मी शाळेत प्रवेश घेतला ..
एक प्रश्न आपल्याला सतावतो आहे.
शिक्षणातले तज्ञ म्हणतात मातृभाषेतून शिक्षण हवं. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की मूल सर्वात चांगलं शिकतं ते त्याच्या आईच्या भाषेत किंवा जी भाषा ते मूल आईच्या पोटात असल्यापासून ऐकतं त्या भाषेत.
अजून तरी महाराष्ट्रातल्या मुलांची आई इंग्रजीतून किंवा हिंदीमधून बोलत नाही. ती फार तर मराठीच्या ऐवजी अहिराणी मधून किंवा कोरकूमधून बोलेल पण इंग्रजीत नाही बोलणार.
मग असं असतानाही महाराष्ट्रात इंग्रजीच्या शाळा का वाढताहेत? आपला सर्वांचा ओढा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा का?
शिकणं म्हणजे जगाचं ज्ञान घेणं. कल्पना-संकल्पना समजून घेणं. अंक समजणं, जी एक संकल्पनाच आहे, ते अंक समजणं. भाषा समजणं, त्या भाषेचा वापर करता येणं. जगाचा शोध घेणं. त्यातून चांगला माणूस होणं.
शिक्षणात, आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणात, म्हणूनच आपल्या आईच्या भाषेतून शिकणं किंवा परिसराच्या भाषेतून शिकणं महत्वाचं. त्यातून त्या लहान मुलाच्या संकल्पना स्पष्ट होतात, ते मूल जिज्ञासू होतं, शहाणं आणि समंजस होतं.
मग असं असतानाही इंग्रजीच्या शाळा का वाढताहेत? सर्वत्र इंग्रजीचा अट्टाहास का बळावतोय?
आपली मुलं मराठी किंवा आपल्या आईच्या भाषेतून शिकलीच नाहीत तर त्यांच्या संकल्पना विकसित होणार नाहीत. ती उत्सुक, जिज्ञासू किंवा शहाणी होणार नाहीत. मग अशी नीट न शिकलेली माणसं घेऊन आपण चांगला समाज कसा घडवू शकतो?
मग आपण इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना का घालतो? इंग्रजीचा अट्टाहास का धरतो?
ह्या प्रश्नाला आपली काही नेहमीची उत्तरं आहेत. ती उत्तरं अशी.
इंग्रजी शिकलं की आपण पुढे जातो.
इंग्रजी शिकलं की आपल्याला नोकरी मिळते. आपली प्रगती होते.
बाकी नाही का इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना घालत, म्हणून आम्हीही घालतो.
इंग्रजी शाळा चांगल्या असतात. तिथं गेलं की आपली मुलं टिपटाॅप रहातात, स्मार्ट बनतात. आता स्मार्ट नाही तर काही नाही.
इंग्रजी नाही बोललं तर लोक मागासलेला म्हणतात.
सध्याचं जग इंग्रजीचं आहे. आपल्याला मागे पडून चालणार नाही, पुढे जाण्यासाठी इंग्रजी हवंच.
बाकीच्या देशात काय आहे? जपानी मुलगा प्राथमिक शिक्षण जपानीत घेतो की इंग्रजीत? जर्मन मुलगी काय करते? रशियन? फिनीश? बहुतांश देशात मातृभाषेतून शिक्षण आहे. मग ते मागे पडतात का?
अजून एक म्हटलं जातं.
आपल्या देशात ज्या समाजांनी इंग्रजीची कास धरली ते पुढे गेले. मग बाकीच्या समाज घटकांनी तसंच केलं तर चुकलं कुठं? त्यांच्यात जी विषमता राहिली आहे ती कशी कमी होणार?
आणि, समजा शिकलीच आपली मुलं इंग्रजीत तर काय बिघडणार आहे? इंग्रजीतून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होणार नाहीत का?
अशी अनेक मतंमतांतरं आहेत. जे असेल ते असो, सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याचं प्रमाण वाढतंय, त्यांचं करायचं काय? ते थांबवायचं तर कसं आणि कशासाठी? हे चक्र एकदम कसं फिरवायचं? तसं फिरवण्याची गरज आहे का? हा समाजाचा इतका महत्वाचा प्रश्न तरी आहे का?
एक खरं आहे की माझी भाषा ही माझी ओळख आहे. माझी भाषा हे माझं अस्तित्व आहे. माझी भाषा गेली की माझी ओळख जाईल. मी टिकेन पण एक जागतिक माणूस म्हणून. त्यात मी कोण आहे ह्याला महत्व रहाणार नाही. मी आहे एव्हढंच महत्वाचं रहाणार आहे. मी एक ग्राहक म्हणून, एक पेशंट म्हणून किंवा एक विक्रेता म्हणून शिल्लक राहीन पण एक मराठी म्हणून शिल्लक रहाणार नाही. पण, एक मराठी माणूस म्हणून शिल्लक रहाण्याची काय गरज आहे? समाजाच्या ओघात नाही का कित्येक गोष्टी संपल्या. टांगा गेला, रिक्षा आली. नाणी गेली, नोटा राहिल्या. विटी-दांडू गेला, कंप्युटर गेम्स आले. वाडे कोसळले, अपार्टमेंट्स झाली. काय बिघडलं? काळाच्या ओघात खूप गोष्टी गेल्या.
ह्याच चालीवर, भाषा गेली तर काय बिघडलं? असं म्हणता येईल.
नुसतं शाळेचं माध्यम बदललं तर आपण भाषा संपेपर्यंत जाऊन पोचलो.
भाषा म्हणजे जशी आपली ओळख तशी भाषा म्हणजे संस्कृती. माझी संस्कृती म्हणजे माझं वेगळेपण. माझं वेगळेपण हीच माझी ओळख.
आणि, टांगा गेला तसं किंवा विटी-दांडू गेला तशी भाषा जाणं योग्य नाही. कारण, भाषा म्हणजे काही वस्तू नाही की कुठला माल नाही.
पण सर्वत्र शिक्षणात तर इंग्रजी, इंग्रजी चाललंय मग करायचं काय?
एकदम काहीतरी फारच क्रांतीकारक, न पचणारं, न पटणारं एकदम सुचवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला बदल करायचा तर टप्प्याटप्प्यानं करायला हवा.
आपण चांगल्या मराठी माध्यमाच्या पण त्यात उत्तम इंग्रजी शिकता येईल अशा शाळा काढू. जिथं भाषा म्हणून इंग्रजी शिकवली जाईल, फक्त ‘पावनखिंड’ शिकायची तर ती इंग्रजीत नको. ती आईच्या भाषेत शिकू.
जिथं अहिराणी, कोरकू, मालवणी अशा भाषा आहेत तिथंही प्राथमिक शिक्षणात त्या भाषांचाही वापर करून मुलांच्या साध्या संकल्पना तरी पक्क्या करुन घेऊ.
मराठी शाळा, जिथं फार चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि जिथं इंग्रजीही फार उत्तम शिकवलं जातं अशा शाळांना, विशेष महत्व तर देऊच पण एक वेगळी प्रतिष्ठाही देऊ. त्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय वातावरणात स्पर्धेत टिकून अव्वल होऊ शकू असं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू.
महाराष्ट्रावर प्रेम असलेल्या, मराठी भाषा टिकावी, वाढावी असं वाटतं अशा, मराठीवर प्रेम असलेल्या आपण प्रत्येकानं अशी शाळा निघावी, चालावी, त्यात अधिकाधिक मुलांनी यावं, शिकावं, मोठं व्हावं, मोठा विचार करावा म्हणून प्रयत्न करावेत. तिथं आपल्या मुलांना घालावं.
अशा एका तरी शाळेला जोडून घ्यावं.
मराठीतून दर्जेदार शिक्षण देणारी शाळा टिकली तर मराठी टिकेल.
मराठी टिकली तर मी टिकेन.
मी टिकलो तर माझी माणसं टिकतील.
माझी माणसं टिकली तर ती मोठी होतील.
ती मोठी झाली तर मी मोठा होईन.
मी अशी एक शाळा निवडली आहे. तिथं मी आत्ताच प्रवेश घेतला आहे.
अनिल शिदोरे
२२ फेब्रुवारी २०१४
Khare ahe...apalya bhashela mahatva dilya mulech aaj anek desh swabhimanane tikun ahet ani agresar ahet..."Apali Marathi Maya Marathi"
उत्तर द्याहटवानमस्कार सर,
उत्तर द्याहटवाहा खुप महत्वाचा आणि भविष्यकाळावर परिणाम करणारा विषय आहे...हेही हवं तेही हवं च्या जमान्यात एक ना धड भारवर चिंध्या आशी आजच्या शिक्षणाची अवस्था झालीय....खर्या अर्थाने या विषयावर पालकांच्या मोफत कार्यशाळा आयोजित करून तत्ज्ञ लोकांकडून योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे....
अगदी खर आहे आणि त्यावर तुम्ही सांगितलेला उपाय पण चांगला आहे नक्किच…। पण ही कल्पना प्रत्यक्षात राबविणे किती शक्य आहे ? आज किती मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्कृष्ट दर्जाचं इंग्रजी शिकवलं जातं ?
उत्तर द्याहटवामला असं नक्कीच नाही वाटत की या यासाठी मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावं पण मराठी माध्यमाचा शाळांमध्ये देण्यात येणारं इंग्रजीचे शिक्षण नक्कीच उत्तम दर्जाचे असले पाहिजे. एवढे की त्या मुलांना हि तेवढा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे.
मी स्वतः मराठी माध्यमातून शिकली आहे पण मी जेव्हा अकरावीला प्रवेश घेतला होता तेव्हा भाषेची दरी खूप जाणवली होती. मी पण या अनुभवातून गेले होते.
नरेंद्र दाभोलकरांचे एक वाक्य मला इथे आठवले जे माझ्या वाचनात आले होत - कुठल्याही बदलाचे सहा टप्पे असतात. "विचार, उच्चार ,प्रसार, संघटन, आचार आणि संघर्ष " या सहा टप्प्यातून गेल्याशिवाय समाजात कोणताही बदल घडू शकत नाही.
तुम्ही सांगितलेला उपाय खूप छान आहे आणि त्याची सुरवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे