बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०

५ ट्रिलियन इकाॅनाॅमी म्हणजे काय रे भाऊ?

“५ ट्रिलियन इकाॅनाॅमी म्हणजे काय रे भाऊ?”

निर्मला सिथारामन असोत, मोदी असोत की अमित शहा, आर्थिक विषयावर चर्चा सुरू झाली की “५ ट्रिलियन” असं ऐकायला येतं. “देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची करणं” हे आमचं ध्येय आहे असं सरकारातले लोक म्हणतात. हे “५ ट्रिलियन” म्हणजे काय प्रकरण आहे?

आपल्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न २०२४-२५ ह्या आर्थिक वर्षात ५ ट्रिलियन डाॅलर्सचं करणं हा सरकारचा उद्देश आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्या वर्षात देशातल्या वस्तू आणि सेवांच्या  उत्पादनांची एकूण किंमत.

ध्येय म्हणून हे खूप चांगलं आहे. अशक्य नाही. रूपयात बोलायचं तर ह्यासाठी आपलं सकल राष्ट्रीय उत्पन्न ३५५,०००,०००,०००,००० रूपयांचं व्हायला हवं. असो. ह्यातनं काहीच समजत नाही. आपण जरा आजच्या परिस्थितीशी तुलना करू म्हणजे अधिक समजेल.

आज आपला जीडीपी आहे २.७५ ट्रिलियन डाॅलर्स. आपला सध्याचा आर्थिक वृध्दीचा दर आहे ४.५%. तितकीच वाढ अपेक्षित धरली तर २०२४-२५ ह्या वर्षात नाही पण नंतर ८ वर्षात म्हणजे २०३२-३३ ह्या वर्षात आपण ते ध्येय पार करू शकू. मात्र आपल्याला ते २०२४-२५ ह्याच वर्षात पूर्ण करायचं असेल तर आर्थिक वृध्दीचा दर ४.५% चालणार नाही तर तो असायला हवा १०.५% आणि तो ही सतत पुढची चार वर्ष. असं देशाच्या इतिहासात फक्त दोनदा घडलंय. ते ही एक-एक वर्ष. एकदा १९८८-८९ मध्ये आणि दुसरं २००७-०८ मध्ये. तसं पाहिलं तर देशाच्या इतिहासातील आर्थिक बाबतीतला सर्वोत्तम काळ होता २००३ ते २००९. ह्या काळातही देशाची आर्थिक प्रगती फक्त ९% नी झाली. आत्ताचं ध्येय आहे १०.५% नी प्रगती करण्याचं.

म्हणजे मोदी सरकारनं इतिहासात कधीही झाली नाही त्या गतीनं प्रगती करायचं ध्येय पुढील चार वर्षांसाठी ठेवलं आहे. ते शक्य होईल उत्तम आर्थिक नियोजनानी, जागतिक आर्थिक परिस्थितीवर आणि देशभर शांत, उद्योगशील वातारवण असेल तरच.

आजची परिस्थिती तशी नाही. मोदींनी सर्व देशाला एका मोठय़ा आर्थिक प्रगतीच्या ध्येयात बांधलेलं नाही. ते त्यांनी केलं तर मात्र इतिहास होऊ शकतो. पण कदाचित त्यांना आर्थिक प्रगतीचा इतिहास घडवायचा नसावा. दुसरंच काहीतरी त्यांच्या मनात असावं.

अनिल शिदोरे  

( ह्यासाठी कौशिक बसू ह्यांच्या इंडियन एक्सप्रेसमधील लेखाचा आधार घेतला आहे)

सोमवार, फेब्रुवारी १७, २०२०

वाचा आणि गप्प बसा : तुमचा फोन का लागत नाही?

#वाचाआणिगप्पबसा क्रमांक - २

तुमचा फोन का लागत नाही?

हल्ली असं होतं का की तुम्हाला फोन लागत नाही? मध्येच बंद होतो? किंवा जिथून पूर्वी खूप चांगलं नेटवर्क मिळायचं तिथे मिळत नाही. तुमचा फोन दाखवतो “फोर जी” पण प्रत्यक्षात डेटा मिळतो अतिशय कमी आणि तरीही तुमचं बील कमी न होता वाढतच चाललंय?  

ह्याला कारण देशातलं दूरसंचार क्षेत्रं सध्या फार अडचणीत सापडलं आहे. 

ह्या कंपन्यांनी सरकारला किती पैसे भरायचे ह्यावरून गेली काही वर्ष वाद चालू आहे. सरकारचं म्हणणं आहे की ह्या कंपन्यांनी (व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल) सरकारला सुमारे ९२,००० कोटी रूपये देणं आहे. काही अंदाजानुसार हा आकडा ह्यापेक्षा मोठा आहे. बरीच वर्ष ह्यावर कोर्ट-कचेरी चालू होती. अखेर मागच्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं ह्या कंपन्यांना ताबडतोब ही रक्कम भरायला सांगितली आहे. एअरटेल कदाचित भरू शकेल पण व्होडाफोन-आयडिया भरू शकेल की नाही ह्याची शक्यता नाही. ही कंपनी कदाचित बंद पडेल. 

हा सगळा प्रकार होत असताना आणि सर्वोच्च न्यायालयातही सरकारनं ही परिस्थिती सुधारावी म्हणून काही केलं नाही. २०११ मध्ये मनमोहनसिंग सरकार असल्यापासूनचा हा मामला आहे. त्यांनीही पुढे येऊन काही केलं नाही नंतर ५ वर्ष मोदी सरकारनंही प्रश्न सोडवण्याबाबतीत काही केल्याचं दिसत नाही. 

ह्यात सरकारचं म्हणणं काय, ह्या कंपन्यांचं म्हणणं काय ह्याबाबतीत जिज्ञासूंनी जरूर शोध घ्यावा. सरकारांचं बेजबाबदार वागणं समजेल तुम्हाला..फार विचित्र वाद आहे हा. 

ते काहीही असो पण ह्या सगळ्याचा आपल्याशी संबंध काय हे महत्वाचं आहे.

१) एक कंपनी बंद पडली आणि सरकारी कंपन्यांचं अगोदरच दिवाळं झालेलं असताना ह्या क्षेत्रात दोनच कंपन्या रहातील.
२) स्पर्धा कमी झाली की ग्राहकाला पर्याय कमी उरेल. सहाजिकच ह्या कंपन्या मोबाईल सेवा महाग करतील. आपल्याला भुर्दंड बसेल.
३) बेरोजगारी वाढेल.
४) हे क्षेत्रं असं आहे की ह्यावर बाकी क्षेत्रं अवलंबून आहेत. त्यांच्यावरही परिणाम होईल.
५) सरकारनं उद्योगांना बुडवलं तर जगात आपली प्रतिमा खराब होईल. उद्योग-स्नेही आपण नाही असं जगाला वाटेल. 
आणि,
६) सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यातलं नुकसान भरून काढण्यासाठी शेवटी आपल्या खिशात हात घातला जाईल.

एक मोठं क्षेत्रं संकटात आहे. जी मोबाईल सेवा प्रत्येकाला लागले ते क्षेत्रं संकटात आहे आणि सरकार ह्यासाठी पुढे येऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.

शेवटी नुकसान होणार आहे ते आपलं. पण आपण ग्राहक म्हणून, नागरिक म्हणून ना सरकारला किंवा ना दूरसंचार कंपन्यांना आपण जाब विचारू शकत. म्हणून म्हणतो की “वाचा आणि गप्प बसा”…


अनिल शिदोरे

रविवार, फेब्रुवारी १६, २०२०

वाचा आणि गप्प बसा : गॅसच्या किंमती एका दिवसात का वाढल्या?

#वाचाआणिगप्पबसा क्रमांक : १

एका दिवसात गॅस सिलींडरची किंमत १४५ रूपयांनी का वाढली?

मागच्या आठवड्यात एका अभिनेत्रीनं किती बोल्ड सीन्स दिले, छत्तिसगडला कसा तीन तोंडांचा साप सापडला अशा गोष्टीत आपण व्यस्त असल्यानं आपल्याला गॅस सिलींडरचे भाव अचानक वाढल्याचं लक्षातच आलं नाही. 

१२ फेब्रुवारीला एका दिवसात, ज्यांना सबसिडी नसते अशा, गॅसची किंमत मुंबईत १४५ रूपयांनी वाढली. मुंबईत अशासाठी म्हणालो की स्थानिक करानुसार किमती बदलतात. पण एका दिवसात ६८४ रूपये ५० पैशाला मिळणारा गॅस ८२९ रूपये ५० पैसे झाला. एका दिवसात !

पूर्वी २-४ रूपयांनी महागाई झाली तरी आंदोलनं व्हायची. लोक पेटून उठायचे. सरकारकडे दाद मागायचे. पण सध्या तसं होत नाही. कुणी हूं की चूं करत नाही.

एका गॅस सिलींडरचे भाव एका दिवसात इतके वाढण्याचं कारण काय? 

आपण पण जरा खोलात शिरून ह्याचं कारण पाहू. 

गॅस सिलींडरच्या किंमती दोन गोष्टींवर ठरतात. एक म्हणजे आधारभूत आयात किंमत (Import Parity Price) आणि डॉलरमागे रूपयाची किंमत. सौदी अरेबियाची अरामको ह्या कंपनीची किंमत ही आधार म्हणून धरतात. ह्या अरामकोनी प्रोपेन (गॅस निर्मितीसाठी लागणारी महत्वाची गोष्ट) ची किंमत एका दिवसात ४४० डाॅलर्सवरून ५६५ डाॅलर्स केली. 

झालं, सगळं गणित बिघडलं. गॅस सिलींडरची किंमत वाढली. ज्यांनी सबसिडी नाकारली आहे त्यांना ती आपल्या खिशातून भरावी लागणार. ज्यांना सबसिडी आहे त्यांची वाढती किंमत सरकार भरणार म्हणजे नागरिकांच्याच खिशातून.    

आता ह्याला खूप सारी कारणं दिली जातील. काय करणार आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे चालावं लागणार. असंही म्हणतील की “थांबा जरा, किंमती चढल्या तशा उतरतील”. असंही म्हणतील “काय फुकट हवं आहे का सगळं मग?” 

काहीही झालं तरी सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. घरचं खर्चाचं अंकगणित बिघडणार आहे. बिघडत जाणार आहे.. पण आपल्याला ह्या विषयावर आंदोलन करण्याची इच्छा होत नाही. सरकारकडे गेलं तर सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवणार. तेल कंपन्यांच्या विरूध्द आंदोलन करून काय उपयोग असं आपल्याला वाटणार. 

आपल्याला सध्या रागच येत नाही. आपल्याला मूळ समस्यांकडे पहायचंच नाही. आपल्याला त्या समजून घ्यायच्या नाहीत. त्यामुळे इतकंच म्हणावं वाटतं “वाचा आणि गप्प बसा”.

सहज जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या सौदी अरेबियाचे भारतातले दोस्त कोण कोण आहेत ह्याचा शोध घ्या. अर्थात सहज वेळ असेल, इच्छा असेल आणि मुख्य जिज्ञासा असेल तरच. 

शुभेच्छा,


अनिल शिदोरे

सोमवार, डिसेंबर १६, २०१९

समुद्रातील शिवस्मारक : कॅगनं नोंदवलेले आक्षेप

छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातील भव्य पुतळा : प्रकल्पावर कॅगनं नोंदवलेले आक्षेप

समुद्रातील शिवस्मारकाबाबत महाराष्ट्रात खूप चर्चा झाली. राज्यसरकारनं त्यासाठी पंतप्रधानांना बोलावून तीन वर्षांपूर्वी जलपूजनही केलं. पैसेही मंजूर झाले. कामाचा ठेकाही दिला. कोट्यवधी रूपये खर्चून प्रकल्पासाठी सल्लागार संस्थाही नेमली. परंतु तीन वर्षांनंतरही दिसत काहीच नाही. आता तर कॅगनं त्यातील आर्थिक गैरप्रकाराबाबत बरेच आक्षेप नोंदवले आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला उत्तरं दिली पाहिजेत.  

  • नरेंद्र मोदींनी समुद्रातील शिवस्मारकासाठी जलपूजन केलं. आपल्या सर्वांच्या ते स्मरणात आहे. त्या घटनेला आता पुढच्या आठवड्यात तीन वर्ष होतील. त्यावेळेस घोषणा करताना हे काम पुढील तीन वर्षात होईल असंही म्हटल्याचं आपण कोणीच विसरलेलो नाही. 
  • तीन वर्ष झाली पुतळ्याचा पत्ता तर नाहीच पण साधी वीटही रचल्याचं दिसत नाही. आता तर कॅगनं अहवाल देऊन फडणवीस सरकारचा गैरकारभारच वेशीवर टांगला आहे. 
  • एप्रिल आणि मे २०१९ ला कॅगनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबीसमुद्रातील पुतळ्याच्या प्रकल्पाचं लेखापरीक्षण (ऑडिट) केलं. त्यांचा अहवाल त्यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला ऑक्टोबर २०१९ ह्या महिन्यात सादर केला. 
  • ह्या प्रकल्पासाठी जी निविदा प्रक्रिया झाली त्यात सर्वात कमी किंमतीचा प्रस्ताव लार्सन आणि टुब्रो (L&T) कंपनीचा होता, तो होता ३,८२६ कोटींचा. हा जरी सर्वात कमी किंमतीचा प्रस्ताव होता तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मूळ अंदाजापेक्षा तो खूपच अधिक होता. त्यांचा अंदाज होता, २६९२ कोटी रूपयांचा. 
  • नंतर मग प्रकल्पाची किंमत कमी करण्यात आली. ती करताना पुन्हा निविदा द्यायला पाहिजे होती ती दिली नाही आणि त्या सगळ्या व्यवहारात आदर्श कार्यपध्दती तर ठेवली नाहीच परंतु मूळ निविदा प्रक्रियेतच गडबड केली. ज्यांनी ज्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता त्यांच्या दृष्टीनं हे योग्य नव्हतं अशा प्रकारचे शेरे कॅगनी मारले आहेत
  • ह्या कामासाठी महाराष्ट्र सरकारनं एजिस इंडिया कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि डिझाईन असोसिएट्स ह्यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. त्यांचा काहीही कारण नसताना ९ कोटी ६१ लाख रूपयांचा फायदा झाला. असंही कॅगनं त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेचे हे पैसे वाचू शकले असते.
  • खरंतर मार्च २०१६ लाच चाळीस महिन्यांसाठी ९४ कोटी ७० लाख रूपयांचं कंत्राट ह्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना मिळालं होतं. जे ऑगस्ट २०१९ लाच संपायला हवं होतं. परंतु विविध कारणं देऊन फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्येच त्यांच्या कामाचा आवाका कमी (descoping) करण्यात आला होता. म्हणून त्यांचं शुल्क (fees) ८२ कोटी ४६ लाखावरून ७२ कोटी ८५ लाख करावं असं सार्वजनिक बांधकाम खात्यानं सुचवलं होतं परंतु तरीही राज्य सरकारनं ते शुल्क ८२ कोटी ४६ लाखच ठेवलं. का बरं? अशी ह्या सल्लागार संस्थांची विशेष काळजी का घेण्यात आली?  
  • कॅगच्या अहवालात असंही एक निरीक्षण आहे की ह्या सगळ्या प्रकारात आत्ता जरी पुतळा उभारणीचं काम स्वस्तात दिसत असलं तरी नंतर त्याचा भुर्दंड राज्य सरकारच्या तिजोरीवरच पडणार आहे. कारण प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी जरी काही कामं कमी करण्यात आली असली तरी नंतर ती करावीच लागणार आहेत, जसं की प्रत्यक्ष प्रकल्प चालवणे आणि देखरेख (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) ही कामं करावी तर लागणारच आहेत. मग त्यासाठी पुन्हा खर्च. ह्या सर्व प्रकाराचा अंतिम फायदा ठेकेदारांना म्हणजेच L&T लाच होणार आहे.
  • प्रकल्पाचा टप्पा दुसरा हा पहिल्या टप्प्याच्याच दरानं व्हावा हाच मुद्दा किंमत कमी करताना काढून टाकला असल्यानंही नंतर प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे असं कॅगनं निरीक्षण त्यांच्या अहवालात मांडलं आहे. 
  • ह्यात आणखी एक गंमत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांबरोबर करार करताना काम वेळेवर केलं तर बक्षिसाची तरतूद ठेवली पण काम उशीरा झालं तर काय दंड आकारायचा हे नाही स्पष्ट केलं. कॅगच्या अहवालात ह्याचीही झाडाझडती त्यांनी घेतली आहे. 
  • थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील पुतळ्याबाबत गवगवा खूप झाला, त्या प्रसंगी मोदींनी महाराष्ट्रात येऊन पल्लेदार भाषणही दिलं, फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं महाराष्ट्राला मोठमोठी स्वप्नंही दाखवली पण प्रत्यक्षात काय झालं हा एक मोठाच प्रश्न आहे. 


कॅगनं केलेल्या टिप्पणीवर, काढलेल्या चुकांवर माजी मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार ह्यावर सभागृहात प्रश्न विचारतीलच पण सरकारनंच पुढे येऊन महाराष्ट्राच्या मनात असलेल्या शंकांबद्दल स्पष्टीकरण द्यावं. 


(ह्या लेखासाठी १४ आणि १६ डिसेंबर २०१९ च्या इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तांचा (धन्यवाद, विश्वास वाघमोडे) आधार घेतला आहे)

रविवार, ऑक्टोबर २७, २०१९

२०१९ विधानसभा निवडणुकांनंतर ...

महाराष्ट्राच्या राजकारणाचं व्याकरण बदलवणारी निवडणूक


महाराष्ट्र विधानसभेची २०१९ ची निवडणूक हा राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण आहे. सुरूवातीचे निकाल पाहिले की महाराष्ट्राचा विवेक ऐन क्षणी जागा झाला असंच म्हणावं लागेल.

फक्त सहा महिन्यांपूर्वीच प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात पुन्हा एकदा गादीवर विराजमान झालं. भारतीय जनता पक्षाच्या मनात एक उन्मादी आकांक्षा निर्माण झाली. न्यायसंस्थांपासून रिझर्व्ह बॅंकेपर्यंत आणि सीबीआय पासून निवडणूक आयोगापर्यंत इतरही सर्व संस्थांवर केंद्रातलं भारतीय संघराज्याचं सरकार आपलं नियंत्रण अधिकच घट्ट करू लागलं. ३७० कलम रद्द केल्यामुळे आपण एक ऐतिहासिक काम केलं आहे आता आपल्याला कोण अडवणार असा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या देशपातळीवरील नेतृत्वात यायला लागला. त्यातूनच देशाची अर्थव्यवस्था दोलायमान होऊ लागली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आणि लोकांना बोचणारे मुद्दे न घेता आपलं राजकारण लादण्याच्या मन:स्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आला.

नेमक्या अशा वेळीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली. महाराष्ट्र एका टोकाला जातो की काय ह्याची भिती वाटू लागली असतानाच. मात्र अशा अगदी ऐन मोक्याच्या वेळी महाराष्ट्राचं मूळचं विवेकी मन जागृत झालेलं दिसत आहे आणि महाराष्ट्राचा गुजरात होणार नाही असा इशाराही ह्या निकालानं दिलेला आहे.

हा लेख लिहितो आहे तेंव्हा पूर्ण निकाल अजून हाती आलेले नाहीत परंतु भारतीय जनता पक्षाच्या १५-२० जागा कमी होऊन त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी यश मिळणार हे नक्की आहे. स्पष्टपणे हा भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या नेतृत्वाचा म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा पराभव आहे असंच मानावं लागेल. मोदी ह्या नावाचा करिष्मा, प्रभाव महाराष्ट्रात कमी होत आहे हे ह्यातून स्पष्ट होत आहे.

निवडणुकीच्या आधी परिस्थिती बघा कशी होती.. विरोधक नुसते एकत्र नाहीत असं नाही तर पूर्णपणे विखुरलेले आहेत. राजकीय चैतन्याच्या फारशा खुणा त्यांच्यात दिसत नाहीत. विरोधकांचे सुमारे २५ आमदार सत्ताधारी पक्षानी फोडलेले आहेत. अनेकांना पक्षात घेतलं आहे. ईडी, सीबीआयची भिती घालून विरोधकांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न चालू आहे. सत्ताधारी पक्षाकडे अतोनात पैसा आहे. त्याचा वापर प्रच्छन्नपणे होतो आहे. वृत्तपत्रं आणि माध्यमांना एकतर विकत घेतलं आहे किंवा धमकावलं जात आहे. त्यांच्याकडून विरोधकांच्या फायद्याच्या कुठल्याही बातम्या येऊ दिल्या जात नाहीत. आरक्षणाचं राजकारण केलं गेलं. वंचितसारख्या उमेदवारांनी विरोधकांच्या, म्हणजे काॅन्ग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, पारंपारिक मतांवर फूट पाडलेली दिसत आहे. मतदानाच्या आदल्याच दिवशी भारतीय सैन्यानं पाकिस्तानी तळांवर हल्ले करून काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या बातम्या प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आहेत. सरकारी कर्मचारी वर्गाला वेतनवाढीचं गाजरही दिलेलं आहे. आणि इतकं सारं करूनही भारतीय जनता पक्षाला, त्यांनी शिवसेनेबरोबर युती करूनही, सुमारे १५ ते २० जागा कमी मिळतील अशी चिन्हं आहेत.

मग ह्या आजच्या विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ काय आणि ह्या निकालामुळे महाराष्ट्राचं पुढचं राजकारण काय असेल?

पुन्हा एकदा सत्तेवर आले तरी भारतीय जनता पक्षाचा तेजोभंग झाला. त्यांची झळाळी गेली. शिवसेनेबरोबरच्या त्यांच्या संबंधांमध्ये आता फरक दिसेल. शिवसेना अधिक आक्रमक व्हावी अशी अपेक्षा आहे. शिवसेना जर जागी असेल तर मोदी-शहा ह्या जोडीचा महाराष्ट्राची अवहेलना करण्याचा जो उद्योग चालू आहे त्याला खिळ बसेल. अर्थात शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विषयात जागृत असेल तर. ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावरची मोदी-शहा ह्यांची पकड सैल झाल्याची त्या दोघांना जाणीव होईल आणि ते ती पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा घेऊन जाती-जातींमध्ये विद्वेष पसरवला गेला तर राजकीय धृवीकरण होईलच ह्याची खात्री रहाणार नाही. महाराष्ट्र इतका उघडपणे विद्वेषाचं राजकारण आपलसं करणार नाही हे जगाच्या लक्षात येईल. काॅन्ग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून भाजपा-सेनेत पक्षांतर केलेले सगळेच सरळ जिंकताहेत असं दिसत नाहीय ह्याचा अर्थ मतदारांना गृहीत धरता येणार नाही हा संदेश राजकारण्यांच्या मनात पक्का होईल.  ह्यातूनच ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं व्याकरण जन्माला येईल. साखर कारखाने, सहकार अशा पारंपारिक गोष्टींच्या पलीकडच्या मुद्दयांची घुसळण होण्याची शक्यता ह्यातून निर्माण होते आहे. अर्थात ते विरोधी पक्षाच्या क्षमतेवर आणि त्यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणसांबाबतच्या बांधिलकीवर अवलंबून आहे. ते ह्यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा काय ठेवतात ह्यावर बरंच अवलंबून आहे.

हा निकाल हा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर तर बसवतो आहे पण सत्तेवर बसवता बसवता एक स्पष्ट इशारा देतो आहे. केवळ दिल्लीहून इथे राजकारण करता येणार नाही, लोकांचे मूलभूत प्रश्न न सोडवता निव्वळ राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती अशानं जनता गप्प बसणार नाही. त्यांना त्यांचे जगण्याचे, प्रगतीचे प्रश्नही महत्वाचे आहेत हे समजून घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला राजकारण करावं लागेल. पण त्यांना ही एक संधी आहे. म्हणजे सत्ता पण मिळाली आणि लोकांच्या मनातलंही समजलं असं आहे. ह्यावर चाणाक्ष, धूर्त असं त्यांचं नेतृत्व मार्ग काढेल आणि त्यांनी तो काढला तरी लोकांचे प्रश्न रेटत ठेवून आपला राजकीय अवकाश वाढवत नेण्याचं काम विरोधी पक्षांना करावं लागेल.

सोळाव्या शतकाच्या अखेरी अखेरीस झोपलेल्या समाजानं जागं व्हावं म्हणून संत एकनाथांनी “बया दार उघड” म्हणून साद घातली होती. त्यानंतर काही दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्रानी आपल्या प्रवासाची दिशा बदलली. समाजाला स्वत:चं भान आलं. स्वराज्याची स्थापना झाली. अंधारमय देशात चैतन्याचा दिवा पेटला. महाराष्ट्राच्या इतिहासातील दैदिप्यमान पर्वाची सुरूवात झाली. त्यानं महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली, देशाचं नेतृत्व केलं.

आज तोच महाराष्ट्राच्या जीवनातला “बया दार उघड” क्षण आहे. एका टोकाला, जातीपातीच्या दलदलीत जाऊन परावलंबी आणि दिल्लीसमोर गुढघे टेकण्याच्या रस्त्याला महाराष्ट्र लागतो की काय असं वाटत होतं, पण तसं व्हायला ह्या निवडणुकीच्या निवडणुकीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. ही फक्त सुरूवात आहे. महाराष्ट्राला अजून पुरतं जागं व्हायचं आहे. पण संधी निर्माण झाली आहे आणि राजकारणाची पुन्हा मांडणी करण्याचा अवकाश ह्यातून मिळाला आहे, हे काय कमी आहे?

आपण अजून निकालाचा नीट अर्थ लावलेला नाही. मतांची पुरती आकडेवारी समोर आलेली नाही. ईव्हीएमनी काय काय भूमिका बजावली आहे हेही समजलेलं नाही. कुणी कुणाची मतं खाल्ली, कुठल्या पट्ट्यात कुणाला किती मतं मिळाली. बंडखोरांनी काय काय केलं आहे हे ही पुरतं समोर आलेलं नाही पण तरीही कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर “क्षितीजाच्या पलीकडचे प्रकाशाचे दूत” मात्र स्पष्ट दिसत आहेत ही गोष्ट माझ्या सारख्याला निश्चितच  दिलासा देणारी आहे.  

अनिल शिदोरे
नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
anilshidore@gmail.com

गुरुवार, जून २०, २०१९

महाराष्ट्र: आर्थिक स्थिती २०१९-२०

महाराष्ट्र: आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प :: थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे 

संदर्भ सहाय्य:: "ग्रीनअर्थ" 

कर्जबाजारी महाराष्ट्र, उत्पन्नात वाढ नाही, खर्च अधिक, कृषी आणि उद्योग क्षेत्रं आजारी तरीही निवडणूक वर्ष असल्यानं वारेमाप घोषणा

१. या आर्थिक वर्षात राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार नाही.  २०१७-१८ मध्ये स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी ७.५% होती आणि यावर्षीही यात कोणतीही वाढ न होता ती ७.५% राहील असा अंदाज आहे. हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात काय होईल माहीत नाही.

२.  गेल्या ७ पैकी ५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात कृषी क्षेत्रामधली वाढ खुंटलेली आहे. याची मुख्य करणे म्हणजे अत्यंत चुकीचं नियोजन, पावसाचे प्रमाण कमी, अवकाळी पाऊस आणि मोडकळीस आलेली सिंचन व्यवस्था.   २०१७-१८ मध्ये कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर ३.१% होता. यामध्ये मोठी घसरण झाली असून या आर्थिक वर्षात तो केवळ ०.४ असेल. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊनही या सरकारने सिंचन व्यवस्था आणि कृषी यावर परिणामकारक काम केलेले नाही.

३. पीक उत्पन्नाबद्दलही हीच स्थिती आहे. ज्वारी, गहू, बाजरी, मका, तूर, भुईमूग, तीळ, हरभरा, करडई, सूर्यफूल या पिकांच्या उत्पादनात २०१८-१९ या वर्षात मोठी घट झालेली आहे. ज्वारीचं उत्पादन निम्म्यानं घटलं आहे. गव्हाचं उत्पादन तब्बल ६१ टक्क्यांनी घटलं आहे. रब्बी हंगामाची आकडेवारी जर पाहिली तर अन्नधान्य उत्पादन ६३ टक्क्यांनी घटलं आहे. तेलबियांच्या उत्पादनात ७० टक्क्यांची घट झाली आहे. दुष्काळात उसाची लागवड मात्र वाढली आहे. त्यानं दुष्काळ अधिकच तीव्र जाणवला.  

४. आंबा, द्राक्षं, केळी, संत्री, कांदा यांच्या निर्यात मूल्यातही घट झालीय. २०१७-१८ मध्ये ३,४०५ कोटी रुपयांचा कृषी माल निर्यात झाला होता. २०१८-१९ मध्ये हा आकडा कमी होऊन १६२७ कोटी झाला आहे. म्हणजे निर्यात जवळपास निम्म्यानं घटली आहे.  

५. जलयुक्त शिवार या योजनेमध्ये पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये गेल्या ५ वर्षात सलग घट दिसते आहे. २०१५-१६ मध्ये ६३७४ प्रकल्प झाले. २०१६-१७ मध्ये ३,२१४ प्रकल्प झाले. २०१७-१८ मध्ये १,१०४ तर २०१८-१९ मध्ये केवळ ३० प्रकल्प झाले. 

६. २०१७-१८ मध्ये उद्योगांच्या वाढीचा दर ७.६  टक्के होता तर तो यंदा घसरून ६.९ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये उत्पादनात झालेली घट हा विशेष काळजीचा मुद्दा आहे. उत्पादनातील घसरण ७.७ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांवर आली आहे.  

७. सेवा क्षेत्रामध्ये मात्र ८.१  टक्क्यांवरून ९.२ टक्के वाढ झाली आहे. इथे फार मोठ्या प्रमाणात अमराठी लोक सहभागी आहेत.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे 

१. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या महसूलातील  तूट २००९-१० साली ८,००० कोटी होती. आज ती २०,००० कोटी  झाली आहे. वित्तीय तूट २००९-१० साली २१,००० कोटी होती ती आज ६१,००० कोटी झाली आहे. 

२. शालेय शिक्षण आणि क्रीडा, नगरविकास, ग्रामीण विकास आणि गृह या खात्यांसाठी सर्वाधिक तरतूद केली गेली आहे. 

३. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्रसारख्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यातून नेमके काय साध्य झाले? किती गुंतवणूक झाली आणि त्यातून किती युवकांच्या हाताला काम मिळाले, हे प्रश्न अनुत्तरित असतानाच मुनगंटीवारांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुन्हा आश्वासनांचा धनवर्षाव केला आहे.

४. नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेस चे कार्यारंभ आदेश. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित; काम प्रगतिपथावर   

५. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन डॉलर म्हणजे रु. ७० लक्ष कोटी करण्याच्या लक्ष्य पुर्तीसाठी महाराष्ट्र आर्थिक‍ विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करणार; चालू आर्थिक वर्षात रु. २० कोटी राखीव 

४. गेली पाच वर्षे धनगर आरक्षणाचे घोंगडे भिजत पडलेले आहे. येत्या निवडणुकीत या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून त्यांच्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात केलेली वाढ, बारा बलुतेदारांच्या कौशल्य विकासासाठी शंभर कोटी, कामगारांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी शंभर कोटी आणि अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी मालेगाव येथे आयटीआय सुरू करणे, हे सर्व संकल्प फक्त मतांसाठीच केलेले आहेत हे निश्चित!


ही माहिती खालील स्रोतांवर आधारलेली आहे. 
१. बीबीसी मराठी - https://www.bbc.com/marathi/india-48680085
२. PRS Legislative Research - https://www.prsindia.org/parliamenttrack/budgets/maharashtra-budget-analysis-2018-19
३. इंडियन एक्प्रेस - जलयुक्त शिवार - https://indianexpress.com/article/india/maharashtra-from-6374-in-2015-16-public-participation-in-jalyukt-shivar-works-drops-to-30-in-2018-19-5785576/
४. लोकमत संपादकीय - http://www.lokmat.com/editorial/maharashtra-budget-2019-less-amount-treasure-government-makes-many-allocations/
५. मिंट, अभिराम घड्याळपाटील   https://www.livemint.com/news/india/ahead-of-assembly-polls-nda-in-maharashtra-presents-a-political-budget-1560866485913.html

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

मोदीशाहीनं शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा केला

“मोदीशाहीनं” शिक्षणाचा खेळखंडोबा केला म्हणून पुन्हा पाच वर्ष नकोत


शिक्षण ही गोष्ट समाजाचं भरण-पोषण करते. शिक्षण ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असं असताना सरकारनं गेल्या पाच वर्षात त्यावर पुरेसा खर्च केला नाही, धोरणात पक्केपणा नव्हता, ज्या गोष्टींची आश्वासनं सरकारनं दिली ती पूर्ण केली नाहीत आणि केंद्रानं राज्यांच्या कारभारात अती ढवळाढवळ केली. पुन्हा असं व्हायला नको म्हणून “मोदीशाही” नको



  • जो समाज ज्ञानी तो समाज पुढारलेला. 
  • समाज ज्ञानी बनतो समाजात सर्वदूर पोचलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे. 
  • समाजातला कुठलाही माणूस केवळ तो गरीब आहे म्हणून शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. 
  • सर्वांना समान शिक्षण मिळालं की सर्वांना विकासाची, प्रगतीची समान संधीही प्राप्त होते.
  • परंतु हे आपोआप होत नाही. 
  • त्यासाठी सरकारनं दर्जेदार आणि सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणून विशेष वातावरण निर्माण करायचं असतं. 

शिक्षणाचा पाया म्हणजे शालेय शिक्षण. ह्या क्षेत्रात मोदी सरकारनं काय केलं ह्याची वस्तुनिष्ठ तपासणी होणं आवश्यक आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात शिक्षणाचं नवं धोरण आणलं जाईल म्हणून वचन देण्यात आलं होतं. देशातली जनता नव्या सरकारकडे फार आशेनं पहात होती. कारण ह्या पूर्वी भारत सरकारनं १९८६ मध्ये म्हणजे २८ वर्षांपूर्वी शैक्षणिक धोरण आखलं होतं. त्यात १९९२ मध्ये थोडी सुधारणा केली होती. परंतु शिक्षणाचं धोरण काही आखलं नाही.

परंतु नव्या सरकारनं सत्तेवर आल्यावर शैक्षणिक धोरण आखण्यासाठी समिती नेमायलाच तब्बल १८ महिने घेतले. मग ही समिती, ती उप-समिती करत आणि हा अहवाल, तो अहवाल करत पुढे काहीच झालं नाही. मग काहीतरी केलं असं दाखवायला पाहिजे म्हणून काही बदल केले ते म्हणजे “रोगापेक्षा औषध भयानक” असे होते.

ह्यात सर्वात मोठं पाप म्हणजे केंद्र सरकारनं विविध योजना एकत्र करून आकड्यांचा असा घोळ घातला की प्रत्यक्षात शिक्षणाच्या खर्चालाच कात्री लावली. २०१५-१६ पासून शिक्षणावर ४% पेक्षा कमी खर्च करण्यात आला. २०१८-१९ मध्ये तर फक्त ३.५% खर्च केला गेला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्याच काळात जागतिक पातळीवर डिझेल आणि पेट्रोल चे दर प्रचंड प्रमाणात घसरत गेले. ते दर घसरले तरी सरकारनं त्या प्रमाणात दर कमी न करता त्याचा भार आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांवर टाकला. त्यामुळे सरकारी तिजोरी भरत गेली. सरकारी तिजोरी भरत गेली तरी सरकारनं शिक्षणावरचा खर्च वाढवला तर नाहीच परंतु कमी केला. खरंतर सरकारला आपल्या देशाचं भविष्य घडवायला ही एक मोठी संधी होती. पण मोदी सरकारनं ती गमावली.

दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रानं राज्यांवर आपल्या योजना लादल्या. राज्यांचं स्वत:चं शैक्षणिक धोरण ठरवण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं.

ही गोष्ट आपण नीट समजावून घेऊ, कारण संसदीय चौकटीतली केंद्रानं केलेली ही एक फार मोठी चूक आहे. 

आपल्या देशाच्या संविधानानं राज्यकारभाराची त्रिस्तरीय पध्दती स्विकारली आहे. म्हणजे असं की सर्व देशाच्या दृष्टीनं ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जशा की सैन्य, चलन, आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे ह्या केंद्रानं पहायच्या. दुसरा स्तर राज्यांचा. ह्यात आरोग्य, शिक्षण, शेती ह्यासारख्या महत्वाच्या गोष्टी येतात. आणि तिसरा स्तर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे ज्यात सार्वजनिक स्वच्छता, रोगराई निर्मूलन अशा गोष्टी येतात.

शालेय शिक्षण हे केंद्राकडे न ठेवता राज्यांकडे का दिलं आहे? 

प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक राज्याचा इतिहास, परंपरा, आचार-विचार ह्यात फरक आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे शिक्षणाचे काही वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणाच्या बाबतीत राज्यांनी आपापली धोरणं ठरवावीत असं संविधान सांगतं. मात्र ह्या सरकारनं स्वत:कडे असलेल्या निधीच्या जोरावर आणि राज्यातल्या नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची आणि संविधानानं दिलेल्या अधिकाराची पुरती जाणीव नसल्यामुळे, आपली धोरणं फार मोठ्या प्रमाणात राज्यांवर लादली. आणि, ह्यामुळे शालेय शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला.

त्यात मग शाळा प्रवेशाला आधार जोडण्याचा खेळ झाला. त्याला सर्वोच्च न्यायालयानं ब्रेक लावला. त्यानं कित्येक मुलं शाळेपासून लांब राहिली.
प्रयोगशाळांना मदत करण्याच्या धोरणात गरीब शाळांपेक्षा खाजगी शाळांना मदत दिली गेली. एकूणच खाजगी शाळांचं प्रमाण वाढलं.
सीबीएससी सारख्या परिक्षांमध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला.

एकूण काय सरकारलाच कळत नव्हतं की करायचंय काय? 

वास्तविक “शालेय शिक्षण” ही गोष्ट “मानव संसाधन” मंत्रालयाच्या अखत्यारित येते. ह्या विभागाला ह्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती प्रमुख म्हणून असावी लागते. पण तसं झालं नाही. सरकारकडे तज्ञ व्यक्तींची कमी होती की काय?

असो.

देशाच्या इतिहासाचा आणि जगाचा विचार केला तर आपल्या देशात शिक्षणाचं फार मोठं काम गेल्या ५ वर्षात व्हायला हवं होतं. पण ते झालं नाही. आधी नुसत्या घोषणा, नंतर समित्या आणि बरेच घोळ असा प्रकार झाला.

आपल्या देशाला शिक्षणाच्या बाबतीत आणखी पाच वर्ष मागे जाणं परवडणारं नाही, म्हणून “मोदीशाही” नको. त्यांना शिक्षणाच्या बाबतीत ना दृष्टी, ना स्पष्टता, ना गोरगरीबांची काळजी, ना शिक्षणात समानता असावी म्हणून आग्रह, ना शिक्षणात गुणवत्ता असावी ह्याबाबतची तळमळ. 

मी माझ्या देशाचं भविष्य आणखी धोक्यात टाकू इच्छित नाही. म्हणून मला “मोदीशाही” पुन्हा सत्तेवर यावी असं वाटत नाही.

——————————————————————-