शनिवार, जुलै २७, २०१३

"लिंकन" चित्रपटाच्या निमित्तानं...


‘लिंकन’ चित्रपटाच्या च्या निमित्ताने...

इसवी सन १८६५. 

अमेरिका.

सर्वत्र प्रचंड बेदिली माजली आहे. एकाच देशातली राज्यं आपापसातच सैन्यं उभी करून लढताहेत. एकमेकांच्या रक्तासाठी सगळेच आसुसलेत. अमेरिका आतून बाहेरून उध्वस्त आहे, तुटलेली आहे. त्यातल्या काही राज्यांना वंशभेद मिटवायचा आहे, तर काहींना काळ्या नीग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करणं अयोग्य वाटतंय. ह्या मुद्दयावरच अमेरिकेत यादवी युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजंूनी हजारोंच्या संख्येनं सैनिक नाहक मरताहेत. ह्या अनर्थ युद्धाला आता चार वर्ष होत आलेली आहेत. 

इकडे, अब्राहम लिंकन पुन्हा एकदा अध्यक्ष होऊन दोनच महिने झालेत आणि अमेरिकेच्या संसदेत वंशभेदाचे निर्मूलन करण्याविषयीचा एक महत्वाचा ठराव दोन-चार दिवसातच येऊ घातला आहे. सर्वत्र तणाव आहे. लिंकन ह्यांना तो ठराव चर्चेस आणून मंजूर करायचा आहे आणि त्याचवेळी युद्धही संपवायचं आहे. दोन्ही एकाच वेळी. एक आधी, दुसरं नंतर असं नाही. कारण, एकाच वेळी दोन्ही गोष्टी झाल्या तरच हा वंशभेदाचा गहन प्रश्न कायमचा निकालात लागणार आहे. नाहीतर तो लटकणार आहे, रेंगाळणार आहे. सर्वत्र घोर निराशा दिसतीय आणि ह्यातून काही चांगलं घडू शकेल असं कुणालाच म्हणजे कुणालाच वाटत नाहीय.

ह्या परिस्थितीत काहीतरी सकारात्मक वाटतंय ते फक्त अब्राहम लिंकन आणि त्यांच्या निवडक साथीदारांना. अगदी निवडकच.

खरं म्हणजे गुलामगिरी नष्ट व्हावी असंही बहुसंख्यांना वाटतंय पण मार्ग दिसत नाहीय. व्हावी अशी इच्छा आहे पण होईल असं वाटत नाहीय. इच्छा असणं आणि प्रत्यक्ष घडणं ह्यात अंतर दिसतंय. सर्वत्र घोर आणि दाट निराशा. ह्याशिवाय घनघोर युद्धानं सगळे खचलेत ते वेगळंच.  

परिस्थिती ही अशी आहे. 

ह्याच परिस्थितीत अब्राहम लिंकन ह्यांची मात्र अव्याहत धडपड चालू आहे. त्यांना लागणारी दोन त्रितीयांश मतं त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठी त्यांना विरोधी पक्षाचेही काही लोक फोडावे लागणार आहेत. युुद्ध संपवणे आणि हा कायदा मंजूर करून घेणे अशी दोन्ही अवघड कामं लिंकन ह्यांच्या पुढ्यात आहेत. 

आता ही चर्चा संसदेत येणार म्हणून आपल्या घरीच, म्हणजे व्हाईट हाऊस मध्ये, त्यांनी थेडियस स्टीव्हन्स ह्यांना बोलावलं आहे. चर्चेसाठी. स्टीव्हन्स ह्यांना हा कायदा यायलाच पाहिजे आणि वंशभेद नष्ट व्हायलाच पाहिजे असं वाटतंय. अगदी मनापासून. 

व्हाईट हाऊसच्या शांत स्वयंपाकघरात उतरत्या संध्याकाळी लिंकन आणि स्टिव्हन्स बोलण्यामध्ये गढून गेले आहेत. वातावरण गंभीर आहे.

“तुमचं म्हणणं तुम्ही फार जोरकसपणे नका मांडू. त्यांनं लोक बिथरतील. त्यांच्या कलाकलानं घेत रहा, सबूरीनं बोलत रहा” लिंकन म्हणताहेत. 

“एकदा हे युद्ध संपू दे, मग ह्यातल्या प्रत्येक अन्याय आणि अत्याचाराचा हिशेब लावू आपण. संपत्तीचं वाटप करून टाकू. समता आणू.” स्टीव्हन्स कट्टर आहेत आणि आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्याची गरज त्यांना वाटते आहे. 

“ तसं नको. ते बोलूच नका आत्ता. जेंव्हा तीव्र मतभेद असतात तेंव्हा हळू जाण्याची गरज असते. लोकांच्या कलाकलानं. अगदी हळूवार. जसा वेळ पुढे सरकत जातो, तशी मग सर्वांच्या मनाची तयारी होत जाते.” लिंकन म्हणताहेत. 

“मला एक गोष्ट कळत नाही” स्टीव्हन्स अस्वस्थ आहेत. “लोकांच्या मनात काय चांगलं आणि काय वाईट ह्याचं काही सोयरसुतक असतं की नाही? गुलामगिरीसारखी प्रथा वाईट आहे, ती घालवली पाहिजे असं त्यांच्या मनातल्या होकायंत्राला कळत नाही का? खरी उत्तर दिशा कुठली आणि कुठं गेलं पाहिजे हे त्यांचं होकायंत्रं त्यांना सांगत नाही का?” स्टीव्हन्सना रहावत नाही. न्यायाच्या आणि चांगुलपणाच्या साध्या साध्या गोष्टी लोकांना का समजत नाहीत आणि नको तेंव्हा नको त्या गोष्टींवर राजकारण का आणलं जातं ह्यावर त्यांना बोलायचं असतं, पण लिंकन त्यांना थांबवतात, म्हणतात
“ तुमची तळमळ मला समजते, स्टिव्हन्स. पण मी तुमचं ऐकलं असतं तर आपण युद्धही हरलो असतो आणि आत्ता आलो आहोत तसे वंशभेदही संपवण्याच्या जवळही आलो नसतो.” 

लिंकन पुढे म्हणतात “ होकायंत्राचं एक असतं. ते फक्त तुम्हाला दिशा दाखवतं. पण त्या दिशेवर असलेले काटेकुटे, खाचखळगे कुठे आहेत आणि त्यावरचा उपाय काय हे ते नाही सांगत. तुमची दिशा योग्य आहे पण त्या दिशेनी चालताना तुम्हीच खड्ड्यात पडलात तर? संकटात सापडून बुडालात तर? नुसती दिशा माहीत असून उपयोगाचं नसतं, त्यावरच्या अडचणींवर मात करण्याची युक्ती पण माहीत असायला हवी असते.” लिंकन बोलता बोलता सत्य सांगून जातात. 

हे करायला हवं. तसं व्हायला हवं. तिकडे जायला हवं, तसं उद्दिष्ट ठेवायला हवं असं आपण सारखं बोलत असतो किंवा ऐकत असतो. हे खरं आहे की त्याविषयी बोलणारे अत्यंत मनापासून बोलत असतात. आपल्याच आसपास त्यांच्या त्यांच्या मनातल्या होकायंत्रानी दाखवलेल्या दिशेनी जाणारे, धडपडणारे काहीजण आपल्याला दिसतात. त्यांच्या कामाविषयी मग आपल्याला नितांत आदर वाटतो. ही मंडळी समाजाला दिशा देतील किंवा देत आहेत असंही आपल्याला वाटतं. त्यांना पाहिलं की आपल्याला “नवी पहाट झाली” असंही वाटायला लागतं. मग त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना पुरस्कार वगैरे देतो. पुरस्कार दिल्यानं समाजात चांगुलपणा टिकेल आणि समाजाला दिशा मिळेल असं आपल्याला वाटत असतं. अर्थात इतकं सगळं झालं तरी प्रश्न मात्र जिथे होता तिथेच असतो. होकायंत्रही दिशा बरोबर दाखवत असतं पण दरम्यान तिकडे जाण्याचा मार्ग अधिक भीषण आणि गुंतागुंतीचा झालेला असतो.  

स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांचा ‘लिंकन‘ चित्रपट पाहिला आणि मनात विचारांनी काहूर माजलं.

आपण महाराष्ट्रात प्रश्न सोडवण्यापेक्षा ते कुरवाळत बसलोय का? अवघड प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी मनोभूमिका आपल्याकडे आहे का? लोकशाही चाैकटीत राहून त्यात दिलेल्या आयुधांचा वापर करत मोठे बदल आपण करू शकतोय का?  तशी आपली तयारी आहे का?   

‘लिंकन’ ह्या चित्रपटात प्रश्नांना कुरवाळत बसणं नाही तर ते सोडवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आहेत. आग्रह आहेत तर प्रसंगी लवचिकता आहे. पटवापटवी आहे, लोकांना विकत घेणं आहे, लालूच दाखवणं आहे. सभागृहातील वाद आहेत. चर्चा आहे. शिव्या घालणं आहे. लोकशाही चाैकटीतल्या राजकारणात लागणारे सगळे भाव, स्वभाव आणि डावपेच त्यात आहेत. 

हा चित्रपट एक चित्रपट म्हणून किती लोकांना आवडेल किंवा ह्या चित्रपटाला किती पुरस्कार मिळतील हे सांगता येत नाही. स्टीव्हन स्पीलबर्ग सारखा माणूस ह्या चित्रपटाचा सूत्रधार, दिग्दर्शक आणि निर्माता असल्यानं ह्या चित्रपटाची नोंद तर घेतली जाईलच. शिवाय तो अमेरिकेच्या एका महत्वाच्या राष्ट्राध्यक्षांवर आहे, वंशभेदाच्या निर्मूलनाच्या विषयावर आहे, त्यामुळे त्या चित्रपटाची यथायोग्य आणि सांगोपांग चर्चा सर्वत्र होणारच हे नक्की आहे.

एक मात्र खरं की चित्रपटाचे नाव जरी ‘लिंकन’ असं असलं तरी सर्व कथानक हे लिंकन आणि त्यांचे सहकारी अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या घटनेत १३ वी दुरुस्ती कशी करवून घेतात ह्या एका घटनेभोवतीच गुंफलेलं आहे. 

ही घटना दुरुस्ती मात्र साधीसुधी नाही. संपूर्ण देशातून वंशभेद संपवण्याबाबतची ही घटना दुरुस्ती आहे आणि लिंकन ह्यांच्याकडे ती घटना दुरुस्ती करण्यासाठी लागणारं संख्याबळ नाही. आहे तो हा प्रश्न सोडवण्याची दुर्दम्य इच्छा. अगदी त्यांच्या स्वत:च्या पक्षातले लोकही सगळे एकदिलानं त्यांच्याबरोबर आहेतच असं नाही. मग ह्या परिस्थितीत त्यांनी हे संख्याबळ कसं मिळवलं, लोकांना कसं पटवलं, कुठल्या युक्त्या वापरल्या, हे सारं सारं ह्या चित्रपटात आहे. 

राजकारण रक्तबंबाळ आहे. राजकारण म्हणजे एक व्यवहार आहे. राजकारण म्हणजे चातुर्य आहे. त्यात भावना आहेत. आकांक्षा आहेत. त्यात विविध प्रकारचे मानवी आविष्कार आहेत. ते सर्व जाणून, प्रसंगी त्याचा उपयोग करून राजकारणातलं इप्सित कसं साध्य करावं लागतं ह्याचं उत्तम चित्रण ह्या चित्रपटात आहे. ‘लिंकन’ मध्ये खासदारांची मतं जमा करणारा, साैदेबाजी करणारा एक गट आहे तो कुणाकुणाला काय काय पदं देऊन पण वंशभेदाच्या निर्मूलनासाठी लोकांची मतं कशी फिरवतो हे पहाण्याजोगं आहे. राजकारणात राहूनही, लोकांना पटवा-पटवी करूनही, लोकांमध्ये स्पर्धा, इर्षा करायला लावूनही स्वत:चं तात्विक अधिष्ठान कसं राखायला लागतं, कसं राखायला पाहिजे ह्याचं दर्शन ‘लिंकन‘ चित्रपटापेक्षा चांगलं असं दुसरीकडे कुठहीे झाल्याचं मला तरी माहीत नाही.  

हा चित्रपट थोडा शब्दबंबाळ आहे. ह्यात खूप बडबड आहे. पण हा चित्रपट लोकशाहीवर आहे आणि लोकशाहीत शब्द हवेतच. चर्चा हवीच. त्याशिवाय मतं कळणार कशी, मतं मांडणार कशी आणि निर्णय घेतले जाणार कसे? ही शब्दबंबाळता थोडी सहन केली तर लोकशाहीतील आशा-आकांक्षांच्या विविध छटा इथे आपल्याला दिसतात. अवघड, गहन, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपलं सर्वांचं सामुहिक मन कसं असायला हवं आहे हेही ह्या चित्रपटातून आपल्याला दिसतं. समजतं.

काठावर उभं राहून राजकारणाला आणि राजकारण्यांना नावं ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गासाठी एक महत्वाचा संदेश ह्या चित्रपटातून आपल्याला मिळतो. तो अर्थात तसा घेणं मात्र आवश्यक आहे. आपण लोकशाहीची चाैकट स्विकारली आहे. समाजात कारभाराची तीच पद्धत सर्वार्थानं योग्य आहे असं दिसतं आहे. मग लोकशाहीत आपल्याला चांगले बदल करायचे असतील तर नुसती बडबड उपयोगाची नाही. त्यासाठी काम करावं लागेल. लोकांचं ऐकून घेण्याची कला आत्मसात करायला हवी. आज नाही पण उद्या लोकांना पटेल म्हणून थांबण्याची तयारी हवी. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ते पटावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी उपलब्ध कायद्यांचा उपयोग करायला हवा. तसे कायदे नसतील तर कायदे बनवायची प्रक्रिया करायला हवी. ते कायदे पाळले जातात की नाही हे सतत दक्ष राहून पहायला हवं. बोलत, ऐकत रहायला हवं. बदल करताना काहींना छोट्या गोष्टी, काहींना चणे तर काहींना फुटाणे आणि काहींना तत्वज्ञानाचं अधिष्ठान लागतं, ते ओळखायला हवं आणि ते द्यायला हवं. त्यातूनच मग लोकशाहीच्या चाैकटीत मोठा सामाजिक बदल करता येऊ शकतो हे आपल्याला ‘लिंकन’ मध्ये दिसतं.

अब्राहम लिंकन ह्या माणसाची फार ओळख नव्हती. ह्या चित्रपटामुळेही लिंकन ह्या व्यक्तिमत्वाचं संपूर्ण दर्शन होतंच असं नाही. हा चित्रपट इतिहासाच्या मापदंडावर किती खरा उतरतो हे देखील माहीत नाही. आपण हे एक कल्पनाचित्र आहे असं जरी मानलं तरी लोकशाहीच्या, लोकशाहीतील नेतृत्वाच्या आणि राजकारणाच्या एका अगदी वेगळ्या बाजूचं दर्शन ‘लिंकन‘ ह्या चित्रपटात होतं. ते दर्शन ज्यांनी आपल्याला करून दिलं त्या स्टीव्हन स्पीलबर्ग, लेखक द्वय टोनी कुशनर आणि डोरीस केर्न्स गुडवीन, अभिनेते डॅनियल डे-लुइस, सॅली फिल्ड, संगीतकार जॉन विल्यम्स आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचे आभार आपण मानले पाहिजेत.

महाराष्ट्राचाच विचार केला तर अगदी महत्वाच्या क्षणी हा चित्रपट आला आहे. बिकट प्रश्न आ वासून समोर आहेत. लोकशाहीची चाैकट आहे. त्या चाैकटीत आपण किती शहाणपणा दाखवतो ते महत्वाचं आहे. त्या शहाणपणाकडे जाणारा रस्ता हा चित्रपट आपल्याला दाखवू शकतो. ते शिकण्याची आपली तयारी फक्त हवी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा