शुक्रवार, डिसेंबर २६, २०१४

संकट आणि शांतता


२६ डिसेंबर २०१४

संकट आणि शांतता

आज थोडं घाईनं का होईना पण माझ्या मनात जे आहे ते कागदावर उतरवू दे..  अगदी आजच, कारण आजच्याला महत्व आहे.

बरोब्बर १० वर्षांपूर्वी आज सुनामीमुळं साधारण सव्वा-दोन लाख माणसं मृत्यूमुखी पडली आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले. पुण्यात “मैत्री” च्या स्वयंसेवकांची लगेच जमवाजमव झाली, पैसे-प्लॅस्टीक कागद-भांडी जमवायला सुरूवात झाली आणि चार-पाच दिवसात पहिली तुकडी कामाला गेली सुध्दा. “Taking people back to see” असं आमच्या मोहीमेचं नाव होतं, मराठीत म्हणता येईल: ‘लोकांना पुन्हा समुद्राकडे घेऊन जाताना …’. ह्या मोहीमेचं वैशिष्ट्य म्हणजे मोहीम सुरू झाल्यापासून १०० दिवसांच्या आत हे काम पूर्ण करून, त्याचे हिशेब लोकांसमोर सादर करून आम्ही परत देखील आलो. माझ्या अनुभवातील आपत्कालीन कामातील हे सर्वात उत्तम व्यवस्थापन असलेलं काम. ह्यानं मला “आपत्कालीन व्यवस्थापन” शिकवलं आणि आम्हीही ह्यातून एक उत्तम वस्तुपाठ शिकलो.

अशा खूपशा मोहीमांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचं एक कारण म्हणजे मी  “आपत्कालीन” कामात अग्रणी अशा जागतिक पातळीवरील Oxfam नावाच्या संस्थेत आठ-नऊ वर्ष होतो, त्यात काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या क्षेत्राच्या बाबत खूप शिकताही आलं.

विद्यार्थी होतो तेंव्हा १९७८ साली आंध्र वादळ झालं तेंव्हा पुण्यात मदत गोळा करण्याचं काम केलं. तेंव्हा आम्ही विद्यार्थी संघटनेत काम करत होतो आणि तेंव्हा विद्यार्थी संघटना शैक्षणिक विषयांवरच्या लढ्यांबरोबरच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दे, कामगारांच्या संपात पथनाट्य कर अशीही कामं करायच्या. तसंच आंध्र किनारपट्टीवर वादळ आलं आणि आम्ही पुण्यात मदत गोळा केली. नंतर ऐकलं ते भोपाळ गॅसगळतीचं प्रकरण. तिथेही आमच्या मित्रांपैकी काहीजण काम करायला गेले होते.

मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव आला तो मराठवाड्याच्या १९९० च्या दुष्काळात, मग लातूर च्या भूकंपात, जबलपूरला झालेल्या भूकंपात, ओरिसातील भीषण दुष्काळात, उत्तराखंड भूकंप, मध्य प्रदेश पूर, भूज भूकंप, सुनामी, कोकण पूर, “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” ही विदर्भ मराठवाड्यातील मोहीम, उत्तराखंड प्रलय आणि इतर एक-दोन आपत्कालीन प्रसंग. अशा सगळ्या प्रसंगातून गेलो. प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. प्रेतं काढणं, अगदी घाईनं मदत पोचवणं, त्यासाठी मैलोनमैल चालणं, योग्य माहिती घेणं, लोकांना तात्पुरता आसरा उभारणं ह्यासारखी कामं..

माणसाच्या वाट्याला असे प्रसंग पहाण्याचं येऊ नये, पण असे प्रसंग माणसाला पार बदलवून टाकतात हे मात्र खरं.

आपण किती तयार आहोत, किती तत्पर आहोत ह्याची कसोटी अशा प्रसंगात लागते.

मला आठवतंय भूज भूकंपाआधी मी फारच फीट होतो. एकदम तंदुरुस्त. अगदी नियमीत व्यायाम होता, रोजचं लांबवर चालणं होतं. त्याचा उपयोग झाला. तुमची शारिरीक तंदुरुस्ती किती आहे, मानसिक-भावनिक किती आहे, तुमचं व्यवस्थापन कसं आहे, पटकन निर्णय घेण्याची तुमची क्षमता कशी आहे ह्या सर्वांची कसोटी तिथे लागते. म्हणून माणसानं तत्पर असावं, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी असावी. तशी मेहनत घेत रहावं, तशी मनोधारणा असावी. म्हणजे कधीही कुठेही काहीही प्रसंग आला तरी अडचण येत नाही.

अशा प्रसंगात काम केलं की एक मनोधारणा बनते.

आज हे सगळं आठवतंय अशासाठी की महाराष्ट्रावर असा कुठलाच प्रसंग कधीही येऊ नये, पण तसा आलाच तर आपली तयारी आहे का? असं एखादं संकट येतंय असं ओळखण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे का? आलं तर तशी तत्परता आहे का? मानसिकता आहे का? तसं प्रशिक्षण आहे का? असे प्रसंग येऊच नयेत म्हणून आपण काळजी घेतोय की नाही? आणि, आलेच तर आपलं कमीत कमी नुकसान व्हावं म्हणून आपण तशी व्यवस्था लावली आहे का?

ह्या सर्वाचं उत्तर नाही असं आहे.

मला एक वाक्य आठवतंय: “म्हटलं आहे : युध्द आणि शांतता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. य़ुध्द आपण करतो शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शांतता असते तेंव्हा आपण तयारी करतो युध्दाची. ..” तसंच आहे. आत्ता काही संकट नाही म्हणून ते आलं तर कसं वागायचं? काय करायचं? ह्याची आपली तयारी आहे का?

अत्यंत खेदानं ह्याचं उत्तर “नाही” असं द्यावं लागेल.

ह्यावर आपण विचार करणार आहोत की नाही? आज ह्यादिवशी इतकंच… आणखी काय?


अनिल शिदोरे