शनिवार, फेब्रुवारी ०२, २०१३

मी राजकारणात का आलो?


सुमारे ३० वर्ष सामाजिक कार्य ह्या क्षेत्रात काम केल्यावर मी अचानक राजकारणात का आलो असा प्रश्न माझ्या अनेक मित्रांना पडला. त्यातल्या काहींनी विचारलं म्हणून हे लिहिलं: 


मी राजकारणात का आहे? राजकारणाकडे मी कसं पहातो?


२००६ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी आणि माझ्याबरोबरच्या साथीदारांनी “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” चा नारा देत महाराष्ट्रात पदयात्रा काढली. आष्टी ते वर्धा. पदयात्रा सलग ९४४ किलोमीटर्सची होती. पाणी, चारा आणि भूक ह्या गोष्टींची परिस्थिती काय आहे हे लोकांकडून समजून घेणे आणि त्यावर काय करता येईल हे पहाणे हा हेतू होता. 

ही पदयात्रा खूप काही शिकवणारी होती. 

गरिबी, दारिद्र्य, विषमता आणि भूक हे प्रश्न गहन आहेत. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यातली गुंतागुंत अचाट आहे हे लक्षात आलं. अश्या प्रश्नांना भिडायचं असेल आणि ते प्रश्न सोडवायचे असतील तर आपण मोठ्या पटलावर विचार करायला हवा. समाजाच्या मुख्य प्रवाहातील प्रभावी घटकांसोबत राहून काम करावं असं मनानं घेतलं. मग शासन, प्रशासन, राजकारण किंवा माध्यमं असे पर्याय होते. त्यातला ‘राजकारण’ हा पर्याय अधिक योग्य वाटला आणि असंही वाटलं की त्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांचा विचार करावा. त्याचवेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुरुवात होत होती. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मला असं वाटलं की इथे काम करताना मला माझ्या तत्वांशी आणि श्रद्धांशी फारकत घेण्याची वेळ येणार नाही. इथे मला माझा शोध चालू ठेवता येईल, पदयात्रेतून जे समोर आलं त्या प्रश्नांना ह्यांच्यासमवेत काम केलं तर थेट भिडता येईल, ते प्रश्न सोडवता येतील.

मी ज्या मध्यमवर्गातून आलो तिथे ‘राजकारण हे वाईट’ असं शिकवण्यात आलं. लोकशाहीमध्ये असं कसं म्हणता येईल? पण तरीही आयुष्याचा बराच काळ “हे वाईट, म्हणून नको” असं मानण्यात गेला. विद्यार्थी असताना मनावर थोडे मार्क्सवादी संस्कार झाले होते आणि म्हणून राजकारण पूर्ण मनातून गेलं नाही. नंतर समाजवादी, गांधीवादी आणि स्वयंसेवी चळवळीतील मित्रांसोबत ह्याचा विचार करत राहिलो ते जवळजवळ ३० वर्ष.

आपल्या सर्वांनाच समाज कसा असावा, तो कसा चालावा ह्याबाबतची स्वप्नं असतात. ती असावीतच. ती उत्त्ुंगही असावीत. ती स्वप्न असणं हा एक भाग आणि ती साकार होणं हा दुसरा भाग. ती साकार करताना काही सांभाळावं लागतं. खूप लोकांशी जमवून घेणं, त्यांना जेव्हढं समजून घेता येईल ते घेणं, काही बाबतीत काही गोष्टी चालवून घेणं, कधी काही सांगण्याचा प्रयत्न करणं, आपल्या मूलभूत तत्वांना मुरड न घालणं, संयम ठेवणं, स्वत:चा इगो बाजूला ठेवणं आणि त्यातून अवघड, किचकट गोष्टी साधण्याचा प्रयत्न करणं. ह्या सर्व गोष्टी मोठ्या पटलावर काम करताना कराव्या लागतात.

ते साधण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे. 

किती जमेल माहीत नाही. मात्र वाटतंय की ह्या प्रक्रियेला किमान दहा वर्ष दिली पाहिजेत. प्रत्यक्ष राजकीय पद घेऊन तर सध्या मला साडेतीन वर्ष झाली आहेत. 

त्यामुळे पल्ला अजून बराच बाकी आहे.

इतिहासातील क्षण


इतिहासातील क्षण

येणारं जग कसं असेल ह्यावर अनेकांचे अनेक विचार आहेत. 

कुणी म्हणतं संहारक अण्वस्त्रांच्या भितीमुळे आपण नामशेषही होऊ शकतो तर कुणी म्हणतं माणसाचा इतिहास हा सतत चांगलं होण्याचा इतिहास आहे. ह्याबाबत खूप मतं मतांतरं आहेत, पण एका बाबतीत मात्र बहुतेक सर्वांचं एकमत आहे आणि ते म्हणजे, येणारं जग हे स्त्रीचं जग नक्की असणार आहे.

हे लोक असं का म्हणतात?

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाची काम करण्याची पद्धत बदलत गेली. पूर्वी शारिरीक श्रमाला महत्व असे. त्या श्रमाचं मोल असे. आता असं नाही. सध्या संगणकामुळे, बदलत्या आर्थिक घडीमुळे स्त्रियांना खूप वाव मिळू लागला आहे. पूर्वी जे काम करायला मजबूत शारिरिक क्षमता लागायची आता तेच काम साध्या सोप्या शारिरीक श्रमात पण वेगळ्या प्रकारच्या काैशल्यांच्या संचात करता येतं. 

आर्थिक चाैकट बदलते आहे तशी राजकीय चाैकटही बदलते आहे. स्त्रीला प्रचंड वाव मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. तिच्या कामाचं वाजवी मूल्यं मिळणं, तिला योग्य सन्मान मिळणं ही गोष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. कधी नव्हे तेव्हढी स्त्रीच्या हक्कांविषयी आणि तिला सन्मान देण्याविषयीची जाणीव निर्माण झाली आहे. 

इतिहासातला हा एक महत्वाचा क्षण आहे. तो नेमकेपणानी पकडून स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामधील संपूर्ण समानता साधण्याचं काम आपण आत्ताच करू शकतो. आत्ताच.



अनिल शिदोरे