच्छा. अगदी त्यांच्या स्वत:च्या पक्षातले लोकही सगळे एकदिलानं त्यांच्याबरोबर आहेतच असं नाही. मग ह्या परिस्थितीत त्यांनी हे संख्याबळ कसं मिळवलं, लोकांना कसं पटवलं, कुठल्या युक्त्या वापरल्या, हे सारं सारं ह्या चित्रपटात आहे. 

राजकारण रक्तबंबाळ आहे. राजकारण म्हणजे एक व्यवहार आहे. राजकारण म्हणजे चातुर्य आहे. त्यात भावना आहेत. आकांक्षा आहेत. त्यात विविध प्रकारचे मानवी आविष्कार आहेत. ते सर्व जाणून, प्रसंगी त्याचा उपयोग करून राजकारणातलं इप्सित कसं साध्य करावं लागतं ह्याचं उत्तम चित्रण ह्या चित्रपटात आहे. ‘लिंकन’ मध्ये खासदारांची मतं जमा करणारा, साैदेबाजी करणारा एक गट आहे तो कुणाकुणाला काय काय पदं देऊन पण वंशभेदाच्या निर्मूलनासाठी लोकांची मतं कशी फिरवतो हे पहाण्याजोगं आहे. राजकारणात राहूनही, लोकांना पटवा-पटवी करूनही, लोकांमध्ये स्पर्धा, इर्षा करायला लावूनही स्वत:चं तात्विक अधिष्ठान कसं राखायला लागतं, कसं राखायला पाहिजे ह्याचं दर्शन ‘लिंकन‘ चित्रपटापेक्षा चांगलं असं दुसरीकडे कुठहीे झाल्याचं मला तरी माहीत नाही.  

हा चित्रपट थोडा शब्दबंबाळ आहे. ह्यात खूप बडबड आहे. पण हा चित्रपट लोकशाहीवर आहे आणि लोकशाहीत शब्द हवेतच. चर्चा हवीच. त्याशिवाय मतं कळणार कशी, मतं मांडणार कशी आणि निर्णय घेतले जाणार कसे? ही शब्दबंबाळता थोडी सहन केली तर लोकशाहीतील आशा-आकांक्षांच्या विविध छटा इथे आपल्याला दिसतात. अवघड, गहन, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपलं सर्वांचं सामुहिक मन कसं असायला हवं आहे हेही ह्या चित्रपटातून आपल्याला दिसतं. समजतं.

काठावर उभं राहून राजकारणाला आणि राजकारण्यांना नावं ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गासाठी एक महत्वाचा संदेश ह्या चित्रपटातून आपल्याला मिळतो. तो अर्थात तसा घेणं मात्र आवश्यक आहे. आपण लोकशाहीची चाैकट स्विकारली आहे. समाजात कारभाराची तीच पद्धत सर्वार्थानं योग्य आहे असं दिसतं आहे. मग लोकशाहीत आपल्याला चांगले बदल करायचे असतील तर नुसती बडबड उपयोगाची नाही. त्यासाठी काम करावं लागेल. लोकांचं ऐकून घेण्याची कला आत्मसात करायला हवी. आज नाही पण उद्या लोकांना पटेल म्हणून थांबण्याची तयारी हवी. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ते पटावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी उपलब्ध कायद्यांचा उपयोग करायला हवा. तसे कायदे नसतील तर कायदे बनवायची प्रक्रिया करायला हवी. ते कायदे पाळले जातात की नाही हे सतत दक्ष राहून पहायला हवं. बोलत, ऐकत रहायला हवं. बदल करताना काहींना छोट्या गोष्टी, काहींना चणे तर काहींना फुटाणे आणि काहींना तत्वज्ञानाचं अधिष्ठान लागतं, ते ओळखायला हवं आणि ते द्यायला हवं. त्यातूनच मग लोकशाहीच्या चाैकटीत मोठा सामाजिक बदल करता येऊ शकतो हे आपल्याला ‘लिंकन’ मध्ये दिसतं.

अब्राहम लिंकन ह्या माणसाची फार ओळख नव्हती. ह्या चित्रपटामुळेही लिंकन ह्या व्यक्तिमत्वाचं संपूर्ण दर्शन होतंच असं नाही. हा चित्रपट इतिहासाच्या मापदंडावर किती खरा उतरतो हे देखील माहीत नाही. आपण हे एक कल्पनाचित्र आहे असं जरी मानलं तरी लोकशाहीच्या, लोकशाहीतील नेतृत्वाच्या आणि राजकारणाच्या एका अगदी वेगळ्या बाजूचं दर्शन ‘लिंकन‘ ह्या चित्रपटात होतं. ते दर्शन ज्यांनी आपल्याला करून दिलं त्या स्टीव्हन स्पीलबर्ग, लेखक द्वय टोनी कुशनर आणि डोरीस केर्न्स गुडवीन, अभिनेते डॅनियल डे-लुइस, सॅली फिल्ड, संगीतकार जॉन विल्यम्स आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचे आभार आपण मानले पाहिजेत.

महाराष्ट्राचाच विचार केला तर अगदी महत्वाच्या क्षणी हा चित्रपट आला आहे. बिकट प्रश्न आ वासून समोर आहेत. लोकशाहीची चाैकट आहे. त्या चाैकटीत आपण किती शहाणपणा दाखवतो ते महत्वाचं आहे. त्या शहाणपणाकडे जाणारा रस्ता हा चित्रपट आपल्याला दाखवू शकतो. ते शिकण्याची आपली तयारी फक्त हवी.    

रविवार, जुलै २१, २०१३

आपण कशात कमी पडलो?


सांस्कृतिक अंतराव

बरोब्बर १५ वर्षांपूर्वी भारताच्या नजिकच्या इतिहासातली एक महत्वाची घटना घडली. ज्याचा सर्वदूर परिणाम आपल्या समाजावर झाला.

१९९८ च्या १३ मे ला भारतानं पोखरणला अणुचाचण्या केल्या आणि जगाची भारताकडे पहाण्याची दृष्टीच बदलली. पोखरणला केलेले हे अणुस्फोट किंवा चाचण्या ह्या पहिल्याच नव्हत्या. त्यापूर्वी २४ वर्षांपूर्वी १९७४ ला स्व. इंदिराजींच्या नेतृत्वाखाली “ हसणारा बुद्ध” ह्या नावाने आपण अणुचाचण्या केल्या होत्या पण आमच्याकडेही अणुतंत्रज्ञान आहे हे जगाला कळणं आणि काही निर्बंध घातले जाणं ह्या खेरीज त्याचा फार परिणाम झाला नाही. १९९८ ची परिस्थिती मात्र १९७४ पेक्षा खूप वेगळी होती. मधल्या २४ वर्षात भांडवलशाही जग आणि समाजवादी जग ह्यांच्यातील शीतयुद्ध संपलं होतं, बर्लीनची भिंत पडली होती, सर्वत्र आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले होते आणि भांडवलानं राजकीय क्षेत्रावरही आपला अंमल बसवायला सुरुवात केली होती. 

जग जवळ येत चाललं होतं. इंटरनेट, माहिती तंत्रज्ञानानं जगण्याची भाषा बदलली होती. पैसा आणि पैसाच श्रेष्ठ बनत चालला होता. प्रत्येक गोष्टीचा फायदा-तोटा मोजण्याची रीत रूढ झाली होती. आधुनिक व्यवस्थापन शास्त्र आता उद्योगक्षेत्राच्या बाहेर शासकीय, सांस्कृतिक, सामाजिक अगदी स्वयंस्फूर्त कामात देखील ढवळाढवळ करीत प्रभाव दाखवायला लागलं होतं. ह्याच काळात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एमबीए ग्रॅड्युएट्स देतील असाही एक अंधविश्वास निर्माण झाला होता आणि आणि नंतर तो दृढही झाला होता.

वेळ बघा कशी आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचं हेच ते पहिलं आवर्तन पूर्ण होताना आणि संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बॅंकेसारख्या संस्थांची पकड सर्वत्र सिद्ध होत असतानाच आपण हे अणुस्फोट केले आणि जगाचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. भारताला जर अणुस्फोट करता येतात तर त्याला प्राथमिक शिक्षणासाठी किंवा खेडोपाडी संडास बांधण्यासाठी किंवा तत्सम सामाजिक कामांसाठी आर्थिक मदतीची गरजच काय असं जगात म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळे सामाजिक कामांसाठी आपल्याकडे येणारा निधी ह्याच सुमारास आटला. आर्थिक दाता संस्था (Funding Agencies) काढता पाय घेऊ लागल्या.  ह्या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक कामावर झाला.  

ह्या घटनेला आणखी एक संदर्भ आहे. देशात आणिबाणी जाहीर होण्याच्या दोनच महिने आधी (३० एप्रिल १९७५) सायगाव पडलं आणि व्हिएतनाम युद्ध संपलं. ह्या युद्धानं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी एक मोठा धडा घेतला. त्यांना वाटलं, व्हिएतनाम सारखं छोटं राष्ट्र जर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नाकीनऊ आणत असेल तर भारत, चीन किंवा आफ्रिकेतील इतर राष्ट्रं काय करतील? त्यामुळे अश्या राष्ट्रात सैनिकी आक्रमण करण्यापेक्षा सांस्कृतिक आक्रमण करावं, समाजातील बोलक्या आणि चळवळ्या लोकांशी, गटांशी संधान साधावं, त्यांना जवळ करावं. त्याचसुमारास देशभर झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीनंतर सामाजिक परिवर्तन करू इच्छिणारे असंख्य छोटेछोटे गट ठिकठिकाणी कामाला लागले, ज्यांचा राजकीय परिघाबाहेरच्या गरिबांना, तळागाळातल्या लोकांना संघटित करुन ह्या देशात आपण “संपूर्ण क्रांती” करू शकू ह्यावर ठाम विश्वास होता. अश्या शेकडो गटांना, चळवळींना त्याकाळात प्रचंड परदेशी आर्थिक मदत मिळू लागली. महाराष्ट्रात तर परिवर्तनवादी संस्थांना अशी मदत मिळण्याचा मोठा इतिहास आहे. ह्या रकमांमध्ये १९७७-७८ पासून १९९८-९९ पर्यंत प्रत्येक वर्षी वाढच होत गेली. भारतानं अणुस्फोट घडवले आणि ही परदेशी मदत रोडावली आणि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला.

बरोब्बर ह्याच सुमारास समाजाच्या इतरही भागात बरेच बदल होत होते. बदलत्या अर्थव्यवस्थेत उद्योगसंस्था ह्या फक्त नफा करण्यापुरत्या राहिल्या नाहीत. उद्योगांची सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility) ह्यासारखी कल्पना पुढे आली आणि मोठमोठ्या उद्योगसंस्थांनीही सामाजिक कामांकरता पैसा उभा करायला आणि द्यायला सुरुवात केली. काही ठिकाणी तर ह्यापुढेही जाऊन आपल्या उच्चपदस्थ व्यवस्थापकांना सामाजिक कामात उतरवण्याचे प्रयत्न झाले. भूज च्या भूकंपानंतर किंवा सुनामीसारख्या मोठ्या नैसर्गिक संकटानंतर महाराष्ट्रातील मोठमोठ्या कंपन्या आणि उद्योगसमूह आपल्या फक्त पैशानं नव्हे तर ज्ञानानं, काैशल्यानं सामाजिक कामात उतरले आणि एका वेगळ्या धाटणीचं काम त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलं. नुसत्या दिखावू ‘लिपस्टीक‘ सामाजिक कामापेक्षा अधिक सकस काम करण्याची पद्धती ह्या मंडळींनी आणली. मला महाराष्ट्रातली अशी कित्येक उदाहरणं माहीत आहेत की जिथे तंत्रज्ञानानं, आपल्याकडे असलेल्या व्यवस्थापकीय ज्ञानानं आणि वैश्विक दृष्टीकोनानं सामाजिक कामाची नानाविध दालनं उघडण्यासाठी नवनवी तरूण मंडळी पुढे सरसावली. इथे त्यांची नावं घेत बसत नाही कारण त्याचा तपशील खूप मोठा आहे पण जगातल्या सामाजिक कामाच्या विचारांचा फार थेट असा परिणाम महाराष्ट्रातल्या काही सामाजिक कामांवर झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सुमारे २०-२२ वर्षं फक्त परदेशी पैश्यावर अवलंबून असलेलं सामाजिक काम कात टाकण्याच्या अवस्थेत आलं तेही ह्या  उद्धारपर्वात, बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळेच. 

ही परिस्थिती बदलत असताना आणि महाराष्ट्रातलं सामाजिक काम आता परदेशी डॉलरवर अवलंबून रहाणार नाही अशी परिस्थिती होत असताना आणि मध्यमवर्गाकडे जो पैसा येतो आहे तो सामाजिक कामाकडे वळवू शकतील अशी परिस्थिती घडत असताना त्या संधीचा फायदा मात्र इथल्या स्वयंस्फूर्त चळवळीनं घेतल्याचं दिसत नाही. ९० च्या दशकाच्या अखेरीअखेरीस खरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर मराठी तरूण नोकरी-धंद्यानिमित्त परदेशी जाऊ लागला. पैसा कमावू लागला. मला तर अशी कित्येक कुटुंबं माहीत आहेत की ज्यांच्या घरातील जवळजवळ प्रत्येक तरूण मुलगा किंवा मुलगी एकतर परदेशी तरी आहे किंवा परदेशातून नोकरी करून आलेली आहे. त्यांना तिथलं, तिथल्या आचार-विचारांचं दर्शन झालेलं आहे, एक वैश्विक दृष्टिकोन प्राप्त होण्याची संधी निर्माण झाली आहे. अश्या तरूण मुलामुलींना महाराष्ट्रातल्या काही सामाजिक कामांशी जोडून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र काही सन्माननीय अपवाद वगळता झाला नाही. खरं म्हणजे ह्याच काळात जगभर सामाजिक प्रश्नांवर आपली एक जबाबदारी आहे असं मानून बील गेट्स, वॉरन बफे सारख्या किंवा सी. के. प्रल्हाद सारख्यांनी सामाजिक कामातील एक नवा अध्याय ह्याच काळात लिहिला मात्र त्या एका मोठ्या घुसळणीला महाराष्ट्रातून प्रतिसाद, जसा पाहिजे तसा, मिळाला नाही. उभरत्या आर्थिक परिस्थितीचं क्षितिज विस्तारत असताना आणि मराठी मध्यमवर्ग पैसेवाला होत असताना तो अधिक समाजाभिमुख बनला नाही किंवा त्यानं व्यापक सामाजिक उद्धाराला जोडून घेतलं नाही ही मात्र चिंतेची बाब आहे. म्हणजे एका बाजूला बदलत्या बाजार संस्कृतीत शासन आपली सामाजिक जबाबदारी कमी करत असताना उद्योगविश्व पुढे सरसावत असलेलं आपण पाश्चात्य जगात पाहिलं, मग त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाले नाही. 

उद्धारपर्वात मराठी मध्यमवर्गाकडे पैसा आला. जगाशी जोडलं जाण्याची एक अद्भुत संधी त्याला मिळाली. जगात होत असलेल्या बदलाचा तो साक्षीदार बनला. जागतिक तापमानाविषयी, पर्यावरणवादी जीवनशैलीविषयी जगभर चाललेल्या विचारमंथनाकडे जवळून पहाण्याची संधी त्याला मिळाली. गेली दोन दशकं ती त्याला मिळते आहे. ह्याच काळात जगभरचा माणूस आपल्या जगण्याकडे तटस्थपणे पहायला लागला. आपण आत्तापर्यंत जो संहार केला, ज्या पद्धतीनं निसर्ग ओरबाडला, जो हावरटपणा केला त्याची किंमत आपल्याला आता आपल्या वागण्यानंच चुकवावी लागणार हेही त्याला ह्याच काळात कळायला लागलं. मात्र असं असताना त्याचे पडसाद, त्याची किरणं महाराष्ट्रात का नाही पडली असं आपल्याला वाटणं फार स्वाभाविक आहे. खरी चिंतेची बाब आहे ती ही. 

समाजशास्रामध्ये “सांस्कृतिक अंतराव” (Cultural Lag) नावाची एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ असा की एखाद्या समाजाचा विकास होत असताना त्या समाजातील सर्व घटकांचा किंवा सर्व बाबींचा विकास हा सारख्या पद्धतीनं, सारख्या गतीनं होत नाही आणि त्यामुळे समाजात थोडा विचित्र तणाव निर्माण होतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं तर इतिहासाच्या एखाद्या टप्प्यावर तंत्रज्ञानामध्ये खूप म्हणजे खूप सुधारणा होते पण समाज फार शहाणा झालेला असतोच असं नाही किंवा त्याच काळात त्या समाजातली अंधश्रद्धा जशी होती तशीच राहिलेली असते. समाजातली एक बाजू पुढे गेलेली असते पण दुसरी, तितकीच महत्वाची बाजू, जिथे होती तिथेच राहिलेली असते. ह्या उद्धार काळात आपलं तसंच झालेलं आहे.  

गेल्या वीस-बावीस वर्षात आर्थिक सुधारणा झाली आणि आपली अर्थव्यवस्था जगाशी जोडली गेली. आधीच शिकलेल्या समाजाला त्याचा फायदा मिळाला. जी संधी निर्माण झाली होती तिचा फायदा त्या वर्गानं मिळवला. मराठी समाजातली आपली मुलं परदेशी विद्यापीठात शिकू लागली, तिथे नोकरी करून समृद्धी मिळवू लागली. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाकडे पैसा खुळखुळू लागला. त्याची  आवड बदलू लागली. जगाच्या बाजारात तो एक ग्राहक बनला. त्याला नवनवी क्षितिजं खुणावू लागली. 

मात्र असं असलं तरी ह्या उद्धारपर्वात मराठी समाजाचं पुनरुत्थान (Renaissance) करण्याची एक विलक्षण संधी मिळाली असूनही आपण समाज म्हणून ती घेऊ शकलो नाही. आपली मुलं जगभर गेली पण आपलं समाजमन जिथे होतं तिथेच राहिलं. जुनाट परंपरा मोडण्याऐवजी आपण त्याच मोठ्या करत बसलो. आर्थिक चाैकट बदलली, आर्थिक संधी समोर आल्या पण सांस्कृतिक क्षेत्रात विकास झाला नाही. गाण्याच्या-वादनाच्या कार्यक्रमाला मोठमोठे प्रायोजक मिळू लागले खरे पण गाण्याच्या क्षेत्रात नवे प्रयोग करणारी, व्यासंग असणारी मंडळी रोडावली. सामाजिक कामाला पैसे देणारी मंडळी आली पण झोकून देऊन कामं करणारी मंडळी घडवण्याचे महाराष्ट्रातील कारखाने बंद झाले. एका काळी महाराष्ट्राला “कार्यकर्त्यांचं मोहोळ” असं म्हणायचे तशी परिस्थिती राहिली नाही. नेमक्या ह्याच काळात पुस्तकं प्रकाशित होत राहिली, लोकांकडे पैसा आला म्हणून ती खपतही राहिली पण चांगले लेखक घडले नाहीत, समोर आले नाहीत. लेखक नाहीत, नाटककार नाहीत, चळवळी थांबल्या, नवा शोध क्षीण होत गेला. तंत्रज्ञान हातात आलं पण ते निवडक काही जणांच्याच. महाराष्ट्रात विषमता वाढली. म्हणजे सुबत्ता आली पण थोड्या माणसांमध्ये. बराचसा मराठी माणूस ह्या उद्धारपर्वापासून लांब राहिला आणि चिंतेची गोष्ट अशी की जो पुढे गेला त्याला मागे राहिलेल्यांची फार चिंता उरली नाही. एका रोमहर्षक उद्धारपर्वातून पुढे सरकताना आपल्या आपल्यातच एक “सांस्कृतिक अंतराव” राहिला. 

ह्या उद्धारपर्वानं नवी आर्थिक संधी आपल्याला दिली असली तरी समाज शहाणा करण्यासाठी, तो अधिक संपन्न करण्यासाठी आपण कमी पडलो की काय असं वाटतं. म्हणजे समृद्धी आली पण संपन्नता नाही. पैसा आला पण सुसंस्कृती नाही. उद्धारपर्वातली सर्वंकषता आपण मिळवली नाही ती मिळवायला हवी.  

हा “अंतराव” कमी करणं हेच आता मराठी समाजाचं आद्य कर्तव्य आहे. चहूबाजूनी उद्धाराची घोडदाैड चालू असताना ह्या “सांस्कृतिक अंतरावाचं” आपल्याला भान असू द्यावं, इतकंच.

सोमवार, जुलै १५, २०१३

हरवलेलं पुस्तकाचं दुकान


हरवलेले पुस्तकाचे दुकान:


घरापासून कॅम्पपर्यंत सायकलनं जाणं त्यावेळी सुद्धा सोपं नव्हतं. आज तर इतक्या लांब जाण्याचा विचार सुद्धा करता येणार नाही. अफाट रहदारी आणि प्रदूषणाच्या विळख्यात सायकलनं जाता जाता थकून जायला होईल. जमणारच नाही. 

माझं रहाणं कर्वेनगरला. तिथून नळस्टाॅप, कर्वे रस्ता, डेक्कन करत कॅम्पात जायला किमान अर्धा-पाऊण तास तरी लागायचा. वाटेत डिलाईट ला जाणं भागच असायचं. तिथं कोणीतरी सोबत यायचं. “मॅनिजला चाललोय, यायचंय कुणाला?” असं विचारलं तर एक दोघं तयार व्हायचे. त्यांच्याकडे स्कूटर किंवा मोटरसायकल असलीच तर त्यावरून, पण बहुतेक वेळा घरनं सायकल मारत मारतच आम्ही कॅम्पाकडे कूच करायचो. सोबतच्याकडे सायकल नसली तर त्याला डबलसीट घेऊन सायकल मारत आम्ही मॅनिजवर पोचायचो म्हणजे पोचायचो आणि अधाशासारखी पुस्तकं बघायला सुरुवात करायचो. 

मॅनिज. 

पुण्याच्या कॅम्प भागातलं एक पुस्तकाचं दुकान. दुकान नाही म्हणता येणार, ते एक पुस्तकं, ग्रंथ आणि मासिकांचं भलं मोठं दालनच. एक अफाट सागर, खजिना.  

डेक्कनवरून महानगरपालिकेच्या इमारतीला डावीकडे ठेवून जुन्या बाजारापर्यंत येईपर्यंत चांगलाच दम लागलेला असायचा आणि त्यात कुणी डबलसीट असेल तर मग विचारायलाच नको. अर्थात असं असलं तरी डावीकडे स्टेशनला जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वऴलं आणि लाल देऊळ दिसायला लागलं की अंगातला शीण कुठल्याकुठे पळून जायचा. तिथून मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जाताना उजवीकडे आधी दोराबजी, मग वेस्टएन्ड थिएटर आणि थिएटर ओलांडलं की उजवीकडेच तळमजल्याला, फूटपाथला लागून मॅनिज. 

त्याचं नाव बहुधा मॅनिज बुक स्टोअर किंवा मॅनिज बुकसेलर्स असं काहीसं होतं. अर्थात आमच्यासाठी ते फक्त मॅनिजच. जुन्या पद्धतीची काळ्या पाटीवर पांढरी अक्षरं असलेली ती जुनीच पाटी. बाहेर काचा, वरपासून खालपर्यंत. त्यात नवी कोरी नुकतीच आलेली पुस्तकं मांडून ठेवलेली. कधीतरी त्यात काही प्रख्यात लेखकांचे  मोठाले फोटो. काही पुस्तकांची पोस्टर्स. कधी आगामी पुस्तकांविषयी चित्रं... त्या धूसरशा काचांमधून आतलं अस्पष्ट दिसत असे. पुस्तकं बघत फिरणारी माणसं. पुस्तकाची मोठमोठी रॅक्स आणि डावीकडे वर जाणारा छोटासा जिना. त्या धूसरशा काचांमधून आम्हाला नेहमीच आतमध्ये काहीतरी गंभीर, गूढ चाललंय असं वाटायचं. धूरकट गुहेतून दाढीवरून हात फिरवत कार्ल मार्क्स किंवा एरिक फ्रॉम किंवा सार्त्र वगैरे चालत येतील असंच वाटायचं. त्या धूसरशा वातावरणामुळे एक अस्पष्ट गूढ वातावरण तयार व्हायचं. त्यानंतर दार उघडून आत गेलो की मग मात्र आमचा आमच्यावरचा ताबाच हरवायचा. आपापल्या आवडीप्रमाणे मग आम्ही त्या पुस्तकाच्या दुकानाच्या रॅक्सनं बनलेल्या गल्ल्यांमधून फेरफटका मारायला मोकळे असायचो. प्रदीप असेल तर तो हमखास अर्थशास्त्राच्या किंवा शिरीष असेल तर सायन्स फिक्शनच्या विभागाच्या अासपासच त्यांचे पाय वळायचे. 

मला आठवतं त्याप्रमाणे मी पहिल्यांदा मॅनिजला गेलो तेंव्हा बरोबर समर होता. समर नखाते. वेस्टएन्डला कुठला तरी सिनेमा पहायला आम्ही दोघं आलो होतो आणि लवकर पोचलो, वेळ होता म्हणून मॅनिजमध्ये घुसलो. त्याअगोदर इथे पुस्तकाचं दुकान आहे असं माहीत होतं पण आत मध्ये जाण्याचं सुचलं नव्हतं. पैसे नसायचे हे एक कारण होतंच आणि पुस्तकाच्या दुकानात जाण्याची आणि त्या दुकानात फिरत, पुस्तकं बघत, पुस्तकं चाळत शोध घेत रहाण्याची संस्कृती अंगात भिनली नव्हती. अजुनही लख्ख आठवतंय, पहिल्या वेळी आत गेलो तेंव्हा आत भगवे किंवा तत्सम कपडे घातलेली रजनीशांची शिष्य मंडळी होती. बहुसंख्य गोरी, परदेशी मंडळी. आमच्या कडे  त्यादिवशी फार वेळ नव्हता पण जेव्हढा वेळ होता तेव्हढा वेळ समरनी मला चित्रपटविषयक पुस्तकं दाखवण्यात घालवला होता. जगातल्या काही नामवंत दिगदर्शकांविषयी किंवा काही नामवंत चित्रपटांविषयीची ती मोठाली पुस्तकं. मी जरा संकोचलेला होतो. पुस्तकं बघताना कोणीतरी हटकेल, काय हवंय, खरंच घेणार का असं विचारेल असं वाटायचं. खिशात पैसे नसल्याची जाणीव तर मनात होतीच पण सिनेमाची वेळ तर चुकणार नाही ना असंही मनात होतं. दहा-पाच मिनिटात आम्ही तिथून बाहेर पडलो. सिनेमाला जाऊन बसलो. सिनेमा संपला, घरी परत आलो तरी मनातलं मॅनिज काही जाईना. पहिल्याच भेटीत मॅनिजनं मनाचा ताबा घेतला होता. मनात संकोच होता, खिशात पैसे नाहीत ही जाणीव होती पण ही काहीतरी गंमत आहे, इथे पुन्हा पुन्हा यायला हवं असं मात्र पहिल्याच भेटीत वाटायला लागलं.  

मॅनिजशी नातं जुळलं हे त्या दिवशी. 

नंतर मग डिलाईट च्या गप्पात मधून मधून मॅनिजचा उल्लेख होऊ लागला. तू हे वाचलंस का, त्या अमुकच्या लेखकाचं नवं पुस्तक आलंय बघ कालच मी मॅनिजमध्ये पाहिलं अश्या गप्पांतून मॅनिज रोजच आमच्यात राहिलं. मॅनिजवरच्या चकरा वाढल्या. मॅनिज चा उल्लेख हा सतत कॅफे डिलाईटवर व्हायचाच. मॅनिजची आठवण आली आणि त्यात डिलाईट नाही असं होणार नाही.  

कॅफे डिलाईट.... डेक्कनवर कॅफे गुडलकच्या समोर, फर्गसन रोडवरचं एक निवांत, एैसपैस रेस्टॉरंट. सध्या ते अस्तित्वात नाही पण आम्ही कॉलेजमध्ये असताना तासनतास त्या डिलाईट मध्ये पडीक असायचो. अक्षरश: तासनतास. आमचं घरंच ते. पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघटना नावाची आमची डाव्या विचारांचा प्रभाव असणारी विद्यार्थी संघटना होती. १९७७-७८-७९ चा हा काळ. आणिबाणी नुकतीच संपली होती. अमेरिकेसारख्या बलाढ्य ताकदीला व्हिएटनामसारख्या छोट्या देशानी धूळ चारली होती. बदलाचे वारे देशातच काय पण सर्व जगात वहात होते. देशात जनता सरकारचा प्रयोग चालू होता, फसत होता. शरद पवारांचा पुलोदचा प्रयोग आणि त्याचं राजकारण चाललेलं होतं. सगळ्या जगात, सगळ्या समाजाचीच घडी नव्यानं घातली जात होती. मागोवा, युक्रांद, लाल निशाण, नक्षलवादी चळवळ जोरात होती. महाराष्ट्राचा कानाकोपरा छोट्या-छोट्या जनसंघटनांनी, त्यांच्या आंदोलनांनी ढवळून निघत होता. दलित साहित्य, ग्रंथालीची वाचक चळवळ आकाराला येत होते. पुण्यात ईराणी विद्यार्थ्य़ांचे दोन गट एकमेकांत खून पाडण्यापर्यंत भांडत होते. जगच बदल मागत होतं. फ्रान्स, युरोपातील विद्यार्थी संघटना जोरात होत्या. जगात महिला समानतेची चळवळ सुरुवातीचे धडे गिरवत होती. ह्या सर्वाचे पडसाद सर्व महाराष्ट्रात उमटत होते. एक गाव एक पाणवठा, शिवसेना, विद्यार्थी परिषद, ग्राहक पंचायत अश्या राजकीय, निम-राजकीय चळवळींची सुरुवात होत होती. काहींचा काही काळ गेला होता, त्यांचाही पुढचा शोध चालू होता. 

वातावरणातच बदल होता. शोध होता आणि काही आग्रह होता. उत्सुकता होती. जगात काय चाललंय हे आम्हाला समजण्याची तहान होती. आमच्या सर्वांचं वयही तेंव्हा १८ ते २० च्या दरम्यानचं होतं. मनात एकंदरच जिज्ञासा होती आणि त्याचवेळी आम्हालाही तेंव्हा मॅनिजच्या रूपानी एक आधार मिळाला. जगाशी जोडलं जाण्याची एक खिडकी मिळाली.   

मॅनिज ह्या नावाची एक गंमत आहे. मणी ह्या नावाचा कुणीतरी ह्या दुकानाचा मालक. मणीचं दुकान म्हणून Manney’s - मॅनिज. दुकान नेमकं कधी सुरु झालं माहीत नाही पण कॅम्पातील इंग्रजी वाचणारी, ओशो आश्रमातली शिष्य मंडळी किंवा परदेशातून पुण्यात स्थायिक झालेली मंडळी ह्यांच्या आधारावर मॅनिजची सुरुवात झाली असावी. पुण्याच्या लष्कर भागातील अत्यंत जागतिक, वैश्विक किंवा कॉस्मोपोलिटन समाजाची मॅनिज ह्या नावाचं पुस्तकाचं दुकान ही एक त्या काळातली महत्वाची गरज असणार. तिथला संग्रह आणि तिथली एकूण मांडणी हे त्याचंच द्योतक होती. 

“पुश” असं लिहिलेलं काचेचं दार ओलांडून आत गेलं की समोर अगदी आज किंवा मागच्या आठवड्यात प्रकाशित झालेली पुस्तकं असत. त्यानंतर जगात त्या काळात, त्या महिन्यात बोलबाला असणारी पुस्तकं. त्याच्या मागचा रॅक मासिकं आणि नियतकालिकांचा. हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू, टाईम, न्यूजवीक, द इकॉनॉमिस्ट ही मासिकं पहिल्यांदा मी पाहिली ती ह्याच रॅकवर. ही मासिकं चाळणं, त्यातले फोटो पहाणं, उभ्या-उभ्याच काही लेख वाचणं असं आम्ही त्यावेळी करायचो. कित्येकदा तर ही मासिकं नुसती पहाण्यासाठी आम्ही सायकलवरून डबलसीट दहा-दहा किलोमीटर्स जाऊन ती मासिकं पाहून यायचो.  कारण तेंव्हा खिशात पैसे नसायचे. आज ही मासिकं घरी येतात किंवा आयपॅडवर, स्मार्टफोनवर सहज मिळतात पण त्यावेळचा आमचा तो आनंद, त्यावेळची ती अधिरता ह्यानं आमचं जगणं किती सुंदर केलं होतं असं वाटतं.

कधीकधी डिलाईटवर बसल्या बसल्या वादावादी व्हायची. कोणीतरी इथल्याच एखाद्या मासिकाचा संदर्भ द्यायचं. त्यानंही ते मासिक तसं उभ्या-उभ्याच पाहिलेलं असायचं आणि मग आम्ही दोन-पाच जण तो संदर्भ पहायला सायकल हाणत मॅनिजवर जायचो. ते मासिक किंवा तो संदर्भ तर पहायचोच पण त्याखेरीज इतरही बरंच काही पाहून यायचो. एकदा प्रदीप आपटेनी गार्डियन किंवा तत्सम कुठल्यातरी वर्तमानपत्राचा संदर्भ दिला होता. व्हिएतनाम युद्धाशी काहीतरी संबंध होता त्याच्याशी. तो संदर्भ पहायला आम्ही किती आटापिटा करत गेलो होतो हे मला अजून आठवतंय. ते सुद्धा तो लेख उभ्या-उभ्याच वाचण्यासाठी. त्या मासिकांच्या शेजारी वर्तमानपत्रं असायची. लंडनचा टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाईम्स, इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून ह्यासारखी वर्तमानपत्रं तिथं आम्ही पहायचो. आसपासची परदेशी मंडळी इथे येऊन आवर्जून ही वर्तमानपत्रे विकत घेऊन वाचायची. आम्हीही गुरुवारी किंवा शुक्रवारी तिथं गेलो की आम्हाला रविवारची ही वर्तमानपत्रं पहायला मिळायची. असं आमचं आणि मॅनिजचं नातं होतं आणि त्यात तिसरे होते कॅफे डिलाईट. ज्याचं मॅनिजशी अतूट नातं होतं, निदान आमच्या संदर्भात तरी. 

मॅनिजमध्ये शिरल्या शिरल्या उजव्या बाजूला अध्यात्मिक पुस्तकांचा एक मोठा विभाग होता. खूपच मोठा. तिथे झेन, ताओ, बुद्धिझम ह्यासारख्या पुस्तकांचा भरणा होता. शंबाला प्रकाशनाची किंवा बाहेर कुठंही न मिळणारी पुस्तकं इथे हमखास मिळायची. ओशो आश्रमातील साधकगण हा ह्या पुस्तकांचा प्रमुख वाचक असावा, पण ही पुस्तकं चाळताना, ती विकत घेताना मी पुण्यातील काही प्राध्यापक मंडळी, काही जाणकार ग्रंथपाल ह्यांनाही तिथं पाहिलं आहे. जगातले कित्येक लेखक तिथे समजले. कित्येक लेखकांशी तेंव्हा आेळख झाली. जग समजायला लागलं. जगात किती किती विषय आहेत, ते कसे मांडले जातात. माणसाला किती वेगवेगळ्या प्रकारची जिज्ञासा आहे. माणसाचं क्षितीज किती विस्तीर्ण आहे, त्यामानानं पुण्यातलं आपलं विश्व किती छोटं आहे हेही समजत गेलं.   

त्यावेळी डिलाईट ला शशांक ओक सुंदर सुंदर झेन कथा सांगत असे. त्यावेळी तो “आैद्योगिक लोकशाही” हे त्याचं अभ्यासपूर्ण पुस्तक किंवा “ अमुकचे स्वातंत्र्य” ही कादंबरी लिहीत असावा. डिलाईट मध्ये बसल्या बसल्या एखाद्या चहाच्या कपाबरोबर एखादी झेन कथा तो अत्यंत रंगवून सांगायचा, त्यातला अर्थ सापडला किंवा नाही सापडला असं वाटायचं. तो देखील त्या कथेचा अर्थ सांगायचा नाही. म्हणायचा: नदीचं मूळ जसं विचारू नये तसा झेन कथेचा अर्थ विचारू नये आणि विचारलं तरी सांगू नये. त्यानं सांगितलेली अशीच एक कथा डोक्यात असताना पॉल रेप्स नी भाषांतर केलेलं “Zen Flesh, Zen Bones” हे पुस्तक मला मॅनिजमध्ये सापडलं आणि एक वेगळंच पर्व सुरु झालं. मॅनिजमध्ये झेन, ताआे ह्यांच्यावरचा पुस्तक खजिना खूपच मोठा होता. जवळ असलेल्या रजनीश आश्रमाचा परिणाम असावा तो. त्या विषयांवरची अगणित पुस्तकं तेंव्हा मॅनिजनं दिली. डिलाईट मधल्या झेन कथा आणि मग तशाच पुस्तकांचा मॅनिजमधला शोध हा प्रकार माझ्या बाबतीत सतत चालू राहिला, तो अगदी डिलाईट बंद होईपर्यंत. साधारण ८७-८८ च्या सुमारास डिलाईट बंद झालं आणि जगातल्या खूपच गोष्टी बंद व्हायला सुरुवात झाली, अर्थात नव्या सुरु होण्यासाठीच... नंतर आत्तात्तापर्यंत मॅनिज चालू होतं, अगदी २०१२ पर्यंत. अगदी १९७६-७७ पासून काल परवा मॅनिज बंद होईपर्यंत वेगवेगळ्या  काळात, वेगवेगळ्या वर्षात त्या त्या वेळच्या जिज्ञासेपोटी मॅनिजच्या त्या त्या दालनात मी जात असे. 

अर्थात हे जरी खरं असलं तरी डिलाइट वरच्या गप्पा असतानाचं मॅनिज आणि नंतरचं मॅनिज ह्यात फरक आहे. डिलाईट असतानाचं मॅनिज म्हणजे भरल्या घरासारखं वाटायचं. घरात लगबग आहे. सणावाराची गडबड आहे. लेकी-सुनांची धांदल आहे. मुलं पळापळ करताहेत असं वाटायचं. डिलाईट पडलं आणि भरल्या घरातून मुलं परदेशी शिकायला गेली, काही जेष्ट मंडळींचा कार्यभाग आटोपला की एखादं खेळतं घर कसं सुनं सुनं वाटतं तसं मॅनिज वाटायला लागलं. पण तरीही मॅनिजनं पुढे २५ एक वर्ष तरी साथ दिली. मध्यंतरी आठ-नऊ वर्ष नागपूला होतो, आॉक्सफॅम मध्ये असताना तेंव्हाही अगदी दोन दिवस पुण्याला आलो तरी छोटी चक्कर तरी मॅनिजला व्हायचीच. तेंव्हा तर अॉक्सफर्डच्या, केंब्रिजच्या डिलन्स मध्ये सतत जायचो तरी मनावरचं मॅनिजचं गारूड काही उतरलं नाही. 

जशी जशी जिज्ञासा वाढत गेली, विषय बदलत गेले तसा तसा माझा मॅनिजमधला फेरफटका आणि तिथले आवडते रॅक्स बदलत गेले. सुरुवातीच्या काळात चित्रपट पहाण्याची आवड तीव्र असताना मॅनिजच्या मधल्या बाजूला असणारी रॅक्स मी हमखास बघत असे. समाजकार्य विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम  करत असताना अगदी उजवीकडला कोपरा धरून उभी असणारी कपाटं पाहिली जायची. प्रशिक्षणात होतो तेंव्हा किंवा स्वत:ची कंपनी काढून काम सुरु केलं तेंव्हाही तिथला व्यवस्थापनक्षेत्राची पुस्तकं असणारा विभाग सतत भेटायचा. मध्यंतरी सलग साडेतीन वर्ष दैनिक लोकसत्ता मध्ये मी एक सदर चालवत होतो. तेंव्हाही वेळेचं व्यवस्थापन, कार्यसंस्कृती ह्यासारख्या विषयावरची पुस्तकं तिथे धुंडाळली जायची. मागच्याच बाजूला लोकसत्ताचं कार्यालय होतं, साधारण आठवड्याचं लेखन सुभाष नाईकांना किंवा संगोरामांना दिलं की मी मॅनिजमध्ये मुलुखगिरी करायला जायचो. महाराष्ट्रात सुमारे एक हजार किलोमीटर्सची दुष्काळ आणि पाणी ह्यावरची पदयात्रा काढायची ठरवली आणि मी तयारीसाठी मॅनिजमध्येच आलो. नुसती दुष्काळ, पाणी ह्यावरची पुस्तकं नव्हे तर चालायचं कसं, बूट कुठले वापरावेत ह्यावर सुद्धा त्यावेळी मी मॅनिजचा सल्ला घेतला होता.       

काल-परवा मॅनिज बंद होणार असल्याची बातमी कानावर आली आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागलो. मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले असताना, एखाद्या विषयावर काही माहिती हवी असताना, कुठे काही यश मिळालं की त्याचा उन्माद असताना किंवा काहीही विशेष घडलेलं नसतानाही मॅनिज ची पायरी मी चढलेलो आहे आणि ऊत्तरं घेऊन किंवा न घेऊन किंवा कधी कधी जास्त प्रश्न मनात घेऊन परतलेलो आहे. 

प्रत्येक माणसाला असं एक मॅनिज सारखं दुकान असण्याची गरज आहे. मला तर आणखीही अशा काही जागा त्यावेळी होत्या. डेक्कनवर लकडीपूलाचा कोपरा आहे तिथं इंटरनॅशनल बुक सर्व्हीस हे दुकान आहे. अजून आहे. ह्या पुस्तकाच्या दुकानाचं असं सांगतात की डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणे अगदी केंद्रीय मंत्री असताना इथे यायचे आणि ते आले की ह्या पुस्तकाच्या दुकानाची दारं लावून घेतली जायची आणि मग ते स्वत: शांतपणे पुस्तकाच्या सानिद्ध्यात तासनतास घालवत आणि जाताना गाडीभरून पुस्तके घेऊन जात. त्याच दुकानाच्या पायरीवर रविवारी, दुकान बंद असताना, संध्याकाळी त्याच दुकानातील जुनी, न खपणारी पुस्तकं घेऊन तिथलेच एकजण विकायला असत. रविवारी तिथे जाऊन काही चांगली, स्वस्त आणि दुर्मिळ पुस्तकं मिळतात का हे पहायला मी आणि जयू कित्येक वर्ष जायचो. तिथनं खूप चांगली चांगली पुस्तकं आम्ही आणली आहेत. एकदा कुमार केतकर घरी आले असताना कपाटात त्यांना Abnormal Psychology हे पुस्तक दिसलं आणि ते चकीत झाले. त्यांना ते पुस्तक काही केल्या मिळत नव्हतं, पण मला ते त्या पुस्तकाच्या दुकानाच्या पायरीवर मिळालं होतं. सॉल अॅलिन्स्की च्या पुस्तकाची अशीच मजा. अॅलिन्स्की हा एक मोठा, भला  माणूस. लोक-आंदोलनं कशी करायची, लोक-आंदोलनांचं विज्ञान कसं ह्या विषयांचा हा माणूस आद्य शिक्षक. अगदी नवा संदर्भ द्यायचा तर ओबामा आणि हिलरी ह्या दोघांच्या लोक-संघटनेच्या कामात त्यांना अॅलिन्स्कींच्या शिकवणीचा फायदा झाला असं त्यांनी म्हटलं आहे. एकदा असंच संध्याकाळी माझ्या मुलीला कडेवर घेऊन रविवारी आम्ही पुस्तकं पहायला गेलो होतो. तिथे अॅलिन्स्कींचं “Reveille for Radicals”  हे पुस्तक पाहिलं. मी उत्सुकतेनं पुस्तक चाळलं. मला फारच गम्मतशीर वाटलं. लोक-संघटना बांधत असताना कार्यकर्ते कसे वागले पाहिजेत ह्याच्या सुंदर टिप्स ह्या पुस्तकात दिल्या आहेत. मी किंमत विचारली. त्या गृहस्थानी मला दोन बोटे दाखवली आणि ते काहीच बोलले नाहीत. मला वाटलं वीस रुपये. १९८५-८६ च्या सुमारास एखाद्या माहीत नसलेल्या लेखकाच्या जुन्या पुस्तकाची किंमत वीस रुपये मला जरा जास्त वाटली. मी आश्चर्याने म्हटलं: वीस रुपये? तेंव्हा त्यानी मान डोलावून म्हटलं: “नाही. दोन रुपये.” तात्काळ ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि त्या दोन रुपयांच्या खरेदीनी पुढे माझी लोक-आंदोलनांकडे पहाण्याची दृष्टीच बदलली. काही नवे मित्र मिळाले. आत्ताचे आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित आणि मी, आम्ही पुढे ह्या पुस्तकाची पारायणे केली. विवेकनी त्यावर आधारीत एक पुस्तकही लिहिलं. एकदा अमेरिकेत फिरत असताना त्याला तिथे ‘सॉल अॅलिन्स्की इन्स्टीट्यूट’ सापडली आणि त्यानं अत्यानंदानं मला तिथून फोनही केला होता.  

काही महत्वाच्या पुस्तकांनी मला झपाटून टाकलं त्यात हे दोन रुपये देऊन, इंटरनॅशनलच्या फूटपाथवर रविवारी संध्याकाळी घेतलेलं पुस्तकही आहे. त्या पुस्तकाचा प्रभाव माझ्या मनावर सदोदित राहिलच. अगदी शेवटपर्यंत किंवा कदाचित नंतरही. 

परवा असाच रविवारी डेक्कनवरून चाललो होतो. पुस्तकाच्या दुकानाच्या पायरीवर मांडलेली पुस्तकं मला दिसली नाहीत. दुकान बंद होतं आणि पायरीवर सण आला म्हणून मेंदी, टिकल्याची पाकिटं विकायला होती. ‘सध्या इथे रविवारी पुस्तकं घेऊन कुणी बसत नाही का?‘ हा प्रश्नदेखील विचारावा असं तेंव्हा मला वाटलं नाही. वाटलं: नकोच ते.  

तिथूनच थोडं पुढे गेल्यावर डेक्कनवरचं चितळ्यांचं दुकान आहे. तिथं एकदा मला माझे काका भेटले होते. संध्याकाळची वेळ होती. त्यांच्या हातात भाजीच्या पिशव्या. माझ्या कडेवर मुलगी. सध्या काय वाचतोयस असं मला त्यांनी विचारलं. मी सहज म्हणालो: ताओ. ते ऐकल्यावर त्यांनी मला हिंदू धर्मातच कशी बुद्ध धर्माची बिजं आहेत किंवा उपनिषदांमध्ये कसा अत्यंत मूलभूत विचार केला आहे हे सांगायला सुरुवात केली. दोन्ही हातात दोन पिशव्या. माझ्या  कडेवर मुलगी. अशा अवस्थेत तिथं माझ्या काकांनी मला तासभर व्याख्यान दिलं. माझे काका म्हणजे डॉ. वि. रा. करंदीकर, फर्गसन मधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले होते. येता जाता लोक त्यांना नमस्कार करत पण तासभर त्यांचं हे व्याख्यान चालू होतं. त्यांना कुठलीही घाई नव्हती. कुठलीही मालिका त्यांना बघायची नव्हती. मलाही नव्हती. त्यांना एकच ध्यास होता. त्यांना मला उपनिषदात काय आहे हे समजावं हा ध्यास होता. ताओ समजून घेताना आपण ह्या देशात काय विचार केला आहे हे मला नीट समजावं हा त्यांचा उद्देश होता. ज्ञानमयी वातावरण सर्वत्र होतं. पुस्तकाची दुकानं, माझ्या काकांसारखी माणसं हे ज्ञानाचं, विचारांचं वातावरण टिकवून ठेवत होती. 

माझे काका आता ९४ वर्षांचे आहेत. कॅफे डिलाइट पडून पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झाली. आता मॅनिजही नाही. इन्टरनॅशनलच्या पायरीवर सध्या कुणी दिसतही नाही. पुस्तकांच्या सुंदर दुकानांची पवित्र जागा आता कपड्यांच्या किंवा आभुषणांच्या दुकानांनी घेणं सुरु झालं आहे. 

फोर्टमधलं स्ट्रॅन्ड, के सी कॉलेज जवळचं अॉक्सफर्ड, डेक्कनवरचंच पॉप्युलर अशी आणखी काही ठिकाणं. जिज्ञासेच्या भरतीच्या काळात ह्या सर्वांनी भरपूर ईंधन पुरवलं. अजूनही पुरवताहेत पण परवा मॅनिज बंद झाल्याचं कानावर आलं आणि ह्या सर्व आठवणी ऊफाळून आल्या. 

सध्या मी पुस्तकाच्या दुकानात जात नाही असं नाही. अवश्य जातो, पण मला पूर्वीसारखं वाटत नाही. पुस्तकाची दुकानं निश्चितच कात टाकताना दिसत आहेत. मोठमोठ्या मॉलमध्ये आकर्षक मांडणी करून ही दुकानं सजलेली आहेत. शेजारी घड्याळाचं दुकान आहे. पलीकडे कपड्याचं आहे.  तिथं जगातले उत्तमोत्तम ब्रॅन्ड्स आहेत. ह्याच दुकानात डिव्हीडिज, संगीताच्या कॅसेट्स विकायला आहेत. ह्या दुकानात पुस्तकं पहात असताना स्वत:चा विचार स्वत:ला ऐकता येणार नाही इतक्या मोठ्या आवाजात संगीत लावलेलं आहे. त्यातूनच तुम्हाला तुमचं पुस्तक शोधायचं आहे. ह्या आठवड्यातील सर्वाधीक खपाची पुस्तकं, टॉप टेन अशा वेगवेगळ्या याद्या उपलब्ध आहेत. चारीबाजूनी मारा चालू आहे. पुस्तकांची माहिती देणारी संकेत-स्थळं आहेत. त्या पुस्तकांमधील काही भाग तुम्हाला सहज पहाताही येतो. मग ते पुस्तक घेणं योग्य की अयोग्य हेही ठरवता येतं. माहितीच्या महाजालावर - Internet - ही नवनवी पुस्तकं परदेशात प्रकाशीत झाली की लगेचच इथे उपलब्ध आहेत. ती तुमच्याकडे यायला जरासुद्धा वेळ लागत नाही. एका क्लीकवर ती तुमच्या पॅडवर किंवा फोनवर उतरत आहेत, पण इतकं असलं तरी सध्या कॅफे डिलाईट नाही, तिथली रसरसती चर्चा नाही, उपनिषदांमध्ये काय सांगितलंय हे सांगण्यासाठी दोन्ही हातात पिशव्या असल्या तरी तासभर उभे रहाणारे काका नाहीत. 

प्रत्येक माणसाला एक पुस्तकाचं दुकान असायला हवं. जिथं तो बागडू शकतो. फेरफटका मारू शकतो. माणूस काय विचार करतो आहे ते तो समजून घेऊ शकतो. स्वत:ला शोधू शकतो. माणसाला ह्या दुकानाबरोबरच एक कॅफे डिलाईटही आवश्यक आहे. त्यात भांडणारे मित्र हवेत. रोज सतत काही ना काही नवं जुनं कानावर पडायला हवं. म्हणून माणसाला फक्त पुस्तकाचं दुकान असायला हवं असं नाही तर त्याला कॅफे डिलाईटही हवं आणि तासभर उभं राहून उपनिषद सांगणारे काकाही हवेत. 

सध्या कधीही डेक्कनवरून चाललो की जिथं मला अॅलिन्स्की भेटला त्या पायरीवर हातात प्लॅस्टीकची चित्रं घेऊन उभी असलेले विक्रेते दिसतात. तिथं बघण्याचं मी मुद्ाम टाळतो.. मॅनिजचं पण तसंच आहे.... ते बंद झाल्यापासून मी अजून त्या भागात गेलेलोच नाही... ते बंद मॅनिज मला मुळीच पहायचं नाही.



अनिल शिदोरे