रविवार, फेब्रुवारी १६, २०२०

वाचा आणि गप्प बसा : गॅसच्या किंमती एका दिवसात का वाढल्या?

#वाचाआणिगप्पबसा क्रमांक : १

एका दिवसात गॅस सिलींडरची किंमत १४५ रूपयांनी का वाढली?

मागच्या आठवड्यात एका अभिनेत्रीनं किती बोल्ड सीन्स दिले, छत्तिसगडला कसा तीन तोंडांचा साप सापडला अशा गोष्टीत आपण व्यस्त असल्यानं आपल्याला गॅस सिलींडरचे भाव अचानक वाढल्याचं लक्षातच आलं नाही. 

१२ फेब्रुवारीला एका दिवसात, ज्यांना सबसिडी नसते अशा, गॅसची किंमत मुंबईत १४५ रूपयांनी वाढली. मुंबईत अशासाठी म्हणालो की स्थानिक करानुसार किमती बदलतात. पण एका दिवसात ६८४ रूपये ५० पैशाला मिळणारा गॅस ८२९ रूपये ५० पैसे झाला. एका दिवसात !

पूर्वी २-४ रूपयांनी महागाई झाली तरी आंदोलनं व्हायची. लोक पेटून उठायचे. सरकारकडे दाद मागायचे. पण सध्या तसं होत नाही. कुणी हूं की चूं करत नाही.

एका गॅस सिलींडरचे भाव एका दिवसात इतके वाढण्याचं कारण काय? 

आपण पण जरा खोलात शिरून ह्याचं कारण पाहू. 

गॅस सिलींडरच्या किंमती दोन गोष्टींवर ठरतात. एक म्हणजे आधारभूत आयात किंमत (Import Parity Price) आणि डॉलरमागे रूपयाची किंमत. सौदी अरेबियाची अरामको ह्या कंपनीची किंमत ही आधार म्हणून धरतात. ह्या अरामकोनी प्रोपेन (गॅस निर्मितीसाठी लागणारी महत्वाची गोष्ट) ची किंमत एका दिवसात ४४० डाॅलर्सवरून ५६५ डाॅलर्स केली. 

झालं, सगळं गणित बिघडलं. गॅस सिलींडरची किंमत वाढली. ज्यांनी सबसिडी नाकारली आहे त्यांना ती आपल्या खिशातून भरावी लागणार. ज्यांना सबसिडी आहे त्यांची वाढती किंमत सरकार भरणार म्हणजे नागरिकांच्याच खिशातून.    

आता ह्याला खूप सारी कारणं दिली जातील. काय करणार आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे चालावं लागणार. असंही म्हणतील की “थांबा जरा, किंमती चढल्या तशा उतरतील”. असंही म्हणतील “काय फुकट हवं आहे का सगळं मग?” 

काहीही झालं तरी सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. घरचं खर्चाचं अंकगणित बिघडणार आहे. बिघडत जाणार आहे.. पण आपल्याला ह्या विषयावर आंदोलन करण्याची इच्छा होत नाही. सरकारकडे गेलं तर सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवणार. तेल कंपन्यांच्या विरूध्द आंदोलन करून काय उपयोग असं आपल्याला वाटणार. 

आपल्याला सध्या रागच येत नाही. आपल्याला मूळ समस्यांकडे पहायचंच नाही. आपल्याला त्या समजून घ्यायच्या नाहीत. त्यामुळे इतकंच म्हणावं वाटतं “वाचा आणि गप्प बसा”.

सहज जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या सौदी अरेबियाचे भारतातले दोस्त कोण कोण आहेत ह्याचा शोध घ्या. अर्थात सहज वेळ असेल, इच्छा असेल आणि मुख्य जिज्ञासा असेल तरच. 

शुभेच्छा,


अनिल शिदोरे

२ टिप्पण्या:

  1. अहो असं काय नाही सौदी armaco च गॅस ची किंमत दर 1 तारखेला वाढते या कमी होते गॅस किंमत नेहमी प्रत्येक वर्षे च हे एक गणित ठरलेलं असत मार्च end जवळ येत असताना या दिवाळी महिन्यापासून किंमत वाढायला सुरवात होते आणि एप्रिल नंतर किंमत कमी होत जाते हे सर्व खेळाचे एक logic आहे मला याबद्दल थोडस mnl तरी माहित आहे अतिशय उत्तम प्रकारे आपणास अजुन काही माहिती हवी असेल तर मला mail करा कॉल वर बोलु

    उत्तर द्याहटवा
  2. मला सर्व बेसिक माहिती हवी आहे या विषयाची. मिळेल का.?

    उत्तर द्याहटवा