पुण्यातली मैदानं आणि संस्कृती
लहानपणी काही दिवस आम्ही पुण्यात सदाशिव पेठेत रहायचो.
तेंव्हाचं “अनाथ विद्यार्थी गृह” किंवा सध्याचं ‘पुणे विद्यार्थी गृह”. त्या शाळेचे माझे वडील मुख्याध्यापक होते. माझे प्राथमिक शाळेत असतानाचे दिवस त्या परिसरात गेले. शाळा, मित्रमंडळी, नातेवाईक अश्या गोतावळ्यातले ते दिवस म्हणजे माझ्या मनातला एक अमूल्य ठेवा आहे. साधारण १९६४-६५ च्या काळातल्या शांत आणि सुंदर पुण्यातल्या माझ्या काही फार सुंदर आठवणी आहेत.
एक गोष्ट अगदी आवर्जून सांगायला हवी की त्यातल्या खूपश्या आठवणी वेगवेगळी मैदानं आणि क्रिडांगणांशी निगडीत आहेत. त्या आठवणी इतक्या आहेत की वाटावं आपलं सगळं बालपणच जणू काही ह्या मैदानांवर गेलंय.
मी रहायचो त्या अनाथ विद्यार्थी गृहातच दोन चांगली क्रिडांगणं होती. एक तिथल्या राममंदिराच्या समोरचं आणि एक विद्यार्थी वसतीगृहाजवळचं. टिळक रोडवरच्या महाराष्ट्र मंडळाच्या मैदानावर तर आम्ही रोजच संध्याकाळी खेळायला जायचो. थोडे मोठे झालो आणि ‘महाराष्ट्र मंडळ’ सुटलं. मग सुरू झालं खो खो साठी रोज संध्याकाळचं सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचं मैदान. अक्षरश: रोज म्हणजे रोज आम्ही खेळायचोच.. पाऊस असो, सण असो, सुट्टी असो की परीक्षा. मैदानावर खोखोचे एक दोन डाव खेळल्याशिवाय आमचा दिवसच गेला नाही.
घरामागे बाजीराव रस्त्यावर, सध्या जिथे टेलिफोन एक्सचेंज आहे तिथे एक मैदान होतं, त्याच्यासमोर मैदानासारखी मोकळी जागा होती, तिथेही मुलं खेळायची. पतंग उडवायची. सायकल शिकायची. थोडं पुढे गेलं की तेंव्हाच्या नगरपालिकेचं मैदान होतं. आता त्याला सणस क्रिडांगण म्हणतात बहुधा. तिथं आम्ही कित्येक वेळेला खेळायला गेलो आहोत. तिथे सुट्टीत सर्कस लागायची आणि परीक्षा संपल्या की शेकडो मुलं स्टंपा, बॅटी घेऊन यायची. अक्षरश: शेकडो मुलं. खेळायची, जिंकायची, हरायची. मारामारी व्हायची.. आम्ही जे काही घडलो असू ते ह्या मैदानांवर....
पर्वती तर एक फार मोठं मैदानच होतं पण तिकडे जातानाच थोडं पुढे तळ्यातला गणपती किंवा आत्ताची सारसबाग, आणि त्याच्या बरोबर समोर पेशवे पार्क. इकडे थोडं स्वारगेटच्या बाजूला निघालं की शिवाजी मराठा विद्यालयाचं मैदान होतं आणि तिथून पुढे आलं की होतं हिराबागेचं अत्यंत विस्तीर्ण असं मैदान. घराकडून पेरूगेट ला जाताना शिवाजी मंदिराचं ऐतिहासिक पण छोटंसं मैदान. जिथे रात्री आटापाट्या व्हायच्या तर कधी व्हायची मोठ-मोठ्यांची व्याख्यानं. मी रहायचो त्याच्याच बाजूला स्काऊट ग्राऊंड होतं आणि बाजीराव रस्त्यावरून मंडईकडे जायला निघालं की होतं सरस्वती मंदिरचं मैदान. भावे स्कूलचं मैदान, जिथं सन्मित्र संघ सराव करायचा ते रमणबागचं मैदान किंवा सध्याचं रेणुका स्वरूपचं मैदान.
माझं घर अश्या विविध मैदानांनी घेरलेलं होतं.
एखादं प्राथमिक शाळेचं मूल स्वत: पायी चालू शकेल अश्या परिघात सुमारे १५ छोटी-मोठी मैदानं होती. जिथं आमचा मुक्त संचार होता. दिवसाचा बराचसा वेळ आमचा ह्या मैदानांवरच जायचा, तिथेच आम्ही लहानाचे मोेठे झालो. आम्ही घडलोही मैदानावर आणि बिघडलोही मैदानांवरच. ह्या मैदानांवरच आम्ही आमची होती नव्हती ती मस्ती जिरवून घेतली.
हे सगळं आठवलं काल माझ्याकडे काही मुलं एक फुटबॉल घेऊन आली तेंव्हा. त्यांनी मला विचारलं “काका, आम्ही कुठे खेळू?”
मी सध्या कर्वेनगरला रहातो.
साधारण १९८० नंतर इथली वस्ती भराभरा वाढत गेली. तिथलीच ही बहुतेक मुलं. ह्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की कोथरूड-कर्वेनगर परिसरात ह्यांना खेळण्यासाठी आणि त्यातल्या त्यात फुटबॉल खेळण्यासाठी फारच थोडी मैदानं आहेत. जी आहेत ती खाजगी मालकीची किंवा त्या त्या सहकारी सहनिवासांनी ठेवलेली. ती त्या त्या संस्थांच्या मर्जीवर, परवानगीवर चालत असणारी. पण त्यात, फूटबॉल सारखा खेळ खेळता येईल आणि पुण्यातल्या कुठल्याही मुलांना तिथं जाउन खेळता येईल अशी सार्वजनिक मैदानं मात्र फारच थोडी आहेत.
सध्या पुण्यात चांगली मैदानं आहेत ती डेक्कन किंवा शिवाजीनगर परिसरात किंवा लष्कर विभागात. फर्गसन महाविद्यालय, विधी महाविद्यालय, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, पी वाय सी जिमखाना. तसंच पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं, कृषी विद्यापीठाचं विस्तीर्ण मैदान. अशी कित्येक. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की ह्या सर्वांचं नियोजन झालं मुख्यत: १९०० ते १९२०-३० च्या काळात, किंवा फार तर ४०-५० च्या दशकात.
१९६६ साली पुण्याची सध्याच्या संदर्भात पहिली “विकास योजना” बनवली गेली, १९८७ मध्ये दुसरी बनली आणि राबवली गेली आणि आता २०१२ मध्ये पुढची ‘विकास योजना’ समोर आली आहे. सभागृहाच्या आणि लोकांच्या मंजुरीसाठी वाट बघत आहे.
ह्या सर्व काळात - जेंव्हा ह्या ‘विकास योजना’ आखल्या गेल्या, बनवल्या गेल्या - तेंव्हा किती मैदानं निर्माण झाली? किती सार्वजनिक - खाजगी नव्हे - मैदानं मुलांसाठी सुरू झाली?
ह्या सर्व काळात जिथं पुणं वाढलं: कोथरूड, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, वारजे, सिंहगड रस्ता, आैंध, बाणेर ह्या सर्व भागात मोठी, खाजगी मालकी नसलेली, सार्वजनिक, सर्व पुणेकरांच्या मालकीची अशी मैदानं किती आखण्यात आली? जिथे मुलं पतंग उडवू शकतील, सायकल स्कूटर शिकतील. आई-बाबा आपल्या मुलांना घेऊन फिरायला येऊ शकतील. जेष्ठ मंडळी गप्पा मारतील, राजकीय पक्षांची भाषणं होतील, मेळावे होतील. मोठी, विस्तीर्ण, मोकळी, स्वच्छ आकाश दिसेल अशी मैदानं.
ह्या काळात मैदानं झाली, नाही असं नाही. पण झाली ती मुख्यत लग्न समारंभासाठी, गरबा-दांडिया किंवा न्यू ईयर पार्टीसाठी. ज्याला मैदान नाही तर अमुक-तमुक गार्डन म्हणतात. खूप पैसे मोजल्याशिवाय वापरता येणार नाहीत अशी. खाजगी. पैसेवाल्यांसाठी.
मग सामान्य माणसासाठी, मुलांसाठी अशी मैदानं का नाही निर्माण झाली? काय अडचण आली? जागा नव्हत्या की इच्छा नव्हती? की सुचलं नाही? की सरकारी नियम आड आले?
मोठी मैदानं मोठी माणसं घडवतात. नवी पिढी घडवतात. तरूण मुलांना ती मैदानं नवी आव्हानं स्विकारायला लावतात, शिकवतात. मोठी मैदानं मोठी मनं घडवतात. लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी संधी देतात.
पुणेकरांनी त्यांच्या मुलांसाठी मैदानं नाही ठेवली आणि म्हणून ही मुलं आज विचारतात: “काका, आम्ही कुठं खेळू?”
वाटतं आपण ह्या मुलांना साधी मैदानं नाही देऊ शकलो तर त्यांना चांगलं भविष्य कसं देणार?
सध्या मला बरीच मंडळी विचारत असतात की राजकारणात निवडणुका लढवण्याचं नाही पण दुसरं काहीतरी काम सांगा, काहीतरी काम द्या. त्यांना मी सुचवीन की एक गट किंवा संस्था किंवा एखादं प्रतिष्ठान स्थापन करा जे मुलांना पुण्यात त्यांच्या घराजवळ खेळण्यासाठी हक्काचं मैदान देईल. कुलुपं लावलेली मैदानं मोकळी करेल. मुलांना खेळण्यासाठी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करणार नाही. ... पुण्याच्या मुलांमध्ये खेळाची आणि त्यातून निकोप समाज जीवनाची संस्कृती विकसीत करेल.
अपेक्षा आहे की पुण्यात मैदानं निर्माण करण्याचं, ती टिकवण्याचं आणि राखण्याचं काम करणारी एखादी प्रभावी संस्था आता कामाला लागेल.... बघू या.
अनिल शिदोरे
namskar sir
उत्तर द्याहटवाpimpari chinchwad la hi sadhya sthiti hich ahe manse mhanun apan lakshya ghalatch ahot pan kahi maidana sathi aarkshit jagevar sociatya ahet ghare ahet tar tyavishayi kay karave lagel aarkshan halvta yete ka?
sir yababat margdarshan karave
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा