रविवार, मे १३, २०१२

चपाती नको, भाकरी हवी!

सुमारे ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, किंवा त्यापेक्षाही थोडी आधीची असावी. 


एका बैठकीत होतो. विषय काहीतरी पाण्याविषयी होता, नेमका काय होता, लक्षात नाही.... पुण्यात अलका टॉकीज चौकात भारती विद्यापीठाची सध्याची इमारत आहे तिथे कुठेतरी बैठक होती. बरीच नामवंत मंडळी होती, स्वयंसेवी क्षेत्रातली, पाणी प्रश्नावर काम करणारी. बरीच.


सकाळचे सत्र झाले आणि जेवणाची सुटटी झाली. आम्ही सर्वजण आपापल्या ताटल्या घेऊन रांगेत उभे होतो. रांग हळूहळू पुढे सरकत होती. पदार्थ ठेवलेल्या टेबलाजवळ माझी पाळी आली. तेंव्हा मला गव्हाची चपाती आवडते म्हणून ती मी उचलली तर मागून कुणीतरी ढोसलं आणि म्हटलं : "अनिल, महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर गव्हाची चपाती नको तर ज्वारीची भाकरी खा." मी चमकून पाहिलं तर ते होते विलासराव साळुंखे, पाणी-पंचायतचे. पाण्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास. त्यांनी महाराष्ट्राला पाण्याविषयी खूप गोष्टी शिकवल्या. ते पुणे जिल्ह्यात तेंव्हा कुठेतरी काम करायचे. 


ते म्हणाले, गहू पिकवायला ज्वारीपेक्षा खूप पाणी लागतं. कित्येक पटीनं. त्यामुळे आपण गव्हाची जास्त मागणी केली तर शेतकरी तो जास्त लावेल आणि गव्हाचं क्षेत्र वाढेल. गव्हाचं क्षेत्र वाढलं की पाण्याची मागणी वाढेल आणि पाण्याच्या ह्या वाढलेल्या मागणीला पुरं पडेल एव्हढं पाणी महाराष्ट्रात नाही, करायचं म्हटलं तर त्याला खर्च खूप येईल. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. 


विलासरावांचे शब्द फार महत्वाचे आणि दूरचा विचार करणारे होते. 


गहू तर सोडा, आता महाराष्ट्रात उसाच्या लागवडीचं प्रमाण अचाट झालं आहे आणि महाराष्ट्रात पाण्याचं संकट निर्माण होण्याची जी जी काही कारणं आहेत त्यात चुकीची पीक- लागवड हेही एक कारण आहे, कारण उसाला तर गव्हापेक्षाही प्रचंड पाणी लागतं. 


आपण नेहमी म्हणतो, सरकारनं हे करायला पाहिजे, राजकारण्यांनी तसं वागायला पाहिजे, वर्तमानपत्रांनी तसं छापायला पाहिजे. तसं आपण म्हणावंच पण ह्यात आपण काय करू शकतो ह्याचाही विचार करावा. स्व:त:पासून आपण सुरूवात करावी. 
मी विचार करायला लागलो आणि मला वाटलं "आपण गहू खाण्याचं कमी करून भाकरी खाणं सुरु करायला पाहिजे". तेव्हढीच महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यात माझा सहभाग. मी गव्हाची मागणी नुसती कमी करणे हे एक आर्थिक आणि धोरणात्मक विधान आहे. ते मी करायलाच पाहिजे. त्यामुळे पाण्याची गरज कमी होईल, पाण्याचं संकट कमी होईल, दुष्काळ हटेल, दु:खाचा काळ जाईल. 

त्यामुळे आजपासून मी गव्हापेक्षा ज्वारी जास्त खायला सुरुवात करणार आहे. 


: म्हणणार आहे: "चपाती नको, भाकरी हवी!".


रविवार १३ मे, २०१२  

२ टिप्पण्या:

  1. अनिलजी, तुमचे विचार महत्वाचे आहेत....असाच विचार केला तर शक्य होईल तेवढी कृत्रिम साखरही आपल्या जेवणातून बाद करायला हवी... म्हणजे साखरेची मागणी कमी होईल, पर्यायाने उसाची लागवड कमी होईल, उसाला लागणारे प्रचंड पाणी वाचेल... साखर कमी खाल्यानं तोटा काहीच नाही...कृत्रिम साखरेमुळे होणारे आरोग्याचे प्रश्नही कमी होतील,,, खूप मोठा बदल असाच छोटया गोष्टींपासून सुरु होतो....असे छोटे बदल करणारी चळवळच आपण सगळे हाती घेऊया...

    उत्तर द्याहटवा
  2. Vilasrao GR8 ! Salunke baraka,
    Maharashtratil Pani prashn sodawatana Vilasraona koni taluch shakat nahi. sarkar talate te sodun dya.
    Every body should go thru his UDAK chalawawe Yukti.
    Panyachya waparabarobar pik paddhati sathi samnyayi watap mahtwache ahe.

    उत्तर द्याहटवा