महाराष्ट्राला आज बाॅब डिलन हवा आहे:
बाॅब डिलनला परवा साहित्याचं नोबेल जाहीर झालं. वास्तविक डिलन हा रुढ अर्थानं साहित्यिक नाही. त्यामुळे त्याला हा पुरस्कार जाहीर झाला तेंव्हा जगात थोडं आश्चर्य वाटलं. .. मलाही वाटलं.
पाश्चिमात्य राॅक किंवा पाॅपविषयी मला फारशी माहिती नाही. कधी कधी कानाला गोड लागतं म्हणून ऐकत रहातो इतकंच. लिहिताना मला काही ऐकायला आवडतं. मग मी बाजूला काहीतरी लावून ठेवतो. तितकाच माझा ह्या संगीताशी संबंध.
त्यामुळे डिलनविषयी फार माहिती नव्हती.
एका गोष्टीमुळे मात्र त्याच्याबद्दल कुतूहल वाढलं. पूर्वी कधीतरी बराक ओबामांचा बाॅब डिलन हा आवडता गायक आहे हे वाचलं होतं. पण त्यापेक्षाही त्याला पुरस्कार देताना नोबेल कमिटीनी जे म्हटलं ते महत्वाचं होतं. त्यांनी म्हटलं होतं की “बाॅब डिलन ह्यांना हा पुरस्कार देण्याचं कारण म्हणजे त्यांनी थोर अमेरिकन गीतांच्या, गाण्यांच्या परंपरेतून एक नवा काव्याविष्कार तयार केला”… म्हणजे गाणी आणि गीतांमधून एका नव्या प्रकारच्या काव्याचा शोध घेतला.
गाणी, गीतं हे लोकांच्या आवडीचे, लोकांच्या ओठावरचे “पाॅप्युलर” असे प्रकार आणि, कविता म्हणजे जरा थोडक्या अशा अभिजनांच्या आवडीचा मात्र जीवनाचा काहीतरी सखोल अर्थ शोधणारा प्रकार. अमेरिकन गाणी, तिथल्या लोकांच्या ओठावरची गीतं ह्याची एक परंपरा आहे. अनेक थोर गायक त्या परंपरेत गाऊन गेले. अजून ती परंपरा चालू आहे. त्या परंपरेत डिलननी एक काव्याचा अनुभव दिला. सामान्य माणसांची गाणी त्यांनी अशा पातळीवर नेली की त्यातून एक जीवनानुभव मिळू लागला.
सर्वसामान्य माणसाच्या आवडीमध्ये त्यानी अर्थ भरला. म्हणजे जे सर्वांना आवडतं ते वरच्या दर्जाचं नसतं ह्याला छेद दिला. तेही कायम स्वरूपी टिकणारं असतं, थोर असतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं. अभिजन वर्गाची अभिजात कला ही काहीतरी वेगळी असते हे खोटं पाडलं. सामान्य माणसाचं, त्याला आवडणारं साहित्य ह्यालाही कशी एक उंची गाठता येते हे सांगितलं.
अर्थात महाराष्ट्राला हे माहीत नाही असं नाही. महाराष्ट्राचं संतसाहित्य हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपलं संतसाहित्य हे अभिजन वर्गाचं नाही. ते सर्वसामान्य माणसाच्या अगदी काळजातलं आहे. साहित्य, कवितांपेक्षा अभंग, भारूड आणि किर्तनातलं आहे, पण तरीही अभिजात आहे.
म्हणजे कलेच्या क्षेत्रात अभिजनांची कला वेगळी आणि सर्वांना जी आवडते ती वेगळी असा फरक नसतो. सर्वसामान्यांना आवडणारं हे थातुरमातुर असतं, वरवरचं, लवकर नष्ट होणारं असतं असं नाही. गाणी ही कवितांपेक्षा मुळीच कमी दर्जाची नाहीत. कलेच्या क्षेत्रात अशा जाती, असे वर्ग नाहीत. तर त्यात त्या त्या प्रकारचं अस्सल असं असतंच असा ह्या पुरस्काराचा अर्थ आहे.
ह्या बाॅब डिलनच्या कलेच्या व्यासंगाची सगळी जोपासना अमेरिकेतील नागरी अधिकारांच्या आंदोलनात तयार झाली. त्यानी जी गाणी दिली त्यात नवतरूणांचा आक्रोश होता, व्यवस्थेविरूध्दची चीड होती, धिक्कार होता. त्याच्या गाण्यांना “प्रोटेस्ट साॅन्ग्ज” म्हणायचे.. त्या आक्रोशातून नव्या समाजाची मांडणी करत अमेरिकन बदलाला त्यानं त्याच्या गाण्यातून कवेत घेतलं होतं, व्यक्त केलं होतं.
आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? सध्याच्या अस्वस्थ वातावरणाला आवाज देणारी गाणी मराठीत आज लिहिली जाताहेत का? आज दिसतंय असं की महाराष्ट्रातला तरूण नव्या समाजाच्या कल्पना घेऊन आला आहे. पण त्या आकांक्षांना शब्दरूप देणारी किंवा त्यांना नवी स्वप्नं देणारी गीतकार मंडळी, कवी मंडळी सध्या आपल्याला दिसताहेत का?
मराठीतही खरं तर बाॅब डिलनसारख्या गाण्यांची, गीतांची एक परंपरा होती. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशांनी महाराष्ट्राची स्थापना झाली तेंव्हा आपल्या गीतांनी, शाहिरीनी महाराष्ट्र जागृत केला होता, त्याला स्वप्न दिलं होतं. पण सध्या ती परंपरा खंडीत झालेली दिसत आहे.
मला आठवतं, काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या एका विद्यापीठात “आम्हाला इंजिनियर्स नको, कवी हवेत” अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं. कलेच्या अभ्यासक्रमांना सरकारी मदत कमी झाली होती त्यावरचा तो राग होता. त्यांचं म्हणणं की समाजाला इंजिनियर्स बरोबरच कवी आणि साहित्यिकांची तितकीच गरज असते.
पण, एखादा कोर्स सुरू करून किंवा महाविद्यालय काढून कवी तयार होत नाहीत. कवी काय किंवा लोकांच्या मनातली खदखद मांडणारे गीतकार काय, ते तयार होतात आसपासच्या वातावरणातून. आसपासचं वातावरण जर बदलाचं, परिवर्तनाचं किंवा कुठल्या ना कुठल्या धिक्काराचं असेल तर त्यातून उर्जा घेऊन कवी लिहितात. आणि, ते लिहायला लागले की त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा नवं वातावरण तयार होतं. नवनिर्मितीची भूक आसपास असेल तर त्या तडफेतून अशी गाणी तयार होतात.
मला आठवतंय आमच्या ९४४ किलोमीटर्सच्या पदयात्रेतून रोज चालता चालता कितीतरी गाणी तयार व्हायची. पहाटे उठून आम्ही निघालो की नेहमी कधीही कविता न करणारे स्वत:ची गाणी गायला लागायचे. गणपत भिसे किंवा बापू कुलकर्णींनी “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” वर कितीतरी गाणी लिहिली. आमचे निळोबा जाधव किर्तन परंपरेतले, ते त्या धाटणीत त्यांच्या मनातलं गायला लागायचे. गडचिरोलीच्या दारूमुक्ती आंदोलनात, मानवी हक्क अभियानाच्या मराठवाड्यातील आंदोलनात, विद्यार्थी संघटनेत किंवा अगदी मराठवाडा ईको ग्रुपच्या विकासवादी उपक्रमात देखील कितीतरी गीतकार, कितीतरी कवी निर्माण झालेले मी पाहिले आहेत. ही सगळी मंडळी त्या बाॅब डिलनचे भाईबंदच.
आज असं काही घडताना दिसत नाही. वातावरणातच गीतकारांचा उद्गार नाही. नवनिर्मितीची खळबळ नाही. समाजाला स्वप्न पडलेलं नाही. जसं स्वप्न डिलन गाऊ लागला तेंव्हा अमेरिकन समाजाला पडलं होतं.
वातावरणात गीतकारांचा उद्गार नसेल तर गंभीर गोष्ट आहे.
समाजाचा आक्रोश, समाजाचं म्हणणं मांडणारे आणि ते मांडताना नवसमाजाची कल्पना फुलवणारे कवी अधिकाधिक निर्माण व्हावेत आणि त्यांच्या गीतांमधून मराठी नवसमाजाची मांडणी व्हावी हीच इच्छा बाॅब डिलनच्या ह्या नोबेलच्या निमित्तानं माझ्या मनात आली. ती तुमच्यासमोर मांडली.
अनिल शिदोरे
१६ आॅक्टोबर, २०१६
या गोष्टी नाटकातुन किंवा पथनाट्य सादर करुनच समाजात रुजवता येतील... परंतु दुःख या गोष्टीच आहे की नाटक पथनाट्य हे फक्त पुणे मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरातच मर्यादित राहिलं.
उत्तर द्याहटवा